देशसेवेसाठी समर्पित जीवनाला कृतज्ञ नमस्कार! - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 11:50 AM2023-08-07T11:50:59+5:302023-08-07T11:52:42+5:30

अ.भा.वि.प.चे माजी संघटनमंत्री व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह-सरकार्यवाह मदनदास देवी यांचे देहावसान झाले. त्यांच्या कार्याचे स्मरण!

Grateful salute to madnadas devi, a life dedicated to country service! - Narendra Modi | देशसेवेसाठी समर्पित जीवनाला कृतज्ञ नमस्कार! - नरेंद्र मोदी

देशसेवेसाठी समर्पित जीवनाला कृतज्ञ नमस्कार! - नरेंद्र मोदी

googlenewsNext

- नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान

मदनदास देवीजींचे देहावसान हा माझ्यासह लाखो कार्यकर्त्यांसाठी अतिशय शोकाकुल करणारा अनुभव आहे. मदनदासजी  आता आपल्यात नाहीत, हे वास्तव स्वीकारणे फार कठीण आहे! ते नसले तरी त्यांचे आशीर्वाद, शिकवण आणि सिद्धांत अक्षय असतील, हे एकमेव सांत्वन! त्यांची शिकवण आपल्याला यापुढील प्रवासात दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणा देत राहील! 

 त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम करण्याचे मला भाग्य लाभले. त्यांचा साधेपणा आणि  विनयशील स्वभाव मी अगदी जवळून पाहिला. ते अतिशय कुशल संघटक होते आणि प्रदीर्घकाळ संघटनेत काम केल्याने संघटनेचा विकास आणि कार्यकर्त्यांची प्रगती याविषयी आमच्यामध्ये नियमितपणे चर्चा व्हायच्या. एका चर्चेत मी त्यांना सहज विचारले, आपण मूळचे कुठले?- ते म्हणाले, त्यांचे कुटुंब महाराष्ट्रातील सोलापूरजवळच्या एका गावाचे रहिवासी आहेत आणि त्यांचे पूर्वज गुजरातमध्ये राहत असत; पण तो भाग नक्की कोणता होता, हे त्यांना माहिती नव्हते. आमच्या एका शिक्षकांचे आडनाव देवी होते आणि ते शिक्षक विसनगरचे होते, असे मी  त्यांना सांगितले.  त्यानंतर त्यांनीदेखील विसनगर आणि वडनगरला भेट दिली. आमच्यात गुजरातीमधूनही संवाद होत असे.

मदनदासजींच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे शब्दांच्या पलीकडे जाण्याची आणि त्या शब्दांमागील भावना जाणून घेण्याची त्यांची क्षमता! अतिशय नम्रपणे बोलणाऱ्या आणि नेहमीच हसतमुख  मदनदासजींना अनेक तासांच्या प्रदीर्घ चर्चांचे सार केवळ काही वाक्यांत मांडता यायचे.
जेव्हा व्यक्ती स्वत:ला मागे ठेवून आपले संपूर्ण आयुष्य समष्टीसाठी समर्पित करते, तेव्हा किती अद्भुत गोष्टी साध्य केल्या जाऊ शकतात, हे  मदनदासजींच्या जीवनकार्यातून दिसते. शिक्षणाने लेखापरीक्षक असलेले मदनदासजी, खरे तर सुखासीन आयुष्य जगू शकले असते. मात्र, त्यांनी तरुणांची मने घडवण्यासाठी, देशाच्या भल्यासाठी स्वत:ला झोकून दिले.  

देशाच्या कोनाकोपऱ्यांतील युवकांशी मदनदासजी सहज जोडले जात आणि म्हणूनच, त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला बळकट करण्यात स्वतःला वाहून घेतले. त्यांचे महत्त्वाचे प्रेरणास्थान म्हणजे यशवंतराव केळकरजी. मदनदासजी यांच्यावर त्यांचा मोठा प्रभाव होता. अभाविपच्या कार्यात अधिकाधिक विद्यार्थिनींना सहभागी करून घेण्याबाबत, तसेच सामाजिक कल्याणाच्या कामात त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी, तरुणींना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबाबत ते कायमच आग्रही होते. ते  म्हणत, ‘जेव्हा  विद्यार्थिनी एखाद्या सामूहिक कार्यात सहभागी होतात, त्यावेळी ते कार्य अधिक संवेदनशीलतेने केले जाते!’ 

मदनदासजींसाठी विद्यार्थ्यांप्रती असलेला त्यांचा स्नेह हा सर्वांत मोलाचा होता. ते कायमच विद्यार्थ्यांच्या घोळक्यात रमत. मात्र, पाण्यातल्या कमळाप्रमाणे, ते स्वतः कधीही विद्यापीठाच्या राजकारणात गुंतले नाहीत. आपल्या सार्वजनिक जीवनातील प्रगतीचे श्रेय, त्यांना युवा वयात मदनदासजी यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनाला देतील, अशा अनेक नेत्यांची नावे माझ्या नजरेसमोर आहेत. मात्र, असा कुठलाही मोठा दावा करण्याचा, कोणतेही श्रेय घेण्याचा त्यांचा स्वभावच नव्हता.

सध्याच्या काळात मनुष्यबळाचे व्यवस्थापन, गुणवत्तेचे व्यवस्थापन आणि कौशल्याचे व्यवस्थापन, या संकल्पना मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहेत. मदनदासजी लोकांना ओळखण्यात आणि  संस्थात्मक उद्दिष्टे गाठण्यासाठी नेमक्या लोकांच्या नेमक्या कौशल्यांचा वापर करून घेण्यात प्रवीण होते. ते लोकांच्या क्षमता ओळखून त्याप्रमाणे त्यांना काम देत असत. आपल्या गरजेप्रमाणे लोकांनी स्वत:ला बदलावे, असा हट्ट त्यांनी धरला नाही. एखाद्या युवा कार्यकर्त्याला स्वत:ची नवीन कल्पना मदनदासजींकडे सहजपणे मांडता यायची. त्याचमुळे त्यांच्याबरोबर काम केलेल्या अनेकांनी स्वयंप्रेरणेने काम करून स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटना, संस्थांचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला आणि त्या संस्था मोठ्या होऊन, त्यांची व्याप्ती वाढूनही त्या एकसंध आणि कार्यक्षम राहिल्या.

मदनदासजींच्या  प्रवासाचे वेळापत्रक भरगच्च असायचे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कर्तव्याच्या पलीकडे जाऊन लोकांना भेटणे त्यांना आवडायचे आणि लोकांशी संवाद साधायला ते नेहमीच तत्पर असायचे. मात्र, त्यांचे कार्यक्रम नेहमीच साधे असायचे, त्यात बडेजाव नसायचा. त्यामुळे त्यांचा कोणत्याही कार्यकर्त्यावर भार पडायचा नाही. अखेरपर्यंत त्यांचा हा गुण कायम राहिला. त्यांनी दीर्घकाळ आजारपणाला तोंड दिले; पण ते त्याबद्दल फारसे बोलत नसत. मी  खोदून चौकशी केली, तरच ते थोडेफार सांगत. शारीरिक त्रास सहन करूनही ते आनंदी राहिले. आपण देश आणि समाजासाठी काय करू शकतो, याचा ते आजारपणातही सतत विचार करायचे.

मदनदासजी यांची शैक्षणिक कारकीर्द अतिशय उत्तम होती आणि यातूनच  त्यांची सखोल आणि सूक्ष्म कार्यपद्धती आकाराला आली. ते एक उत्कट वाचक होते, जेव्हा जेव्हा त्यांना काही चांगले वाचनात यायचे  तेव्हा ते त्या क्षेत्रात काम करणाऱ्या संबंधित व्यक्तीकडे ते पाठवायचे. मला अनेकदा ही संधी मिळाली. 

जिथे कोणतीही व्यक्ती इतरांवर अवलंबून नसेल आणि  प्रत्येक जण स्वत:च्या पायावर उभा राहील, स्वत:मध्ये सुधारणा घडवून विकास करण्याच्या संधींचा सदुपयोग करील, असा भारत त्यांनी कल्पिला होता. जिथे स्वयंपूर्णता  हे केवळ एक ध्येय नसेल, तर  प्रत्येक नागरिकासाठी तो वास्तव अनुभव असेल, जिथे परस्परांप्रती आदर, सक्षमीकरण आणि सामायिक समृद्धी, या तत्त्वांवर आधारित समाज असेल, अशा भारताचे स्वप्न मदनदासजींनी पाहिले होते. आता, भारत विविध क्षेत्रांमध्ये अधिकाधिक स्वयंपूर्ण होत असताना, त्यांच्यापेक्षा अधिक आनंदी दुसरे कुणी असणार नाही.

आज आपली लोकशाही चैतन्यशील आहे, युवकांमध्ये आत्मविश्वास ठासून भरलेला आहे,  देशातले वातावरण आशावादाने भारलेले असताना मदनदास देवीजी यांच्यासारख्या लोकांचे स्मरण करणे औचित्याचे ठरेल, ज्यांनी आपले संपूर्ण जीवन देशसेवेसाठी आणि देशाला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी समर्पित केले.

Web Title: Grateful salute to madnadas devi, a life dedicated to country service! - Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.