गुरूला अखेर ‘महागुरू’ मिळाला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:26 AM2017-12-26T00:26:54+5:302017-12-26T00:27:09+5:30
डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांची पदवी वैध की अवैध हे ठरविण्याचा सर्वस्वी अधिकार परीक्षा मंडळाला आहे.
डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांची पदवी वैध की अवैध हे ठरविण्याचा सर्वस्वी अधिकार परीक्षा मंडळाला आहे. मात्र ज्या कुलगुरूंनी आणि ज्या समितीने विद्यापीठाचा सर्वोच्च समजला जाणारा ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन गौरव’ पुरस्कार मिश्रा यांना प्रदान केला. त्यांना मिश्रा यांनी केलेल्या वाङ्मय चौर्याबद्दल कल्पना नव्हती का? राष्ट्रसंतांचे नाव असलेला पुरस्कार डॉ.मिश्रा यांना प्रदान करण्याचे धाडस का दाखविण्यात आले ?
डॉ.वेदप्रकाश मिश्रा चालते बोलते विद्यापीठ! विद्यापीठात काही कायदेशीर पेच निर्माण झाला की वेदजींना विचारा. तोडगा काढतील, अशी प्रतिक्रिया कोणत्याही कुलगुरूंकडून वा व्यवस्थापन परिषद सदस्यांकडून येते. कायद्याची भाषा सांगत मोठमोठ्यांना घाम फोडणारे. गेली ४० वर्षे विद्यापीठाच्या राजकारणावर पकड ठेवणारे डॉ.वेदप्रकाश मिश्राच सध्या कायदेशीर पेचात सापडले आहेत. या पेचाचे कारण आहे त्यांनी भूतकाळात केलेले वाङ्मय चौर्य!
बुद्धिवान माणसे चोरी करीत नाहीत. त्यांना चोर ठरवू नका असे कोणत्याही कायद्यात म्हटले नसले तरी आपल्या देशात एखाद्याला एखादी उपाधी लाभली की, ती शेवटपर्यंत त्याच्यासोबत राहते, असा इतिहास आहे. कारण लाटेवरच आपल्या देशाच्या राजकीय आणि सामाजिक संस्कृतीचा प्रवास सुरू आहे. तो पुढेही राहील. १९८७ मध्ये गांधी विचारधारा पदव्युत्तर पदविकेच्या फिल्ड रिपोर्टमध्ये केलेल्या वाङ्््मय चौर्यामुळे तुमची पदविका रद्द का करण्यात येऊ नये, अशी नोटीस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने डॉ.मिश्रा यांना बजावली आहे. एरवी परीक्षेत कॉपी करताना सापडलेल्या विद्यार्थ्याला परीक्षेतून डिबार करण्यासाठी क्षणाचाही विलंब न लावणाºया विद्यापीठाला मिश्रा यांना नोटीस बजावण्यासाठी तब्बल ३० वर्षे का लागली मुळात हा संशोधनाचा विषय आहे. हे आधी लक्षात आले नव्हते का? मग फाईल का दडवून ठेवण्यात आली? या जर-तरच्या गोष्टी असल्या तरी सत्तेपुढे सारेच नतमस्तक असतात, हे कुणाला सांगण्याची गरज नाही. डॉ.मिश्रा यांच्या अनुभवाचा आणि विद्वत्तेचा फायदा व्हावा यासाठी विद्यमान कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी तर त्यांना विद्यापीठ सल्लागार मंडळाचे अध्यक्षपद सोपविले होते. कराडच्या क्रिष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सच्या कुलपतिपदाची जबाबदारी सांभाळताना आपण नागपूर विद्यापीठालाही शैक्षणिक भरारी घेण्यासाठी सल्ले द्यावे, असे साकडे त्यांना विद्यमान कुलगुरूंकडून घालण्यात आले होते.
मिश्रा यांची पदवी वैध की अवैध हे ठरविण्याचा सर्वस्वी अधिकार परीक्षा मंडळाला आहे. दोन आठवड्यानंतर यावर निर्णयही होईल. मात्र ज्या कुलगुरूंनी आणि ज्या समितीने विद्यापीठाचा सर्वोच्च समजला जाणारा ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन गौरव’ पुरस्कार डॉ.मिश्रा यांना प्रदान केला. त्यांना या चौर्याबद्दल कल्पना नव्हती का? कल्पना होती तर राष्ट्रसंतांचे नाव असलेला पुरस्कार डॉ.मिश्रा यांना प्रदान करण्याचे धाडस का दाखविण्यात आले ? त्यावेळी ही कुलगुरूंची गरज होती की बौद्धिक दिवाळखोरी? मात्र मिश्रांमुळे आपण अडचणीत येऊ अशी खात्री पटल्यावर गुरूवरच शरसंधान करण्याचे धाडस त्यांच्या चेल्यांनी केल्याने ‘गुरूला अखेर महागुरू मिळाला’, असेच म्हणावे लागेल.