प्राचीन संस्कृती संवर्धनासाठी उत्तम संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 07:33 PM2020-08-08T19:33:49+5:302020-08-08T19:38:22+5:30

दोन तास चाललेल्या या सोहळ्याने पाचशे वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली. भारतीय संस्कृतीतील ‘देवा’ला स्वत:चे हक्काचे ‘घर’ मिळाले.

Great opportunity for the preservation of ancient culture | प्राचीन संस्कृती संवर्धनासाठी उत्तम संधी

प्राचीन संस्कृती संवर्धनासाठी उत्तम संधी

Next
ठळक मुद्देनरेंद्र मोदी, सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या दुर्दम्य इच्छाशक्ती तसेच अथक प्रयत्नांमुळेच बुधवारचा विजय हाती लागला. त्याबद्दल त्या सर्वांचे अभिनंदन! पण...

- भारतकुमार राऊत
(ज्येष्ठ पत्रकार व माजी संसद सदस्य)

गेल्या बुधवारी देशात सर्वत्र मुसळधार पावसाने कहर केला होता. त्यातच कोरोना विषाणूचा राक्षस डोकावून विकट हास्य करीतच होता. तरीही अवघा भारत देश आनंदात न्हात होता. कारण, उत्तर प्रदेशातील अयोध्या क्षेत्री रामजन्मभूमीवर नियोजित राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होत होते. प्रत्येक हिंदू भारतीय दोन डोळ्यांचे प्राण करून प्रत्येक क्षण मनात साठवत होता. अभूतपूर्व म्हणावा असाच हा सोहळा!

दोन तास चाललेल्या या सोहळ्याने पाचशे वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली. भारतीय संस्कृतीतील ‘देवा’ला स्वत:चे हक्काचे ‘घर’ मिळाले. आता दोनेक वर्षांत मंदिराच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होईल आणि इतका प्रदीर्घ काळ बाबरीच्या दाराशी तिष्ठत खोळंबलेले रामलल्ला पुन्हा दिमाखात गाभाऱ्यात प्रवेश करतील. प्रत्येक भारतीय आता त्या घटकेची मनोमन आतुरतेने वाट पाहात आहे. राम मंदिर वादात गेल्या पाचशे वर्षांत झालेल्या रस्त्यांवरील आणि न्यायालयीन लढायांचे आता पुन:पुन्हा स्मरण करण्याचे कारण नाही; पण अंतिमत: ही लढाई कायद्याच्या चौकटीत रामभक्तांनी जिंकलीच. मात्र, ज्यांचा शेवट गोड ते सारेच गोड, असा पवित्रा इथे घ्यायचे कारण नाही. कारण या लढाईत अनेकांनी आपले प्राण गमावले. घरादाराची राखरांगोळी झाली. अनेक संसार उघड्यावर आले. त्यांच्यापुढं झालेल्या अनन्वित अत्याचारांची व अन्यायाची भरपाई कोण आणि कशी करणार? त्यामुळेच गेल्या पाचशे वर्षांत जे कटू पचविले आणि जे विष प्राशन केले, त्याचे गोड फळ हाती लागले, असेच मानावे लागेल.

नरेंद्र मोदी, सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या दुर्दम्य इच्छाशक्ती तसेच अथक प्रयत्नांमुळेच बुधवारचा विजय हाती लागला. त्याबद्दल त्या सर्वांचे अभिनंदन! पण बाबरी पाडून राम मंदिर बांधणे हाच संघ-भाजपचा अंतिम उद्देश
असेल का? तसे असेल तर आणखी दोन वर्षांत तोही सफल होईल. मग पुढे काय? काँग्रेससमोर स्वातंत्र्य मिळविणे हा उद्देश होता. १९४७ मध्ये तो सफल झाल्यावर पुढे काय? हा प्रश्न आ वासून उभा राहिला. त्यावर महात्मा गांधीजींसह समस्त काँग्रेसजनांसमोर समर्पक उत्तर नव्हते. तेव्हा गांधीजींनी काँग्रेस विसर्जित करण्याची क्रांतिकारी सूचना केली. तोवर सत्तेचीच स्वप्नं पाहणा-या काँग्रेसजनांना ती मान्य होणे शक्यच नव्हते. त्यामुळे काँग्रेस जिवंत राहिली खरी; पण भरसमुद्रात वाट चुकलेल्या जहाजासारखी भरकटत राहिली. म्हणूनच आपल्याला नक्की काय साधायचं आहे, याच्या लघु पल्ल्याच्या आणि दीर्घ पल्ल्याच्या योजना भाजप, संघ आणि पंतप्रधान मोदी यांना आताच आखून त्या मार्गाने चालणे सुरू करावे लागेल. केवळ प्रभू रामाच्या रोज आरत्या ओवाळण्याने काहीच साध्य होणार नाही.

प्रभू राम, श्रीकृष्ण आणि भगवान बुद्ध ही केवळ धार्मिक प्रतीके नसून, या विभूती भारतीय प्राचीन आणि अर्वाचीन संस्कृतीची रूपे आहेत. त्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राम मंदिरासारखे प्रकल्प उत्तम संधी आहेत. प्रभू राम व कृष्ण द्वापार आणि त्रेता युगातील आहेत, असे मानले तरी त्यानंतर मानवजातीत आणि जगात अनेक लक्षणीय स्थित्यंतरे झाली. यांतील काही मानवी प्रयत्नांनी, तर काही परिस्थितीवशात घडत गेली. महायुद्धे, औद्योगिक क्रांती, विविध राज्यक्रांती आणि लढाया यांचेही अपरिहार्य परिणाम जगावर झालेच.
त्यांचे आलेख, पडसाद आणि परिणाम यांचे दर्शन या प्रस्तावित राम मंदिरात घडवून देता येईल. तसे जर घडले, तरच तिथे प्रभू रामचंद्रांचा वास आहे, असे मानता येईल. नाही तर गावागावांत एखादे ‘प्राचीन’ देवस्थान असतेच, त्यात आणखी एकाची भर पडेल आणि सकाळ-संध्याकाळी आणखी आरत्या ओवाळल्या जातील, इतकेच. त्यात प्रभू राम कुठे असेल?

Web Title: Great opportunity for the preservation of ancient culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.