महेंद्र गिरींना अभिवादन व प्रार्थना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:38 AM2017-09-12T00:38:58+5:302017-09-12T00:43:57+5:30

रोमन कॅथलिक पंथाच्या अनेक पुरोहितांनी चर्चच्या पवित्र आवारात केलेल्या व्यभिचारासाठी याआधीचे पोप बेनेडिक्ट (सोळावे) यांनी आपल्या सा-या धर्मबांधवांसह जगाची क्षमा मागण्याचे जे धारिष्ट्य दाखविले तेच आता हिंदू धर्माबाबत अ.भा. आखाडा परिषदेने दाखविण्याची सिद्धता केली आहे.

 Greetings and prayers to Mahendra Giri | महेंद्र गिरींना अभिवादन व प्रार्थना

महेंद्र गिरींना अभिवादन व प्रार्थना

Next

रोमन कॅथलिक पंथाच्या अनेक पुरोहितांनी चर्चच्या पवित्र आवारात केलेल्या व्यभिचारासाठी याआधीचे पोप बेनेडिक्ट (सोळावे) यांनी आपल्या सा-या धर्मबांधवांसह जगाची क्षमा मागण्याचे जे धारिष्ट्य दाखविले तेच आता हिंदू धर्माबाबत अ.भा. आखाडा परिषदेने दाखविण्याची सिद्धता केली आहे. रामरहीम, आसाराम, राधे मां आणि रामपाल या बाबांसह अन्य १४ बाबांची नावे त्यांच्या माहितीनिशी जाहीर करण्याची तयारी या आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत महेंद्र गिरी यांनी केली आहे. अशा बाबांची नावे केंद्र व राज्य सरकारांसह विरोधी पक्षांकडे सोपविण्याची घोषणा करून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या नकली बाबांची जी वैशिष्ट्ये त्यांनी यावेळी जाहीर केली ती भल्याभल्यांचे व अनेक थोरामोठ्यांचे डोळे पांढरे करणारी आहे. त्यातले महत्त्वाचे गुणवैशिष्ट्य, धर्मगुरू म्हणविणाºया कोणत्याही बाबाजवळ खासगी म्हणावी अशी संपत्ती नसणे, हे आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक अन्वेषण विभागाने केलेल्या पाहणीनुसार एकट्या आसाराम बापूची खासगी मालमत्ता २७ हजार कोटींच्या घरात जाणारी आहे. त्यांच्या एकेकाळच्या शिष्य परिवारात तेव्हा व आज सरकारात असलेली काही मोठी माणसेही आहेत. अशाच एका दुस-या बाबाने आपल्या वेगवेगळ्या राज्यांतील इस्टेटी सांभाळण्यासाठी लष्करातील अनेक वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकाºयांना ‘मॅनेजर’ म्हणून नेमले आहे. याआधी एक असेच महंत देवाघरी गेले तेव्हा त्यांच्या आश्रमातून फार मोठा खजिना अनेक मालमोटारीतून रातोरात अन्यत्र हलविला गेल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या. त्या महंताच्या पायाशी राष्ट्रपती, पंतप्रधान व अनेक राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री बसत आणि त्याने दिलेल्या हिरव्या खड्याच्या अंगठ्या त्याचा आशीर्वाद म्हणून सन्मानाने बोटात घालून मिरवत. ती राधे मां तर जेव्हा नाच करते तेव्हा तो धार्मिक असतो की लैंगिक असाच प्रश्न पाहणाºयांना पडतो. पण अनेक वरिष्ठ अधिकारी व नेते तिच्या श्रद्धेत असल्याचे तिच्या छायाचित्रातून दिसते. कोणत्याही धर्माची सुधारणा त्याच धर्मातील लोकांनी पुढे होऊन केली तरच ती परिणामकारक होते. ती करण्याचे धाडस एकेकाळी आगरकरांनी केले. तेच धारिष्ट्य आता महंत महेंद्र गिरी करीत असतील तर त्यांच्या धाडसाचे निव्वळ कौतुक करून चालणार नाही. धर्म सुधारणेतील त्यांच्या अभिक्रमाला साºयांनी साथही दिली पाहिजे. पोप बेनेडिक्ट यांना अशी साथ सा-या युरोपात मिळाली. असा प्रयत्न मुस्लीम धर्मात मौलाना अबुल कलम आझाद यांनी केला. मात्र त्यांना साथ देणारे त्या धर्मात फारसे कुणी पुढे आले नाही. साधे लहानसहान बुवाबाबा जे गंडेदोरे विकून पोट भरतात त्यांचे पापही वीतभरच असते. पण जे समाजाला भुरळ घालून अब्जावधींची माया जमवितात त्यांचे पाप आकाश व्यापणारे असते. ते समाजाएवढेच धर्मालाही बदनाम करीत असतात. त्यांचे लक्षही संपत्ती, स्त्री आणि आपल्या धर्मसामर्थ्याची जाहिरात यावर असते. या बड्या बाबांना शरण जाणारे व त्यांच्यासमोर बसून त्यांचीच भजने आरती केल्यासारखे म्हणणारे त्यांचे भक्त अडाणी, अशिक्षित वा ग्रामीण नसतात. त्या भक्तांच्या रांगेत गरिबांना प्रवेशही नसतो. ही माणसे पदवीधर, धनवंत व चांगली प्रतिष्ठित म्हणविणारी असतात. आपली सारी अक्कल गहाण ठेवल्यासारखी ती बाबांचे गोडवे गातात आणि त्यांची वक्तव्ये अवतरणासारखी आपल्या संभाषणात आणतात. अशा बाबांना दिल्लीसारख्या देशाच्या राजधानीत करोडो रुपयांची उधळपट्टी करून आपले सोहळे साजरे करता येतात आणि देशाचे नेतृत्व करणारी माणसे त्या सोहळ्यात त्यांची हजेरी लावतात. अशी बाबा माणसे या आखाडा परिषदेने जगासमोर आणली तर शोषणमुक्तीच्या व स्त्रीमुक्तीच्या चळवळींना त्यातून बळही मिळेल. महंत महेंद्र गिरी यांना त्यांच्या या धाडसाचा मोबदला खुनाच्या धमक्यांंमधून आताच मिळू लागला आहे. ‘आमच्या बाबाचे नाव घ्याल तर ठार मारू’ असे त्यांना ऐकविले जात आहे. आतापर्यंत दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी यांच्या वाट्याला अशा धमक्या आल्या व त्या खºयाही झाल्या. आता त्या यादीत महेंद्र गिरी सामील होत असतील तर त्यांच्याभोवती सा-यांनी संरक्षणाचे कडे उभारले पाहिजे व त्यांच्या धाडसाला सर्वांनी साथ दिली पाहिजे. साºया चिकित्सांची सुरुवात धर्मचिकित्सेपासून झाली पाहिजे असे मार्क्स म्हणाला. मात्र ज्यांनी अशी चिकित्सा केली व त्यातले दोष दाखविले त्यांच्या वाट्याला फारसे चांगले दिवस आले नाहीत. मराठीतील संतांपासून थेट आंबेडकरांपर्यंतच्या साºयांच्या वाट्याला अवहेलना आणि तिरस्कारच अधिक आला. धर्माविषयी आंधळेपण बाळगणारे लोक गांधींसारख्यांचीही हत्या करताना आपण पाहिले. या स्थितीत आखाडा परिषद हीच या बुवाबाजीविरुद्ध उभी राहात असेल तर तो धर्मातील दोषांना आजवरचा लागलेला सर्वात मोठा सुरुंग समजला पाहिजे. जाता जाता एक गोष्ट या महेंद्र महाराजांनाही सांगायची. धर्माच्या नावावर येथे केवळ संपत्तीच लाटली जात नाही. त्याच्या नावावर येथे सत्ताही लाटता येते. शिवाय सत्तेची लूट संपत्तीच्या लुटीहून मोठीही असते. महेंद्र महाराज आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी या लुटारूंकडेही कधीतरी लक्ष द्यावे ही त्यांना आमची नम्र प्रार्थना.

Web Title:  Greetings and prayers to Mahendra Giri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत