काँग्रेस-राष्ट्रवादीला गळती, भाजपाकडे 'महापुरे झाडे जाती'...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 07:22 AM2019-07-30T07:22:01+5:302019-07-30T07:24:33+5:30
सुजय पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांनीही त्याच वाटेने जावे
सुजय पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांनीही त्याच वाटेने जावे हे त्यांच्या चाहत्यांना पटणारे नसले तरी त्यांनी खपवून घेतले. तीन तीन पिढ्या सत्तेची पदे उबविल्यानंतर वाट्याला रिकामेपण येणे ही बाब केवढी दु:खदायक असते, हे ज्यांना कळते, त्यांनाच या विषयांचे दु:ख समजण्यासारखे आहे. आपला इतिहास, त्याचा मानमरातब आणि त्यावरील जनतेचा विश्वास याकडे पाठ फिरवून व तो तुडवून नव्या कुरणात जाणे त्याचमुळे त्यांना जमले आहे. महाराष्ट्रात भाजप-सेना यांच्या युतीची सत्ता आहे आणि दिल्लीतही भाजप मोठ्या बहुमतानिशी सत्तारूढ आहे. सत्तेचे आकर्षण (अन्य कोणत्याही आकर्षणापेक्षा) मोठे असते. त्यामुळे विखे यांची कोलांटउडी आपण सहानुभूतीने समजून घेतली आहे.
आता तशाच मोकळ्या अंत:करणाने आपल्याला नाईक घराण्याची नव्या दिशेने होणारी वाटचाल समजून घेतली पाहिजे. पुसदच्या या वजनदार घराण्याने महाराष्टÑाला दोन मुख्यमंत्री दिले. त्यामध्ये वसंतराव नाईक हे त्या काळी यशवंतरावांच्या विश्वासामुळे (व यशवंतरावांना बाळासाहेब थोरातांचा विश्वास नसल्यामुळे) दीर्घकाळ त्या पदावर राहिले. नंतरचे सुधाकरराव नाईक पवारांचा पाठिंबा असेपर्यंत त्या पदावर टिकले. पुढे त्यांना अपमानित होऊन जावे लागले. तरीही नाईक घराण्याचे तिसरे पाईक मनोहरराव नाईक पवारांसोबत राहिले व मंत्रीही झाले. आता पवारांना सत्ता मिळण्याची शक्यता नाही आणि काँग्रेसही सत्तेपासून दूर आहे. त्यामुळे सत्तापदांची कित्येक दशकांची सवय पडलेले नाईक घराणे कासावीस होऊ लागले असेल तर त्यांचीही अवस्था आपण समजून घेतली पाहिजे. त्या घराण्यातील नव्या पिढ्या आधीच भाजप व सेनेत गेल्या. मनोहरराव धीर धरून मागे राहिले. आता त्यांचाही धीर सुटला आहे. आणि आपल्या ‘असंख्य’ (?) अनुयायांसह तेही सेनेत सामील होणार आहेत. विखे आणि भाजप हे समीकरण जसे न पाहण्याजोगे तसेच नाईक आणि सेना हे समीकरणही न ऐकण्यासारखे आहे. पण सत्तातुरांना इतरांच्या पाहण्याबोलण्याची पर्वा नसते. आपल्या इतिहासाची जाण नसते. घराण्याने मिळविलेल्या नावाची व कीर्तीची मातब्बरी नसते. सत्तेच्या खुर्चीवर (मग ती कुणाचीही असोे) सरकार बसले की सर्व माणसे पाठीशी येतात आणि आपला सत्तेचा जयजयकार पुन्हा सुरू होतो, याची त्यांना चांगली जाणीव असते. त्यामुळे मनोहर नाईक सेनेचे सैनिक होतील आणि हातचे घड्याळ काढून तेथे सेनेची शिवबंधनाची राखी बांधून घेतील. तसे काँग्रेस व राष्टÑवादीतील अनेक जण सत्तेवर यायला उत्सुक आहेत. पण महापुरात आधी झाडे जातात व लव्हाळी राहतात तसेच काहींचे होत आहे.
भाजपने कर्नाटकातील कुमारस्वामींचे जेडीयुक्त काँग्रेस सरकार पैशाची खेळी करून पाडले. त्यामुळे सत्तेसाठी पक्षबदल हा आपल्या राष्टÑीय राजकारणाचा आता राष्टÑीय पायंडा झाला असावा, असेही लोकांना वाटू लागले आहे. मात्र आजवर ते काँग्रेसबाबत झाले. आता ते भाजपबाबतही होत असल्याचे पाहून तर हा पायंडाच यापुढे राष्टÑीय राजकारणाचा महामार्ग होईल, असेही आपण वाटून घ्यायला हरकत नाही. मध्य प्रदेशात भाजपच्या दोन आमदारांनी पक्षाला वाकुल्या दाखवत काँग्रेसचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा घरोबा स्वीकारला. आता त्या पक्षाचे आणखीही चार आमदार काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे ऐकिवात आहे. भाजपच्या तोडफोडीच्या राजकारणासाठी, तसेच उत्तर देण्याची क्षमता कमलनाथांनी दाखविली आहे. असो. अखेर राजकारणात सत्ताच तेवढी मिळवायची असते. ती मग विचारांची मिळो, अविचारांची मिळो, नावालाच मिळो, नाहीतर दगाबाजी करून मिळविणे असो. ती मिळवायची असते. लोकांची विस्मरणशक्ती मोठी असते. ते यातील सर्व हिकमती विसरतात आणि धावायच्या कामी लागून पुढाऱ्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ देतात. म्हणून विखे यांना दिल्या, तशा नाईकांनाही आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत आणि त्यांचे शिवकल्याण व्हावे, अशी प्रार्थना केली पाहिजे.
सत्तेसाठी पक्षबदल हा आपल्या राष्टÑीय राजकारणाचा आता राष्टÑीय पायंडा झाला असावा, असेही लोकांना वाटू लागले आहे. हा पायंडाच यापुढे राष्टÑीय राजकारणाचा महामार्ग होईल, असेही आपण वाटून घ्यायला हरकत नाही.