ज्ञानदेवांचा चिद्विलासवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2016 05:53 AM2016-09-22T05:53:54+5:302016-09-22T05:53:54+5:30
संपूर्ण विश्व हे वासुदेव तत्वाने भरले आहे. हे ज्याला समजले तोच खरा ज्ञानी आणि तोच खरा भक्त होय.
संपूर्ण विश्व हे वासुदेव तत्वाने भरले आहे. हे ज्याला समजले तोच खरा ज्ञानी आणि तोच खरा भक्त होय. ज्ञानदेव हेच सूत्र सांगतात...
हे समस्तही श्री वासुदेवो।
ऐसा प्रतितीरसाचा भावो।
म्हणोनी भक्तामाजी रावो।
आणि ज्ञानिया तोचि।
सर्वत्र भरून राहिलेले तेच एकमेव ब्रह्मतत्व आहे. तेच अहैत आहे. तेच चैतन्य आहे. त्या चैतन्याची आराधना हीच परमात्म्याची पूजा होय. हेच चैतन्य प्रत्येक जीवमात्रात वास करीत आहे. म्हणूनच जीवाजीवातील चैतन्याची अनुभूती जेव्हा ज्ञानदेवांना झाली तेव्हा तीच अनुभूती ‘चिद्विलास’ तत्वातून उभी राहिली. ज्ञानदेवांनी एक सुंदर दृष्टांत दिला आहे...
सुवर्णाचे मणि केले।
तेच सोनियाचे सुती ओविले।
तैसे म्या जग धरिले।
सबाह्याभ्यंतरी।
सोन्याचे मणी करावेत आणि सोन्याच्या सुतात ओवावेत मग काय वर्णावे? मणीही सोनेच आणि सुतही सोन्याचेच. सुवर्णाशिवाय दुसरे काही नाही. त्याप्रमाणे विश्व हा परमात्म्याचा विलास आहे.जग हे परमात्म्याने भरले आहे. आणि परमात्माच संपूर्ण विश्वात भरून उरला आहे.
तो चैतन्याच्या अनुभूतीने विश्वरुपात वावरतो आहे. मग परमात्म्यापासून विश्व वेगळे कसे करता येईल? विश्व आणि त्यात भरलेला आत्मा एवढे देखील संभवत नाही. तर अवघा एकच आत्मा आहे आणि त्याला ब्रह्म असे म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज हे रामानुजांप्रमाणे विशिष्टाद्वैती अथवा वल्लभाचार्याप्रमाणे शुद्धाद्वैती नव्हते तर
‘अवघेचित आत्मा’
सांगणारे अद्वैती होते. जो भक्त सर्वत्र पाहतो आणि माझ्या ठायी सर्वांना पाहतो त्याच्या ठायी ऐक्याच्या भूमिकेतून मी सर्व भूतांत सारखाच व्यापून राहिलो आहे. त्यामुळे जीवा-जीवातील भेदानेही त्याच्या ठायी द्वैती उत्पन्न होत नाही.
‘वासुदेव: सर्वमिति’
या वचनाची अनुभूती हीच आहे.
ज्ञानदेवांच्या या विचारातून सकल संतांनी परमात्म्यांचे विश्व उभे केले आणि विश्वाबरोबरच जीवाशिवातील परमात्मा शोधला. त्यातूनच ‘जनता-जनार्दन’ ही संकल्पना रुजली गेली. चिद्विलास तत्व मांडून ज्ञानदेवांनी भागवतधर्माला तत्वज्ञानाची बैठक दिली तर विश्व, त्यातील चैतन्य आणि परमात्मस्वरुप याची अनुभूती चिद्विलासातून मांडली गेली.
आपले शुद्ध कर्म करीत जो नैतिक जीवन जगतो तो कोणीही त्याचा अधिकारी आहे. परमात्म्याच्या स्वरुपाची ओळख करून घेणे हे जसे अध्यात्माचे प्रयोजन आहे तसेच जीवनातील मूल्ये कृतीत उतरवून मानवाला दिव्याकडे नेणे हे देखील अध्यात्माचे सर्वात मोठे प्रयोजन ठरते.
-डॉ. रामचंद्र देखणे