गुरुजनांची निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 01:56 PM2018-06-21T13:56:33+5:302018-06-21T13:56:33+5:30
विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक रणधुमाळी सुरु आहे. राजकीय पक्षांच्या सक्रीय सहभागाने या निवडणुकीला सार्वत्रिक निवडणुकीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
- मिलिंद कुलकर्णी
विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक रणधुमाळी सुरु आहे. राजकीय पक्षांच्या सक्रीय सहभागाने या निवडणुकीला सार्वत्रिक निवडणुकीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. मंत्री, माजी मंत्र्यांच्या उपस्थितीत मेळावे आणि मतदार असलेल्या गुरुजनांसाठी सामीष भोजनावळी होत आहेत. एकंदर चित्र पाहता, समाजातील विशेष वर्गांसाठी तयार करण्यात आलेल्या या मतदारसंघाच्या उपयुक्ततेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. विधिमंडळाच्या या वरिष्ठ सभागृहात समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधी असायला हवे म्हणून खरे तर शिक्षक, पदवीधर यांच्यासाठी महसूल विभागनिहाय मतदारसंघ निर्माण करण्यात आले. त्यासोबतच राज्यपाल हे साहित्य, सांस्कृतिक, उद्योग, व्यापार या क्षेत्रातील दिग्गजांना विधान परिषदेचे सदस्य म्हणून नियुक्त करतात. या तज्ज्ञ, अभ्यासू मंडळींनी खालच्या सभागृहातून आलेल्या विधेयकाविषयी साधकबाधक चर्चा करुन निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा असते. नाशिक विभागाचा विचार केला तर या दोन्ही मतदारसंघातून प्रा.ना.स.फरांदे, जे.यु.ठाकरे यांच्यासारख्या विद्वान व्यक्ती निवडून गेल्या आहेत. परंतु अलिकडे प्रत्येक क्षेत्रामध्ये राजकारण शिरल्याने राजकीय पक्षांनी या मतदारसंघाचाही राजकीय आखाडा बनविला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर जळगावात भाजपाची भूमिकादेखील उघड केली. विधान परिषदेत भाजपाचे बहुमत आणण्यासाठी ही निवडणूक आम्ही प्रतिष्ठेची केली आहे, असे त्यांचे विधान होते. पाटील यांचेच सहकारी असलेल्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी जळगावातील भेटीत पक्षाची त्यापुढील भूमिका मांडली. पक्षात कार्यकर्त्याला महत्त्व आहेच, पण निवडणुकीसाठी सक्षम उमेदवार आयात करणे ही व्यवहारिक बाब आहे. ‘पार्टी विथ अ डिफरंस’ असे म्हणणाऱ्या भाजपाच्या विद्यमान मंत्र्यांची भूमिका लक्षात घेता सत्तेत असलेल्या या पक्षाला कार्यकर्त्यापेक्षा निवडून येणारा उमेदवार महत्त्वाचा वाटत असल्याचे स्पष्ट होते. यापुढे पक्षात कार्यकर्त्यापेक्षा ‘इलेक्टीव मेरिट’ असलेल्या बाहेरील व्यक्तीला पायघड्या अंथरल्या जातील हे सांगायला कोणा ज्योतिषाची आवश्यकता नाही. बहुदा याची कल्पना आल्याने जळगावातील पक्ष मेळाव्याला मंत्री पाटील यांना कार्यकर्त्यांची अर्धा तास वाट पाहावी लागली. अर्थात केवळ भाजपामध्ये ही स्थिती आहे, असे नाही. या निवडणुकीत रिंगणात उतरलेल्या टीडीएफचे तब्बल चार उमेदवार आहेत. भाजपाचे बंडखोर माजी खासदार प्रतापराव सोनवणे भविष्य अजमावत आहेत. कॉंग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या सुपूत्राला भाजपाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे निष्ठावंत कोण याविषयी पक्ष कार्यकर्ता संभ्रमात आहे.