जागतिक पटलावरील पुतीन यांचा वाढता प्रभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2017 04:33 AM2017-01-04T04:33:09+5:302017-01-04T04:33:09+5:30

नव्या वर्षात जागतिक स्तरावर अनेक धक्कादायक बदल घडतील अशी शक्यता दिसते आहे. २० जानेवारीला डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील.

The growing influence of Putin on the world panel | जागतिक पटलावरील पुतीन यांचा वाढता प्रभाव

जागतिक पटलावरील पुतीन यांचा वाढता प्रभाव

Next

- प्रा. दिलीप फडके
(ज्येष्ठ विश्लेषक)

नव्या वर्षात जागतिक स्तरावर अनेक धक्कादायक बदल घडतील अशी शक्यता दिसते आहे. २० जानेवारीला डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील. त्यांचे परराष्ट्र धोरण कसे असेल याबद्दल नक्की कोणताच अंदाज करता येण्यासारखा नाही. अशा अनिश्चिततेच्या वातावरणात जागतिक पटलावरचा रशियाचा प्रभाव गेल्या वर्ष-दीड वर्षात वाढतांना दिसतो आहे. एके काळची महासत्ता असलेल्या रशियाचा प्रभाव कमी होतो आहे, असे मध्यंतरी काही काळ वाटायला लागले होते. पण अलीकडच्या काही महिन्यांमध्ये जागतिक पटलावर आपला स्वत:चा प्रभाव वाढविण्यात रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन कमालीचे यशस्वी झाले आहेत. परिणामी यापुढच्या काळात जागतिक स्तरावरच्या अनेक विषयांमध्ये रशियाच्या मताला आणि रशियन हस्तक्षेपाला विशेष महत्व मिळायला लागलेले दिसू शकेल. पुतीन यांच्या वाढत्या प्रभावाची दखल जागतिक स्तरावरच्या प्रसारमाध्यमांनी देखील घेतली आहे.
२०१६मध्ये पुतीन विजयी झाले पण महासत्ता म्हणून रशियाच्या स्थानाला अनेक मर्यादा आहेत असे सांगणारा डेव्हिड फिलीपोव्ह यांचा लेख ‘वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये प्रकाशित झाला आहे. आपण अनेक विषयांमध्ये यशस्वी होतो आहोत, असे जे पुतीन यांनी आपल्या नववर्षाच्या भाषणात सांगितले, ते खरे आहे असे फिलीपोव्ह यांनी म्हटले आहे. रशियाला जगाच्या विविध भागांमध्ये अनेक प्रभावशाली मित्र मिळाले आहेत. अमेरिकेला बाजूला ठेवत सिरियात रशियाने स्वत:चा प्रभाव निर्माण केला आहे. ट्रम्प यांच्या रूपाने अमेरिकेच्या सर्वोच्च सत्तास्थानी रशियाबद्दल सहानुभूती असणारा नेता येतो आहे, हे लक्षात घेऊन आपल्या अमेरिकेच्या वकिलातीमधील तीस कर्मचाऱ्यांना ओबामांनी हद्दपार करुनही त्याचा बदला घेण्यासाठी पुतीन यांनी कोणतीही कारवाई न करण्याचे धोरण स्वीकारले व ट्रम्प यांनी त्याचे मुक्तपणाने कौतुक केले. हे सर्व पुतीन यांचा वाढता प्रभाव दाखवीत आहे. एखाद्या विजयी नेत्याप्रमाणे पुतीन यांनी २०१७मध्ये प्रवेश केला आहे. रशियाशी सलोख्याचे संबंध असण्याची गरज आज पश्चिमी देशांपैकी अनेकांना भासते आहे. अगदी शीत युद्ध अतिशय तीव्र असतानाच्या काळात देखील अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवर प्रभाव पाडण्याची क्षमता पूर्वीच्या सोविएट युनियनमध्ये नव्हती ती आजच्या रशियाने दाखवली आहे. पण असे असले तरी आजचा रशिया म्हणजे पूर्वीचे सोविएट युनियन नव्हे आणि आज पूर्वीच्या शीतयुद्धासारखे जागतिक वातावरणदेखील राहिलेले नाही, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. आज आर्थिकदृष्ट्या रशियाची शक्ती पूर्वीसारखी राहिलेली नाही. पुतीन यांच्या कार्यपद्धतीला होणारा विरोध वाढतो आहे. त्यामुळे आज जरी पुतीन यांचा प्रभाव वाढलेला दिसत असला तरी भविष्यात काय होईल याचा नेमका अंदाज बांधणे अवघड आहे. आज रशियाशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याची भाषा करणारे ट्रम्प प्रत्यक्षात जेव्हां सत्ता हाती घेतील तेव्हां त्यांची धोरणे नेमकी कशी राहतील हे आजच सांगता येणार नाही. पण नव्या अध्यक्षांना उघड विरोध करण्याचे धोरण पुतीन यांना अवलंबणे सहजपणाने शक्य होणार नाही. त्यामुळेच जोपर्यंत नव्या राष्ट्राध्यक्षांचे धोरण समजत नाही तोपर्यंत पुतीनदेखील खूप शांतपणाने वाट पाहतील अशी शक्यता आहे. पुतीन आणि ट्रम्प यांच्या युतीची शक्यता आहे का यावर कॉल्बर्ट किंग यांचा एक लेख वॉशिंग्टन पोस्टमध्येच आला आहे. आपल्याला रशियासोबत मैत्री करायची आहे अशी घोषणाच ट्रम्प यांनी केली आहे. जागतिक राजकारणातील अनेक महत्वाच्या मुद्यांवर मतभेद आणि भिन्न भूमिका असूनदेखील क्रेमलीनसोबत सहकार्याचे संबंध निर्माण करण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. नाटोबद्दल पुतीन यांच्या मनात तीव्र नापसंती आहे आणि पश्चिमेमधल्या देशांच्या आघाडीचे बळ वाढणार नाही यासाठीचे आपले प्रयत्न देखील ते सोडणार नाहीत हे नक्की. अशा वातावरणात ट्रम्प-पुतीन यांची युती आणि त्यांच्यातला सलोखा व सहकार्याचे संबंध खरोखरच शक्य होतील का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ट्रम्प आणि पुतीन यांची खरोखरच युती झाली तर काय होईल याची पश्चिमी देशांना भीती वाटायला लागली आहे.
पुतीन यांच्याबद्दलचे वास्तव ट्रम्प यांना सांगण्याचे काम ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांना करावे लागेल असा सूर आपल्या ‘गार्डियन’ मधल्या लेखात मॅथ्यू डी’अन्कोना यांनी लावला आहे. पुतीन थंडपणाने काम करणारे आणि हुकुमशाही व आक्रमक वृत्तीचे आहेत आणि जागतिक स्तरावरचे लोकशाहीचे शत्रू आहेत असे सांगत आपल्या देशामधल्या आणि पक्षामधल्या बहुसंख्यांचा विरोध पत्करुन पुतीन यांच्यासोबत युती करताना ट्रम्प बरीच मोठी जोखीम घेणार आहेत. युरोपातल्या सर्व देशांच्या प्रमुखांमध्ये केवळ मे यांनाच पुढच्या काळात निवडणुकांना सामोरे जावे लागणार नाही त्यामुळे ट्रम्प यांना या विचारापासून परावृत्त करण्यासाठी त्यांनाच प्रयत्न करावे लागणार आहेत, असेही ते सांगत आहेत. एकूणच एका बाजूने ज्यांच्याबद्दल कोणताही निश्चित अंदाज करणे अवघड आहे असे ट्रम्प यांच्यासारखे सत्तेवर येणारे नवे अमेरिकन नेतृत्व आणि दुसऱ्या बाजूने कमालीचे आक्रमक धोरण विलक्षण थंडपणाने अवलंबणारे पुतीन यांच्यातली संभाव्य युती इतरांच्या मनातल्या शंका वाढवणारी ठरणार आहे हे नक्की.
एका बाजूने ट्रम्प यांच्या रूपाने पश्चिमी देशांमध्ये आस्थरता निर्माण होत असतानाच दुसऱ्या बाजूने चीन आणि पाकिस्तानशी अधिक सलोख्याचे व सहकार्याचे संबंध पुतीन निर्माण करीत आहेत, हे लक्षात घेण्यासारखे आहे. ज्याला भारताचा तीव्र विरोध आहे त्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरीडॉरच्या योजनेला पुतीन यांनी उघड पाठिंबा दिला आहे . त्याबद्दलच्या पाकिस्तानी माध्यमांमधल्या बातम्या त्या दृष्टीने बघण्यासारख्या आहेत. या योजनेबद्दल रशिया आणि पाकिस्तानमध्ये गुप्तपणाने वाटाघाटी झाल्याच्या बातम्या पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाल्या आहेत.
‘डॉन’मध्ये सय्यद समर अब्बास यांचा त्या संदर्भातला वृत्तांत बोलका आहे. पाकिस्तान आणि रशिया यांच्यातले वाढते लष्करी सहकार्य आणि लाहोर ते कराची गॅस पाईप लाईनबद्दलचा त्यांच्यात झालेला करार, अगदी चार दिवसांपूर्वी रशिया-चीन आणि पाकिस्तान यांच्यातली तालिबान बद्दलची चर्चा आणि त्या संदर्भातले एकमत या सर्व गोष्टी रशियाच्या वाढत्या प्रभावाच्या निदर्शक आहेत. सिरीयामधल्या युद्धात तुर्कस्तान बरोबर (तात्पुरती का असेना) युद्धबंदी घडवून आणून तिथेदेखील आपला प्रभाव पुतीन यांनी वाढवला आहे. इस्त्रायलचे प्रमुख नेत्यान्याहू यांची पुतीन यांच्याबरोबर सिरीयाच्या विषयावर चर्चा झाल्याच्या बातम्या आहेत. रशियाला सोबत घेतल्याशिवाय ईसिसच्या विरोधातली कोणतीही कारवाई यशस्वी होणार नाही हाच या साऱ्याचा अर्थ आहे.
अमेरिका, चीन, पाकिस्तान अशा अनेक प्रकारच्या विचारप्रवाह मानणाऱ्या देशांशी एकाच वेळी असे संबंध निर्माण करीत जगातल्या महत्वाच्या ठरणाऱ्या विविध विषयांवर आपल्या भूमिकेचा प्रभाव प्रस्थापित करण्यात इतर कोणत्याही राष्ट्रप्रमुखापेक्षा पुतीन अधिक यशस्वी झाले आहेत. या सगळ्याचा आपल्यावर परिणाम होणार आहे हे नक्की. अर्थात तो एक स्वतंत्र विषय आहे.

Web Title: The growing influence of Putin on the world panel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.