राज्यपाल पहिल्यांदाच ‘राँग बॉक्स’मध्ये!

By यदू जोशी | Published: March 4, 2022 07:57 AM2022-03-04T07:57:24+5:302022-03-04T07:58:10+5:30

कोश्यारींनी पळ काढल्याचं सत्तापक्षाचं म्हणणं, तर राज्यपालांचं अभिभाषण बिनधोक होण्याची जबाबदारी सरकारची होती, असा भाजपचा पलटवार..

governor bhagat singh koshyari maharashtra budget session and politics | राज्यपाल पहिल्यांदाच ‘राँग बॉक्स’मध्ये!

राज्यपाल पहिल्यांदाच ‘राँग बॉक्स’मध्ये!

googlenewsNext

यदु जोशी

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणासाठी आलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे दोन मिनिटांचे भाषण करून निघून गेले. ही अभूतपूर्व घटना आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात असं पूर्वी कधी घडलं नव्हतं. यापूर्वी एकदा विद्यासागर राव राज्यपाल असताना त्यांना विधानभवनच्या  प्रवेशद्वारावर धक्काबुक्की झाली होती. तथापि, राज्यपालांनी  अभिभाषण संपवून निघून जाण्याचा  प्रकार पहिल्यांदाच घडला. विधान परिषदेचे सभापती अन् विधानसभेचे उपाध्यक्षदेखील लगोलग निघून गेले.  कोणाच्या गोंधळामुळे राज्यपाल निघून गेले, यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राज्यपालांनी पळ काढला, असं सत्तापक्षाचं म्हणणं आहे अन् राज्यपालांचं अभिभाषण बिनधोक व्हावं, याची जबाबदारी सरकारची होती, असं भाजपचं म्हणणं आहे. 

महाविकास आघाडी सरकारला विविध पद्धतीने अडचणीत आणण्याची भूमिका घेणारे राज्यपाल पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे राॅंग बॉक्समध्ये गेले आहेत. एका विधानाने त्यांनी आघाडी सरकारमधील पक्षांना त्यांच्याविरुद्ध आघाडी उघडण्याची संधी दिली. राज्यपालांविषयीचा राग यानिमित्तानं महाआघाडी काढत आहे.  संयुक्त सभागृहात भाषण न देता त्यांनी निघून जावं, असा अभूतपूर्व गोंधळ सभागृहात सुरू नव्हता. तरीही राज्यपालांचं असं अचानक निघून जाणं आश्चर्यकारक होतं.

यापूर्वीही राज्यपालांच्या अभिभाषणात घोषणाबाजी झाली होती, पण त्यावेळी राज्यपाल असे भाषण सोडून निघून गेले नव्हते. गोंधळ वाढत जाईल आणि काहीतरी आक्रित घडू शकते, अशी शंका कोश्यारी यांना असावी हीदेखील शक्यता आहे. तसं काही घडणार असल्याची सूचना कोणाकडून राज्यपालांना मिळाली होती का? हेही तपासलं पाहिजे किंवा अभिभाषण सोडून का गेलो हे राज्यपालांनी महाराष्टाला सांगायला हवं. राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पुढील काळात अधिक तीव्र होईल आणि राष्ट्रपती राजवटीची शक्यता पडताळून पाहिली जाईल. राष्ट्रपती राजवटीची फाईल फुगत चालली आहे, हे नक्की! 

नवाब मलिक राजीनामा देतील? 

अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना राजीनामा द्यावा लागणार, असं दिसतं. ‘सभागृहातील परिस्थिती बघून आणि उच्च न्यायालय नवाब मलिक यांच्या याचिकेवर काय निर्णय देतं, यावर राजीनामा अवलंबून असेल’, असं सांगणारे उपमुख्यमंत्री अजित पवार  ‘राजीनामा नाही म्हणजे नाही’ असं काही म्हणालेले नाहीत.

भाजप राजीनाम्याच्या मागणीसाठी मोर्चा काढणार आहे. रणकंदन होईल. मलिक यांना घरी जावं लागेल, अशी चिन्ह आहेत. मलिक-दाऊद कनेक्शनचा पहिला आरोप करून देवेंद्र फडणवीस यांनी खेळ सुरू केला होता, आता राजीनाम्यानं खेळ संपवणं हा त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न असेल. मलिकांच्या याचिकेवर उच्च न्यायालय ७ तारखेला काय म्हणतं, यावर फैसला असेल. मलिक यांना अटक झाली त्या संध्याकाळी तिन्ही पक्ष मिळून केंद्रीय हस्तक्षेपाविरुद्ध तालुक्यातालुक्यात आंदोलन छेडणार असल्याची घोषणा ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ तीन पक्ष बसले, या पलीकडे एकत्रितपणे आंदोलन वगैरे काहीही झालं नाही. 

मलिक यांचा राजीनामा घ्यावा की घेऊ नये, यावरून महाविकास आघाडीचा गोंधळ वाढत जाईल. एखाद्या मंत्र्याचं पदावर असणं हे जेव्हा सरकार किंवा सरकारमधील पक्षांना राजकीयदृष्ट्या परवडत नाही, तेव्हा त्या मंत्र्याची विकेट जाण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी मलिक यांनी सरकारच्या बाजूनं आतापर्यंत किती दमदार बॅटिंग केली, हा विचार गौण ठरतो. राजकीय हिशेब वेगळे असतात.

नानाभाऊ तसं का बोलले? 

१० मार्चनंतर राज्यात बदल होतील, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मध्यंतरी का बोलले असावेत? विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदानाने घ्यावीच लागली तर काँग्रेसमध्ये काही गडबड होऊ नये म्हणून नानाभाऊंची ती गुगली होती म्हणतात. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आवाजी मतदानाने ही निवडणूक घेण्यास परवानगी देतील, अशी शक्यता कमी आहे. नियमांवर बोट ठेवून ते आवाजी मतदानाची विनंती फेटाळतील, ही शक्यता लक्षात घेऊन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काही गडबड होऊ नये म्हणून पटोले तसं बोलले असावेत. सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना किंवा राष्ट्रवादीदेखील भाजपसोबत जाणार नाहीत. भाजपच्या दृष्टीनं काँग्रेस हे सॉफ्ट टार्गेट असल्याचं बऱ्याच वेळा म्हटलं जातं. १० मार्चनंतर राज्यात काही बदल होणार म्हणजे काँग्रेसच्या काही मंत्र्यांना डच्चू देऊन एक-दोन नवीन चेहरे घेतले जाऊ शकतात, असं गाजर नानाभाऊंनी दाखवलं आहे.

महापौर अन् भूमिपुत्र 

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर प्राप्तिकर विभागाने धाडी टाकल्या तेव्हा ते किती यशवंत आहेत, हे समोर आलं. दोन कोटी रुपयांची कॅश सापडली त्यांच्याकडे. काही बँक लॉकर सील झाले. कोट्यवधींचा बेहिशोबी व्यवहार समोर आला आहे. आता मुंबईच्या तिजोरीचा कुबेर म्हटल्यावर एवढा पैसा क्षुल्लकच म्हणा. महापौर किशोरी पेडणेकर यांनी अजब विधान केलं. त्या म्हणाल्या, ‘यशवंत जाधव भीमपुत्र आहेत, ते कुणालाही घाबरणार नाहीत’! शिवसेनेत अशी जातपात कधीपासून आली? भीमपुत्र, ब्रह्मपुत्र, भूमिपुत्र अशांना घोटाळ्यांतही आरक्षण द्यायचं का?

गायक मनुकुमार श्रीवास्तव

राज्याचे नवे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे एक उमदे व्यक्तिमत्व आहे. वर्कोहोलिक अधिकारी अशी त्यांची प्रतिमा आहे. मुख्य सचिवांच्या कार्यालयाचे दिवे आता रात्री उशिरापर्यंत सुरू राहतील, असं लोक म्हणतात. ते  कलासक्त आहेत. त्यांच्या पत्नी अर्चना या उत्तम चित्रकार आहेत. मनुकुमार उत्तम गातात. फेसबुकवर त्यांच्या गाण्याचे व्हिडीओ ऐकताना त्याची प्रचिती येते.  मुख्य सचिव म्हणून मिळणार असलेल्या १४ महिन्यांच्या कार्यकाळात ते प्रशासनाला सुरिल्या वातावरणात ठेवतील, अशी अपेक्षा आहे.

Web Title: governor bhagat singh koshyari maharashtra budget session and politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.