गुरुदेवभक्ताची नि:स्पृह सेवा उपेक्षित राहिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 03:46 AM2018-04-17T03:46:54+5:302018-04-17T03:46:54+5:30
लक्ष्मणदादा नारखेडे परवा गेले. कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्यांचे ते सहकारी. त्यांना अनुयायी किंवा भक्त यासाठी म्हणता येणार नाही कारण, तुकारामदादांच्याही कार्याकडे ते तटस्थतेने बघायचे.
- गजानन जानभोर
लक्ष्मणदादा नारखेडे परवा गेले. कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्यांचे ते सहकारी. त्यांना अनुयायी किंवा भक्त यासाठी म्हणता येणार नाही कारण, तुकारामदादांच्याही कार्याकडे ते तटस्थतेने बघायचे. जिथे उणिवा राहायच्या तिथे स्पष्टपणे सांगायचे. म्हणूनच त्यांना दादांनी आपले उत्तराधिकारी नेमले. लक्ष्मणदादा प्रसिद्धीपराङमुख होते. आपले सामान्यपण ढळू न देता त्यांनी राष्ट्रसंतांच्या कार्यासाठी आयुष्य दिले. तुकारामदादांनी उभारलेल्या अड्याळ टेकडीवर ग्रामस्वराज्याचे अनेक प्रयोग सतत सुरू असतात. दादा गेल्यानंतर या कामाचे पुढे काय होईल, असा प्रश्न कार्यकर्त्यांना अस्वस्थ करायचा. दादांची असंख्य कामे अपुरी राहिली होती. त्यांनी ज्यांना आधार दिला ती माणसे आत्मनिर्भर व्हायची होती. आपण १०० वर्षांचे होईपर्यंत कार्यरत राहू, या दादांंच्या आश्वासनामुळे कार्यकर्त्यांना बळ आले होते. पण, १२ वर्षांपूर्वी तुकारामदादांनी अचानक या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांना आलेले अनाथपण लक्ष्मणदादांनी कधी जाणवू दिले नाही. आपले घरदार, शेतीवाडी गुरुदेवाच्या कार्यासाठी समर्पित करून या कार्यकर्त्याने तुकारामदादांची सोबत धरली. लक्ष्मणदादा तसे बुलडाणा जिल्ह्यातील नांदुऱ्याचे. पण, संपूर्ण आयुष्य त्यांनी सेवाकार्यातच घालवले. ग्रामस्वराज्याच्या चळवळीसाठी लक्ष्मणदादा सतत भ्रमंतीवर असायचे. तुकारामदादा गेल्यानंतर अड्याळ टेकडीच लक्ष्मणदादांचे कार्यक्षेत्र झाले. तुकारामदादा हे तपपूत जीवन जगणारे किंवा ईश्वर चिंतनात गढून राहणारे साधू नव्हते. ते समाजाच्या प्रश्नांशी नाते राखणारे, त्याच्यावरील संकटाविरुद्ध लढणारे कार्यकर्ते होते. लक्ष्मणदादांचा स्वभाव मात्र काहीसा शांत. कुठलेही वलय आपल्याभोवती निर्माण होणार नाही याची काळजी ते सतत घ्यायचे.
कुठल्याही क्षेत्रातील माणसाच्या कार्याची दखल समाज घेऊ लागतो तेव्हा त्याच्याभोवती आपसूकच एक वलय निर्माण होत असते. त्याच्या कीर्तीत आणि लोकप्रियतेत हे असे वलयांकित असणे आवश्यक ठरते. पण, लक्ष्मणदादांनी असे कुठलेही वलय स्वत:भोवती निर्माण होऊ दिले नाही. त्यामुळे गुरुदेव सेवा परिवारात ते दुर्लक्षित राहिले आणि त्यांच्या नि:स्पृह सेवेची समाजाने म्हणावी तशी दखलही घेतली नाही. एरवी आयुष्याच्या संध्याकाळी असे कार्यकर्ते निराश होत असतात. त्यांच्या वागण्या-बोलण्यात एक वैषम्य जाणवत असते. पण, लक्ष्मणदादांच्या चेहºयावरचे समाधानाचे भाव अखेरपर्यंत कायम होते.
पुरस्कार, प्रसिद्धीमुळे आपल्यात अहंकार तर निर्माण होणार नाही, असे भिडस्त स्वभावाच्या या ज्येष्ठ कार्यकर्त्याला नेहमी वाटायचे. जाहीर भाषणात मला मान-सन्मानाची अपेक्षा नाही, असे म्हणायचे व नंतर मंत्र्या-संत्र्यांकडे लॉबिंग करून ते मिळवून घ्यायचे अशा लबाड्या म्हणूनच लक्ष्मणदादांना कधी जमल्या नाहीत. राष्ट्रसंतांच्या स्वप्नातील खरा आणि प्रामाणिक गुरुदेवभक्त ते होते. आपण गेल्यानंतर समाजाचे, देशाचे आणि आपल्या कामाचे पुढे काय होईल, अशी चिंता काही सामाजिक कार्यकर्त्यांना उगाच लागून असते. त्या काळजीतून मग ते इच्छा असो नसो आपल्या मुलांवर सामाजिक कार्याचे ओझे लादत असतात. हा सेवेचा पिढीजात वारसा उपजत नसल्याने ते कार्य पुढे व्यावसायिक आणि प्रचारी पद्धतीने रेटले जाते. त्यातूनच त्या कामातील सेवा हळूहळू नष्ट होते आणि प्रसिद्धी व प्रतिष्ठेलाच सामाजिक कार्याचा मापदंड ठरवला जातो. लक्ष्मणदादांशी बोलताना त्यांना अशी चिंता असल्याचे जाणवले नाही. आपल्या पश्चात हे कार्य समाजच पुढे नेईल असे ते सांगायचे. त्यामुळे ते नसताना गुरुदेवभक्तांची जबाबदारी आणखी वाढणारी आहे.