‘गुरमेहर, तू एकटी नाहीस’
By admin | Published: March 1, 2017 11:59 PM2017-03-01T23:59:52+5:302017-03-01T23:59:52+5:30
कारगिलच्या युद्धात शहीद झालेले कॅ. मनदीप सिंग यांच्या महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलीने एखाद्या संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले असेल
कारगिलच्या युद्धात शहीद झालेले कॅ. मनदीप सिंग यांच्या महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलीने एखाद्या संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले असेल आणि ती संघटना सत्ताधारी भाजपाला पसंत पडणारी नसेल तर तिला बलात्काराच्या धमक्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देणे हा भारतीय संस्कृतीचा भाग नव्हे, ते संस्कृतीचे विकृतीकरण आहे. ती कायद्याएवढीच लोकशाहीलाही मान्य होणारी बाब नाही. लोकशाही मान्य असलेल्या व निवडणूक आयोगाकडून आक्षेप नसलेल्या कोणत्याही वैध राजकीय पक्षात वा संघटनेत जाण्याचा अधिकार भारतीय नागरिकांना, त्यातील स्त्रियांसह विद्यार्थी-विद्यार्थिनींनाही आहे. त्यामुळे कॅ. मनदीप सिंगांच्या गुरमेहर कौर या कन्येने आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे सदस्यत्व स्वीकारले असेल तर तो तिचा अधिकार आहे. या संघटनेचे विद्यार्थी परिषद या संघ व भाजपाच्या विद्यार्थी शाखेशी राजकीय भांडण असेल तर त्यात उतरण्याचाही तिला हक्क आहे. स्टुडंट्स फेडरेशन ही कम्युनिस्ट विचारसरणीची संघटना असली तरी तिला कायदा, घटना व लोकशाही यांची मान्यता आहे. ती नक्षलवाद्यांसारखी सशस्त्र वा अवैध संघटना नाही. कम्युनिस्ट विचारसरणीवर अनेकांचा राग आहे व ती न पटणाऱ्यांचा वर्गही देशात आहे. मात्र न पटणाऱ्या विचारसरणीच्या मुलीला बलात्कारासारख्या धमक्या देणे हा केवळ कायद्यान्वयेच नव्हे तर सामाजिकदृष्ट्याही गुन्हा आहे. या धमक्यांनी गुरमेहर घाबरली नाही. ‘मी दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी असून, संघाच्या विद्यार्थी परिषदेला मी भीत नाही. मी एकटी नाही. सारा देश माझ्यासोबत आहे,’ असा फलक हाती घेतलेले तिचे छायाचित्र तिने फेसबुकवर टाकले आहे. त्यावर ‘या मुलीच्या मनात असे विष कोणी पेरले’ हा तद्दन फालतू व अशोभनीय प्रश्न केंद्रीय गृहखात्याचे राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी विचारला आहे. भाजपाचे एक खासदार प्रतापसिंग यांनी गुरमेहरची तुलना थेट दाऊद इब्राहिम या गुन्हेगाराशी करून ‘दाऊद आपल्या बापाचे नाव पुढे करून स्वत:च्या देशभक्तीचा टेंभा असा मिरवित नाही’ अशी निर्लज्ज मल्लिनाथी तिच्या भूमिकेवर केली आहे. ‘राष्ट्रवादाचे नाव घेणाऱ्यांनी आपल्याच देशातील मुलींना बलात्काराच्या धमक्या देणे संस्कृतीत आणि नीतीत बसणारे आहे काय,’ असा प्रश्न गुरमेहरने या सगळ्या वाचीवीरांना विचारला आहे. वास्तव हे की गुरमेहर ही आपल्या वडिलांच्या शहादतीचा वा देशभक्तीचा आधार न घेता आपली भूमिका मांडणारी व आपला पक्ष वा विचारसरणीच्या निवडीचे स्वातंत्र्य जाहीर करणारी आहे. ‘माझ्या वडिलांचा मृत्यू पाकिस्तानमुळे नव्हे तर युद्धामुळे झाला आहे’ हे तिचे म्हणणे युद्धविरोधी आणि शांततेच्या बाजूचे आहे. युद्धविरोधी भूमिका घेणारी बर्ट्राण्ड रसेलपासून म. गांधींपर्यंतची फार मोठी माणसे जगात आजवर झाली. मात्र त्यांना कुणी भित्रे म्हटले नाही आणि त्यांच्यातील कुणाला खून वा बलात्कारासारख्या धमक्या दिल्या नाहीत. वीरेंद्र सेहवाग हा क्रिकेटचा चांगला खेळाडू आहे. त्याच्या राजकीय ज्ञानाविषयीची फारशी माहिती कुणाला नाही. तरीही त्या शहाण्याने गुरमेहरची टवाळी करताना मी क्रिकेट खेळत नसून माझी बॅट क्रिकेट खेळते, असे म्हटले आहे. या वीरेंद्र सेहवागने क्रिकेटच्या मैदानावर क्वचित काहीवेळा दोन शतके काढली हे खरे असले तरी तो कितीदा भोपळा घेऊन परतला आहे याचीही माहिती क्रिकेटप्रेमींना आहे. अधूनमधून अशी चमक दाखवणाऱ्यांनी गंभीर स्वरूपाच्या वैचारिक क्षेत्रात आपल्या अकलेचे तारे तोडणे हे फारशा शहाणपणाचे नाही. युद्धविरोधी भूमिका घेणाऱ्यांना अन्य देशांच्या युद्धाविषयीच बोलून चालत नाही. त्यांना स्वदेशाने केलेल्या युद्धांविषयीही बोलावे लागत असते. अशा युद्धात मरणाऱ्यांची मानसिकता आणि त्यांच्यावर नुसतीच फुले उधळून आपल्या देशभक्तीची जाहिरात करणाऱ्यांची मानसिकता दोन भिन्न पातळ्यांवरची असते. आपल्या खासदारांना आणि मंत्र्यांना या साध्या गोष्टी कळत नसतील तर ते आपल्या देशाचे दुर्दैवी प्राक्तन आहे असेच म्हटले पाहिजे. विरोधी पक्ष, विरोधात जाणारी भूमिका वा विचार यांचा आदर करणे हा लोकशाहीचा पहिला धडा आहे. आमच्या सोबत येणारेच तेवढे देशभक्त आहेत आणि बाकी सारे देशविरोधी आहेत ही विचारसरणी फॅसिस्टांची आहे. या देशात काँग्रेसपासून भाजपापर्यंत आणि समाजवाद्यांपासून कम्युनिस्टांपर्यंत सगळ्या संघटना व विचारप्रवाह यांना स्थान आहे आणि ते मानाचे आहे. या साऱ्या विचारसरणींचे पक्ष देशात वा राज्यात दीर्घकाळ सत्तेवरही राहिलेले आहेत. त्यातला एखादा विचार स्वीकारणाऱ्याच्या मनात कोणीतरी विष कालविले आहे असे म्हणणे बालिशपणाचे व राजकीय पुढाऱ्याला न शोभणारे आहे. गुरमेहरला बलात्काराच्या धमक्या देणारे कायदा, देश आणि या साऱ्या समाजाचे गुन्हेगार आहेत. त्यांना पकडून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करणे हे किरण रिजिजूंच्या मंत्रालयाचे प्राथमिक कर्तव्य आहे. त्याकडे दुर्लक्ष करून ते असला आचरटपणा करीत असतील तर त्यांची संभावनाही वेगळ्या पद्धतीने केली पाहिजे. असो, गुरमेहर म्हणते तशी ती एकटी नाही. सारा समाज व देशही तिच्यासोबत आहे व राहणार आहे. तिच्या सामर्थ्याचे व धाडसाचे कौतुक. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने लढणारे सारेच तिच्यासोबत राहणार आहेत.