गटबाजी व चापलुसी काँग्रेसचे सर्वांत मोठे शत्रू
By admin | Published: March 20, 2017 12:04 AM2017-03-20T00:04:23+5:302017-03-20T00:04:23+5:30
आज देशात राहुल गांधी यांच्या रूपाने सर्वात तरुण नेतृत्व काँग्रेसकडे आहे, पण देशाची तरुण पिढी ६६ वर्षांच्या नरेंद्र मोदींवर विश्वास
-विजय दर्डा (लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)
आज देशात राहुल गांधी यांच्या रूपाने सर्वात तरुण नेतृत्व काँग्रेसकडे आहे, पण देशाची तरुण पिढी ६६ वर्षांच्या नरेंद्र मोदींवर विश्वास टाकून त्यांना मते देत आहे, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. काँग्रेसच्या दृष्टीने तर हा नक्कीच सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण करू, पण त्याआधी काँग्रेसची आजची दयनीय स्थिती दाखविणारी आकडेवारी पाहू.
सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रादेशिक राजकारणात असलेले नरेंद्र मोदी एखाद्या झंझावातासारखे राष्ट्रीय राजकारणात आले व त्यानंतरही त्यांचे वादळ घोंघावतच राहिले. मोदी राष्ट्रीय राजकारणात आले तेव्हा भारतीय जनता पार्टी सात राज्यांमध्ये देशाच्या सुमारे २४ टक्के लोकांवर राज्य करीत होती. त्यावेळी काँग्रेस १३ राज्यांमध्ये सत्तेवर होती. परंतु त्यानंतरच्या अवघ्या तीन वर्षांत चित्र एकदम पालटले. सन २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर भाजपा आणि मित्रपक्षांसह आघाड्यांकडे मिळून आता १४ राज्यांची सत्ता असून ते देशाच्या ५६ टक्क्यांहून अधिक लोकसंख्येवर राज्य करीत आहेत. काँग्रेसची सत्ता केवळ सहा राज्यांपुरती मर्यादित राहिली आहे. बिहारमध्ये ती नावापुरती सत्तेमध्ये आहे. आता दुसऱ्या प्रकारची आकडेवारी पाहा. एकेकाळी काँग्रेस पक्ष हा भारतीय स्वातंत्र्याचे प्रतीक मानले जायचा. हा पक्ष उत्तर-दक्षिण, पूर्व-पश्चिम असा संपूर्ण देशभर गावोगाव पोहोचलेला होता. तोच पक्ष आता तामिळनाडूत गेली ५० वर्षे, उत्तर प्रदेशात २८ वर्षे, बिहारमध्ये २७ वर्षे, गुजरातमध्ये २२ वर्षे, ओडिशात १७ वर्षे आणि मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये प्रत्येकी १४ वर्षे सत्तेबाहेर आहे. पश्चिम बंगालमध्ये ४० वर्षांपूर्वी सिद्धार्थ शंकर रे यांच्यानंतर काँग्रेसच्या हातून निसटलेली सत्ता पुन्हा आलीच नाही. तामिळनाडूमध्ये सन १९६७ मध्ये भक्तवत्सलम हे काँग्रेसचे शेवटचे मुख्यमंत्री होते. आता तर ईशान्येकडील राज्येही काँग्रेसच्या हातून जात चालली आहेत. शेतकरी, मजूर, गरीब, दलित आणि वंचितांचे जीवनमान कसे उंचावायचे याचा विचार काँग्रेसने विकसित केला. काँग्रेस हा पूर्णपणे धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. काँग्रेसच्या पूर्वसूरींनी देशाला एका सूत्रात बांधण्याचे काम केले. एकेकाळी काँग्रेसचा सदस्य असणे ही अभिमानाची गोष्ट वाटे. अशा या पक्षाची ही अशी दुबळी अवस्था कशामुळे झाली? हे मान्य करावेच लागेल की भारतीय जनता पक्षाने मजबूत संघटनेची बांधणी केली व आपल्या विचारसरणीकडे लोकांना आकर्षित केले. पण त्याचबरोबर हेही सत्य आहे की, काँग्रेसने स्वत:ला एवढे दुबळे होऊ दिले की, भाजपाला फारसा विरोधच शिल्लक राहिला नाही. एक प्रकारे काँग्रेसने भाजपाला मैदान मोकळे करून दिले. एकीकडे भाजपा आपल्या कार्यकर्त्यांची फळी अधिकाधिक बळकट करीत होती, तर दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांची कॅडर ढासळत चालली होती. भाजपाच्या संलग्न संघटना मजबूत होत होत्या, तर काँग्रेसने सेवादल, युवक काँग्रेस, एनएसयूआय, महिला काँग्रेस इत्यादिंना वाऱ्यावर सोडून दिले. काँग्रेसच्या या संघटना आज संपल्यात जमा आहेत, हे सत्य आहे. काँग्रेसकडे कोणतीही योजना नाही की कोणतेही लक्ष्य नाही. काँग्रेसचे हे दुर्दैव ठरले की, पक्षात गटबाजी पराकोटीला पोहोचली, चापलूस लोकांचा बोलबाला झाला आणि ज्यांचा सामान्य नागरिकांशी संबंध नाही असे नेते राज्यांमध्ये तयार झाले. माझ्या मते नेता हा इंदिरा गांधी, नीतिश कुमार, अरविंद केजरीवाल व ममता बॅनर्जी यांच्यासारखा असायला हवा, जो जनतेसाठी सदैव उपलब्ध असेल. आज काँग्रेसचे नेते सामान्य लोकांपासून दूर गेलेले आहेत. राज्यांमध्ये जाऊन तेथील काँग्रेसचे नेते पाहिले तर त्यांची औकात काय आहे याची कल्पना येते. नोटाबंदीच्या बाबतीत काँग्रेसने असा भ्रम करून घेतला की, जनता नरेंद्र मोदींना धडा शिकवील. याच भ्रमापोटी काँग्रेसने उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या हातात हात घातला. याचा परिणाम काय झाला? २०१२ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभेत काँग्रेसचे २८ आमदार होते ते आता २०१७ मध्ये सातवर आले. अशा प्रकारच्या भ्रमाचे जे राजकारण केले जाते त्याची समीक्षा काँग्रेसने करायला हवी की नको? काँग्रेस नेत्यांच्या दृष्टिकोनाचीही समीक्षा व्हायला हवी. वाईट दिवस असताना काँग्रेसला नवसंजीवनी दिल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी अभिनंदनास नक्कीच पात्र आहेत. त्यांनी पक्षाची धुरा सांभाळल्यावर काँग्रेस १० वर्षे केंद्रात सत्तेत राहिली. या काळात अनेक कल्याणकारी योजना राबविल्या गेल्या, पण त्याचे श्रेय काँग्रेसच्या खाती पडले नाही. आता त्याच योजना राबवून भाजपा श्रेय लाटत आहे.
मध्य प्रदेशात ‘व्यापमं’चा एवढा मोठा घोटाळा उघड झाला, पण भाजपाने आपल्या एका तरी नेत्याला त्यात अडकू दिले का? भाजपावाले एकमेकांचे रक्षण करतात, मदतीला धावून येतात. याउलट काँग्रेसवाले आपल्याच पक्षातील लोकांचे पाय ओढत असतात. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी त्यांच्या परीने खूप मेहनत करीत आहेत. पण अन्य नेत्यांची सुस्ती काँग्रेससाठी घातक ठरत आहे. गोव्यात विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला. बहुमतासाठी काँग्रेसला आणखी फक्त चार आमदार मिळवायचे होते. याउलट सरकार स्थापनेसाठी भाजपाला बाहेरचे आठ आमदार मिळवायचे होते. मणिपूरमध्येही तशीच स्थिती होती. सत्तेसाठी काँग्रेसला केवळ ३ तर भाजपाला १० आमदारांचा पाठिंबा बाहेरून मिळवायचा होता. त्रिशंकू निकाल लागताच भाजपावाले झटपट कामाला लागले व काँग्रेसवाले राज्यपाल सरकार स्थापनेसाठी आपल्याला कधी बोलावतात याची वाट पाहात राहिले. परिणामी या दोन्ही राज्यांत काँग्रेसच्या हातातोंडाशी आलेली सत्ता गेली. सत्ता मिळविण्यासाठी भाजपाने पैशाचा वापर केला, असे काँग्रेसवाले म्हणतात तेव्हा मला त्यांचे हसू येते. खरे तर काँग्रेससाठी सावरण्याची ही शेवटची संधी आहे. आताही काँग्रेसने स्वत:ला सावरले नाही तर नरेंद्र मोदी यांचे ‘काँग्रेसमुक्त भारता’चे स्वप्न साकार व्हायला फार वेळ लागणार नाही!
हे लिखाण संपविण्यापूर्वी...
गेल्या गुरुवारी शिरीन तबस्सुम नावाच्या मुलीशी माझी भेट झाली. तिला दोन्ही हात नाहीत. खांद्यांपाशी हाताचा थोडासा भाग आहे. तिला दोनपैकी एक पायही नाही. पण या शारीरिक अपंगत्वाने न डगमगता शिरीन पदवीधर झाली व आता ती आयएएस अधिकारी होण्यासाठी यूपीएससी परीक्षेची तयारी करीत आहे. तिच्याकडे पाहिले की आत्मविश्वास ओतप्रोत भरलेला दिसतो. अचानक माझी नजर तिच्या त्या अत्यंत थोट्या हातांवर गेली. त्या इवल्याशा हातांनाही तिने मेंदी लावलेली होती. याला म्हणतात हिंमत व जिद्द! तिच्या या साहसामुळेच ‘लोकमत सखी मंच’चा शौर्य या श्रेणीचा विदर्भस्तरीय पुरस्कार देऊन तिचा गौरव केला गेला. अडचणींशी झुंजणाऱ्या सर्वांसाठीच शिरीन प्रेरणास्रोत आहे. शिरीन तबस्सुमच्या साहसी वृत्तीला माझा सलाम!