सेलिब्रिटींच्या कौटुंबिक हिंसाचाराचा वाढता प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 02:51 PM2021-11-19T14:51:09+5:302021-11-19T14:52:25+5:30
प्रसिद्ध जोडप्यांमधील कौटुंबिक वादविवादात कोण मोठा, कोण छोटा इथपासून, तर प्रेमाची विभागणी, निर्णय कोण घेणार, इथपर्यंत अनेक ताणतणाव असतात.
अॅड. असीम सरोदे
हल्ली सेलिब्रिटी कुटुंबांमध्येही कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे वाढत आहेत. हिंसाचार समजून घेणे खूप गुंतागुंतीचे आहे. कारण चार भिंतींमध्ये होणारी हिंसा केवळ शारीरिकच नाही तर ती इतर अनेक प्रकारे होते. वागणुकीतून होणारा अन्याय केवळ नवरा-बायकोसारख्या अत्यंत घट्ट संबंधातील व्यक्तींनाच लक्षात येतो. सेलिब्रिटी स्टेटस असलेल्या प्रसिद्ध जोडप्यांमधील वादविवादात कोण मोठा, कोण छोटा, कोणी कोणाचे ऐकायचे, इथपासून तर प्रेमाची विभागणी, पैसे खर्च करण्याचे स्वातंत्र्य, कोणाचे कुटुंबावर नियंत्रण राहणार, कोणते अन्नपदार्थ खाल्ले जाणार, निर्णय कोण घेणार, अशा प्रकारे अनेक ताणतणाव असतात. कौटुंबिक हिंसाचारपासून संरक्षण देणारा कायदा भारतात २००५ साली अस्तित्वात आला तरी इथे स्त्रियांना कौटुंबिक हिंसाचारमुक्त जीवन जगणे प्रत्यक्षात शक्य आहे का, हा प्रश्न नेहमीच निरुत्त्तर करणारा ठरतो. ज्यांच्यावर अन्याय- अत्याचार होतो किंवा ज्यांना हिंसा सहन करावी लागते ते जोपर्यंत अन्यायाविरुद्ध उभे राहत नाहीत तोपर्यंत कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायदा केवळ ‘मूक अधिकार’ बनून राहतो.
कुणीतरी प्रसिद्ध असणे याचे जसे अनेक फायदे असतात, तसेच त्या प्रसिद्ध व्यक्तींना बऱ्याचदा त्याचा त्रासही सहन करावा लागतो. नवरा-बायको दोघांनाही सामाजिक मान्यता आणि प्रसिद्धीचे वलय असेल अशावेळी त्यांच्यात झालेला कौटुंबिक कलह आपोआपच सामाजिक- सार्वजनिक चर्चेचा भाग बनतो. कुटुंबांतर्गत होणारी हिंसा घराच्या उंबरठ्याबाहेर सांगितली जाऊ नये व घरातले भांडण घरातच संपवावे, असा पुरुषप्रधान पगडा विशेषतः स्त्रियांच्या खांद्यावर भार म्हणून टाकला आहे. स्त्रियांनीच सहनशीलता बाळगावी, तर अनेक समस्या दूर होतील, असा समज रूढ आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास नष्ट होण्याची प्रक्रिया नेहमी घडते, याकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते. अशातच नवरा-बायको दोघेही एकाच क्षेत्रात प्रसिद्ध आणि वलयांकित व्यक्ती असतील, तर इतर अनेक शक्ती-स्थाने (पॉवर स्टेशन्स), त्या दोघांमधील अधिक ताकदवान व्यक्तीच्या सोबत उभे राहतात. त्यामुळे सेलिब्रिटी असलेल्या लोकांसंदर्भात शक्तीसंबंध लक्षात घेतल्याशिवाय त्यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांसंदर्भात चूक-बरोबर असे काही ठरवता येत नाही.
विवाहसंबंध विस्कळीत झाल्यावर आपल्या प्रसिद्धीचे वलय कलंकित होईल का, त्यांच्या प्रसिद्धीला शोभेल असा जीवनदर्जा ठेवून आयुष्य जगता येईल का, अशा अनेक कृत्रिम चिंतांमुळे वलयांकित व्यक्ती मानसिकदृष्ट्या कमजोर होत जातात. कौटुंबिक हिंसाचार सहन न झाल्याने अनेक सेलिब्रिटींच्या आयुष्याची कोंडी करणाऱ्या अनेक घटना याआधी जगात घडल्या आहेत. कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप ज्यावेळी स्त्रीकडून केला जातो, तेव्हा छळ, अन्याय, भेदभाव, दुर्लक्षितपणा, अशा अनेक गोष्टी सहन करण्याची प्रक्रिया तिने पूर्ण केलेली असते. त्यातून आत्मसन्मानाची जाणीव तिला झाल्यावरच सर्व भीती दूर सारून आपल्या नवऱ्यावर जाहीर आरोप कोणतीही स्त्री करते, हे भारतीय संस्कृतीतील वास्तव आहे. प्रसिद्ध जोडप्यांमधील कौटुंबिक हिंसा जेव्हा चव्हाट्यावर येते तेव्हा एक अनाहूत परिणाम दिसतो की, सामान्य कुटुंबातील अनेक हिंसाचार सहन करणाऱ्या स्त्रिया त्यांच्यावर होणाऱ्या हिंसेबाबत बोलण्याची तयारी करतात. हिंसेचा आरोप करणाऱ्यांना ‘जज्ज’ करणे अनेकदा चुकीचे असते. कौटुंबिक हिंसाचारग्रस्त स्त्रीच्या सुरक्षिततेची योजना करणाऱ्यांवर कायदा भर देतो; पण त्याची अंमलबजावणी होत नाही.‘सेलिब्रिटी’ कौटुंबिक हिंसाचार प्रकरणामध्ये जगात सर्वत्र हे दिसून आले आहे की, काही काळानंतर संबंधित जोडपे एकत्र बसून वाद संपवितात. अनेकदा नुकसानभरपाई घेऊन अन्याय व हिंसा करणाऱ्या पुरुषाला सोडून दिले जाते. ‘लेटिंग मेन ऑफ द हूक’ या व्यावहारिक प्रक्रियेला ‘सेलिब्रिटिंच्या’ कौटुंबिक वादात मान्यता मिळताना दिसते.
माझ्यावर कौटुंबिक हिंसा होतेय असा स्त्रीने केलेला आरोप ‘सेलिब्रिटींच्या’ जीवनातील शांततेचा भंग करणारा व सेलिब्रिटी म्हणून असलेल्या मुखवट्याचा पर्दाफाश असतो. ती ‘व्हिक्टिम कार्ड’ खेळेतेय; पण ती ‘व्हिक्टिम’ नाही, असे म्हणण्याचा प्रघात म्हणजे पुन्हा स्त्रिया कौटुंबिक हिंसाचाराचा खोटाच आरोप करतात, असे सामान्यीकरण करणारे असते. स्त्रियांमधील खूप नगण्य प्रवृत्ती कायद्याचा चुकीचा वापर करीत असतील; पण त्यामुळे सर्व स्त्रियांचे आरोप खोटे व निराधार आहेत, असे म्हणण्यातून आपण समाज म्हणून हिंसा करणाऱ्याला प्रोत्साहन देतो. कायद्याचा वापर नेहमीच जबाबदारीने करावा. कायदा हे ‘बदला’ घेण्याचे साधन नाही. हिंसा थांबून सन्मानाने जगण्यासाठी कायदा आहे. त्याचा वापर विवेकानेच झाला पाहिजे.
(लेखक संविधान विश्लेषक, कायदेतज्ज्ञ आहेत)
asim.human@gmail.com