दादा, आपली इतिहासात नोंद..!
By अतुल कुलकर्णी | Published: November 15, 2017 12:05 PM2017-11-15T12:05:41+5:302017-11-15T12:06:27+5:30
नमस्कार. सगळ्यात आधी आपल्याला रस्तेमुक्त खड्डे व्हावेत यासाठी शुभेच्छा..! सॉरी, खड्डेमुक्त म्हणायचं होतं चुकून उलटं झालं. आपण वाईट वाटून घेऊ नका... महाराष्ट्राला कसं बनवावं याची काही ना काही स्वप्नं आजवरच्या प्रत्येक राज्यकर्त्यांनी पाहिली होती.
प्रिय चंद्रकांतदादा पाटील,
नमस्कार. सगळ्यात आधी आपल्याला रस्तेमुक्त खड्डे व्हावेत यासाठी शुभेच्छा..! सॉरी, खड्डेमुक्त म्हणायचं होतं चुकून उलटं झालं. आपण वाईट वाटून घेऊ नका... महाराष्ट्राला कसं बनवावं याची काही ना काही स्वप्नं आजवरच्या प्रत्येक राज्यकर्त्यांनी पाहिली होती. तशी ती देवादी देव देवेंद्रांनीही पाहिली असतील. हे राज्य खड्डेमुक्त व्हावं असं त्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपण का मेहनत करायची..? उगाच सगळं श्रेय त्यांना मिळेल ना दादा..! आपण एवढी मेहनत केल्याचा काय उपयोग? ते जाऊ द्या, पण जळगावच्या बैठकीत आपण जो संदेश अधिका-यांना दिला ना दादा, त्याला राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या इतिहासात तोड नाही. अधिका-यांना काय करू आणि काय नको असं झालंय तेव्हापासून. सगळे अधिकारी कागदावर खड्डे शोधत फायलीवर डांबर टाकत बसलेत. अर्ध डांबर वापरा, बाकीचं माध्यमांना मॅनेज करण्यात घालवा असा आपण दिलेला सल्ला या राज्यात ६० वर्षांत कोणाला कसा सुचला नाही? अगदी आर्थर रोडवर मुक्काम असणाºया छगन भुजबळांचीही हे आपल्याला कसं सुचलं नाही या प्रश्नानं झोप उडालीय म्हणे... काही असो, सगळे अधिकारी मोकळेपणानं कामं करायला उत्सुक झालेत. या एका निर्णयामुळे डांबर किती आणि कुठं लावायचं याच्या हिशोबात सगळे मग्न झालेत बघा..!
दादा, विरोधकांना ‘सेल्फी विथ खड्डे’ यावरून काही बोलू नका. तुम्हाला अंदर की बात सांगू का, विरोधकांना सेल्फी काढत बसू द्या... आपल्या फायद्याचं आहे ते. त्यांना काही कमी विषय नाहीत राज्यात. कर्जमाफी, हमी भावाची बंद पडलेली खरेदी, बँक रॉबरी आणि आत्ता काही दिवसापूर्वी सांगलीत पोलिसांनीच एका मुलाला जिवंत जाळल्याची घटना. एवढे सारे विषय असूनही ते फक्त खड्डे, खड्डे करत बसलेत. आपण विरोधात होतो, तेव्हा पोलीस कोठडीमध्ये एकजण मेला होता, त्यावेळी गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, आपले देवेनभाऊ यांनी त्या सरकारला घाम फोडला होता घाम! त्यामानाने आताचे विरोधक बरे म्हणायची वेळ आली दादा... काही घडलं की ते निषेध करतात, फार तर पत्रक काढतात. खूप झालं तर पत्रकार परिषद घेतात आणि गप्प बसतात. आता ते सभा घेतायतं, सेल्फी विथ खड्डे करतायत. करू द्या त्यांना दादा. उलट मीडियाला कसं मॅनेज करायचं ते जरा अधिकाºयांना खासगीत सांगा... म्हणजे ते पण खड्डे खड्डे, सेल्फी सेल्फी करत बसतील.