Gudhi Padwa: गुढीपाडव्याच्या शोभायात्रांची सुरुवात कशी झाली?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 06:05 AM2022-04-02T06:05:38+5:302022-04-02T06:06:15+5:30

शेजार आहे; पण सोबत नाही या एकाकीपणाच्या भावनेतून डोंबिवली—ठाणेकरांनी गुढीपाडव्याच्या शोभायात्रांचा प्रारंभ केला. त्यांचे सर्वसमावेशकत्व टिकले पाहिजे.

Gudhi Padwa: How did the Gudipadva procession start? | Gudhi Padwa: गुढीपाडव्याच्या शोभायात्रांची सुरुवात कशी झाली?

Gudhi Padwa: गुढीपाडव्याच्या शोभायात्रांची सुरुवात कशी झाली?

googlenewsNext

संदीप प्रधान                            

तब्बल २३ वर्षांपूर्वी १९९९ साली डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानने गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा सुरू करण्याची मुहूर्तमेढ रोवली. पाठोपाठ २००० साली ठाण्यातील श्री कौपिनेश्वर मंदिराने येथेही शोभायात्रा सुरू केली. पाहता-पाहता ठिकठिकाणी शोभायात्रा सुरू झाल्या. ढोल-ताशांच्या गजरावर थिरकणारी तरुणाई, घोड्यांवर बसलेले लहानगे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे, बुलेट अथवा मोटारबाईकवर भगवे फेटे, रेबॅनचे गॉगल, नाकात नथ घालून व नऊवारी परिधान केलेली स्त्रीशक्ती, पारंपरिक वेशातील तरुणाई व पुरुष मंडळी असे हे चित्र असते. या उत्सवी वातावरणाबरोबर स्वच्छता, पाणीबचत, सौरऊर्जेचा वापर, रस्ते सुरक्षा अशा अनेकविध प्रश्नांचा कलात्मक अंगाने आढावा घेणारे चित्ररथ ही शोभायात्रेची वैशिष्ट्ये आहेत. 
महाराष्ट्रात १९९५मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले. तत्पूर्वी, अयोध्येत बाबरी मशीद पडली. देशात हिंदुत्वाचे वारे वाहत होते. त्याचवेळी खुल्या अर्थव्यवस्थेमुळे व्हॅलेंटाईन डेच्या सेलिब्रेशनवरून राडे सुरू झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात भूमिका घेतली. शिवसैनिकांनी प्रेमीयुगुलांना फटके दिले. तिकडे श्रीराम सेनेसारख्या संघटनेचे कार्यकर्तेही प्रेमिकांच्या पाठी हात धुऊन लागले. यामुळे तरुण पिढीच्या मनात हिंदुत्व, हिंदू संस्कृती याबद्दल ममत्व निर्माण होण्याऐवजी चीड निर्माण होऊ लागली. केवळ हल्ले करून हा प्रश्न सुटणार नाही हे डोंबिवलीतील धुरिणांनी हेरले. तरुणांना जर हिंदू संस्कृतीपासून तुटू द्यायचे नसेल तर त्यांना एखाद्या उत्सवाशी जोडले पाहिजे ही कल्पना पुढे आली. चैत्र पाडव्याच्या दिवशी शोभायात्रा काढण्याची कल्पना गणेश मंदिर संस्थानचे तत्कालीन अध्यक्ष आबासाहेब पटवारी यांनी मांडली व ती डोंबिवलीकरांनी स्वीकारली. मुळात डोंबिवली हे मोजक्या मराठी कुटुंबांचे छोटे शहर होते. गिरगाव, दादर वगैरे भागांतील अनेकांनी कुटुंबांचा आकार वाढला व घरे लहान वाटू लागल्याने डोंबिवलीची वाट धरली होती. गिरगाव, दादर, परळ वगैरे भागांत गणेशोत्सवापासून गोविंदापर्यंत अनेक उत्सवांची परंपरा होती. या सणांच्या काळात या परिसरात चैतन्य फुललेले असायचे. डोंबिवली या नव्या शहरातील अनेकांचे जिणे हे एखाद्या डॉर्मेट्रीत केवळ रात्री पाठ टेकण्यापुरता आसरा घेतो तसे होते. शेजारच्या फ्लॅटमध्ये कोण राहतो, याचाही पत्ता नसायचा. अनेकजण चाळीत मोठे झाले होते व तेथील घरांचे दरवाजे केवळ रात्री आठ तास बंद असायचे. एखाद्या घरातील सुखद व दु:खद घटनेत संपूर्ण चाळकरी समरसून सहभाग घ्यायचे. त्यामुळे डोंबिवलीत आलेल्या अनेकांना शेजार होता, पण सोबत नव्हती. शोभायात्रेने डोंबिवलीकरांची ही सहवासाची भूक भागवली. 

Gudi Padwa Importance & Significance In Marathi Gudi Padwa 2022 | जाणून घेऊया खास महत्व आणि विविध मान्यता - Maharashtra Times

ठाणे हेही ऐतिहासिक शहर; परंतु त्याचाही झपाट्याने विस्तार होत होता. येथेही मुंबईकरांचे लोंढे आदळत होते. डोंबिवलीकरांनी सुरू केलेली परंपरा ठाण्यात रुजवण्याकरिता कौपिनेश्वर मंदिराचे डॉ. प्र. वा. रेगे व अन्य विश्वस्त मंडळींनी पुढाकार घेतला. पहिल्याच वर्षी डोंबिवली व ठाण्यातील शोभायात्रांना हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेकडो चित्ररथ शोभायात्रेत सामील झाले. गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटेपासून दुपारपर्यंत ही दोन्ही शहरे उन्हाची तमा न बाळगता रस्त्यावर उत्सवाचा आनंद घेतात. कोरोनामुळे गेली दोन वर्षे निर्बंध होते. यंदा गुढीपाडव्यापासून मास्क वापरणे ऐच्छिक झाल्याने तर सर्वच बंधने सैलावली. आतापर्यंत शोभायात्रेत या दोन्ही शहरांमधील सर्व धर्मीय मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आहेत. ‘राजकारणविरहित सांस्कृतिक चळवळ’, असे आतापर्यंत त्याचे स्वरूप आहे. गेल्या सात वर्षांत देशातील राजकीय प्रवाह सांस्कृतिक क्षेत्रावर वरचढ ठरल्याचे दिसते. शोभायात्रेमधील सर्वसमावेशकता टिकवणे हेच या घडीचे आव्हान आहे.

(लेखक लोकमतमध्ये वरिष्ठ सहायक संपादक आहेत)

Web Title: Gudhi Padwa: How did the Gudipadva procession start?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.