हा एक्स्प्रेस वे की डेथ ट्रॅप...

By admin | Published: June 12, 2016 05:12 AM2016-06-12T05:12:16+5:302016-06-12T05:12:16+5:30

मानवाच्या मेंदूची जशी प्रगती होत गेली तसतसे त्याने जग जवळ आणले. शहरे एकमेकांना जोडली गेली. रेल्वे, विमान वाहतूक, जलवाहतूक आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रस्ते वाहतूक. रस्त्यांच्या माध्यमातून

Haa Express Way's Death Trap ... | हा एक्स्प्रेस वे की डेथ ट्रॅप...

हा एक्स्प्रेस वे की डेथ ट्रॅप...

Next

- तन्मय पेंडसे

मानवाच्या मेंदूची जशी प्रगती होत गेली तसतसे त्याने जग जवळ आणले. शहरे एकमेकांना जोडली गेली. रेल्वे, विमान वाहतूक, जलवाहतूक आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रस्ते वाहतूक. रस्त्यांच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भाग यांच्यातली दरी संपली आणि सुलभ जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू झाला. अशाच रस्त्यांपैकी एक रस्ता म्हणजे पुणे-मुुंबई एक्स्प्रेस वे अर्थात यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग. सुरुवातीच्या काळात सर्वांच्या गळ्यातला ताईत असलेला हा महामार्ग कालांतराने एकापाठोपाठ एक मृत्यूचा मूक साक्षीदार मानला गेला.

आजही २३ डिसेंबर २०१२ चा दिवस आठवला की काळजात चरर्र होते. त्या दिवशी माझा भाऊ अभिनेता अक्षय पेंडसे, माझा २ वर्षांचा पुतण्या प्रत्युष आणि ज्येष्ठ अभिनेते आनंद अभ्यंकर यांना अपघातात प्राण गमवावे लागले, तेही दुसऱ्याच्या चुकीने. एका क्षणात दोन संसार कायमचे उद्ध्वस्त झाले. त्यानंतर माझी एक्स्प्रेस-वेची लढाई सुरू झाली. थोरला भाऊ, पुतण्या आणि आनंद दादा यांना गमावल्यानंतर लक्षात आले की या एक्स्प्रेस-वेने आतापर्यंत सुमारे १४०० पेक्षा जास्त बळी घेतले आहेत. १४,००० पेक्षा जास्त अपघात अशी कुठल्याही एक्स्प्रेस-वेला न शोभणारी बिरुदावली पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेला आहे. या लढाईमध्ये सुरुवातीपासून मित्र व सहकारी कौस्तुभ वर्तक आणि अभिनेते शरद पोंक्षे यांची साथ मिळाली. शहरांमधील अंतर कमी झाले, पण अपघातांमुळे माणसांमधील अंतर हे कायमचे संपले. मग आदर्श हायवे कसा असावा, असा माझ्या मनात प्रश्न पडला. हा रस्ता चांगला बांधला गेला, पण भविष्याचा विचार त्यात झालेला दिसत नाही. २००२ साली सुरू झाल्यानंतरची आणि २०१६ ची परिस्थिती पूर्ण वेगळी आहे. तेव्हा मोजकीच वाहने १०० च्या वेगाने जाऊ शकत होती. आता मात्र सर्वच वाहने साधारणपणे १०० ते १५० कि.मी. प्रति तास या वेगाने जातात आणि वेगमर्यादा आहे ८० कि.मी. प्रति तास आहे.
महाराष्ट्र सरकारच्या अध्यादेशानुसार पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर डावी लेन ही जड वाहनांकरिता, मधली लेन ही हलक्या वाहनांकरिता आणि उजवीकडील लेन ही ओव्हरटेकिंगकरिता आहे, पण सध्याच्या घडीला या नियमांचे उल्लंघन होत आहे. याच्या अंमलबजावणीकरिता महामार्ग पोलीस व शासकीय यंत्रणा यांचा उत्तम समन्वय व सहभाग गरजेचा आहे.
नुकतीच आम्ही एक ‘इंटेलिजन्ट हाय-वे मॉनिटरिंग सिस्टीम’ तयार केली आहे. या माध्यमातून लेन कटिंग करणारी वाहने, ओव्हरस्पीड करणारी वाहने यांचा आपल्याला माग काढता येऊ शकेल. यामध्ये गाडीचा फोटो, गाडीचा नंबर आपल्याला ट्रेस करता येतो आणि आर.टी.ओ.बरोबर हा डाटा बेस जोडला तर संबंधित वाहनचालकाला समन्स बजावता येऊ शकते. फक्त दंड करणे हा त्यावरील उपाय नाही. वाहनचालकांचे प्रबोधन करणे, त्यांना यामागील भीषणता समजून देणे आणि दंडसुद्धा कमीत कमी ५ हजार ते १० हजार केला गेला पाहिजे. तसेच एक ते दोन दिवस स्थानबद्ध करणे गरजेचे आहे. तीनदा समन्स गेल्यावर ६ महिन्यांकरिता संबंधित वाहनचालकाचा परवाना रद्द करणे अशा प्रकारच्या कठोर उपायांची अंमलबजावणी करणे, त्यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्हींचा वापर
आवश्यक आहे. अशामुळे बेदरकार चालकांवर आळा बसू शकेल.
एक्स्प्रेस वेवर अपघातानंतर आजमितीला ट्रॉमा केअर सेंटरची सुविधा उपलब्ध नाही. त्यासाठी दोन्हीकडे मिळून किमान १० ट्रॉमा अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था शासनाने करणे गरजेचे आहे. जेणेकरून अपघातानंतर हॉस्पिटलमधे पोहोचण्याचा वेळ वाचू शकेल. यामुळे अपघातग्रस्ताचे प्राण वाचतील. नुकतीच ओझर्डेला ट्रॉमा केअर युनिटची बांधणी झाली आहे आणि ते लवकरात लवकर सुरू होईल अशी चिन्हे दिसत आहेत. पण तूर्तास तरी ते बंद आहे. तसेच मुंबईकडील बाजूसही एक ट्रॉमा केअर युनिट डॉक्टरांसह सुसज्ज असणे गरजेचे आहे आणि त्यासंबंधीचे प्रशिक्षण संबंधितांंना देणे अत्यावश्यक आहे. या गोष्टी केल्यानंतर निश्चितपणे अनेकांचे प्राण वेळीच वाचू शकतील. अपघात झाल्यानंतरची त्वरित माहिती ही आपल्याला ‘इंटेलिजन्ट हाय-वे मॉनिटरिंग सिस्टीम’ या यंत्रणेतून मिळू शकते.
महामार्गावर ज्या वळणांवर वारंवार अपघात होतात त्यांना अतिधोकादायक म्हणून घोषित करावे. त्या ठिकाणी विविध रिफ्लेक्टर्सचा वापर करून वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवता येणे शक्य होईल. मात्र पुणे-मुुंबई महामार्गावर काही जागा वगळता अशी कुठलीही सुविधा उपलब्ध नाही. घातक वळणांवर लाल रंगांचे रिफ्लेक्टर्स वापरणे अत्यंत गरजेचे आहे, की जेणेकरून वाहनचालकाला रस्त्यावर वळण आहे, याचा अंदाज येईल.
महामार्गावर वाहनचालक अतिजलद वेगाने वाहने चालवतात. यामुळे सर्व शासकीय आणि खासगी बस यांना स्पीड गव्हर्नन्स असणे आवश्यक आहे. फुड मॉल, पेट्रोल पंप येथे इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेच्या माध्यमातून अपघातांच्या वेगवेगळ्या फिल्म्स दाखवून आपल्यावरही ही परिस्थिती ओढवू शकते, याची जाणीव करून देता येऊ शकते. स्पीडगन आणि ब्रेथ अ‍ॅनालायझरच्या साहाय्याने आपल्याला वेगावर नियंत्रण ठेवता येऊ शकेल.
पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे सत्र सुरू होते. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. हे टाळण्यासाठी पुणे-मुुंबई एक्स्प्रेस वेवर दर १० कि.मी.वर गँट्री उभ्या करून इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल डिस्प्लेच्या साहाय्याने अपघातग्रस्त ठिकाणाची इत्थंभूत माहिती इतर वाहनचालकांना देता येऊ शकते. कमांड सेंटर तसेच मोबाइल व्हॅन्सच्या माध्यमातून कोंडी टाळता येऊ शकते आणि इतर वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यासाठी तंत्रज्ञानाचा असा उत्तम वापर कमी मनुष्यबळात आपल्याला करता येईल. यामध्ये आपल्या रेडीओ वाहिन्यांना सहभागी करता येईल. तरी कोंडी झालीच तर वाहतूक पोलिसांनी जड वाहनांसाठी ट्रॅफिक बे निर्माण करणे गरजेचे आहे, की जेणेकरून अशा परिस्थितीत जड वाहने तिथे थांबू शकतील आणि हलकी वाहने हळूहळू मार्गस्थ होऊ शकतील. त्यासाठी वाहतूक पोलिसांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. जे लांब पल्ल्याचे ड्रायव्हर आहेत त्यांच्या विश्रांतीसाठी नुकत्याच झालेल्या बैठकीत २ जागा निश्चित करण्याची माहिती समोर आली आहे.
आता महामार्गाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर ट्रॉमा केअर युनिट्स, उत्तम सर्व्हिस लेन्स बांधणे, अ‍ॅम्ब्युलन्स व प्रशिक्षित मनुष्यबळ आणि रस्त्यांची उत्तम देखभाल करणारी यंत्रणा उभारली पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे दर पाच वर्षांनी रस्त्याच्या दर्जाची तपासणी झालीच पाहिजे.
सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंंदे तसेच परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी या कामी मला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद कायमच दिला आहे. शरद पोंक्षेंच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत मातोश्रीवर अत्यंत सकारात्मक बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नुकत्याच झालेल्या आमच्या उच्चस्तरीय बैठकीत पुढील गोष्टींचे निर्देश दिले आहेत. (लेखक रस्ते सुरक्षा अभ्यासक आहेत.)

महामार्गावरील चार घटक महत्त्वाचे...
ट्रॅफिक बॅलन्स हा मुख्यत चार घटकांवर अवलंबून असतो. यात इंजिनीअरिंग, एज्युकेशन, एनफोर्समेंट आणि इमर्जन्सीचा समावेश आहे. यातील इंजिनीअरिंग पूर्ण झाले पण काही अंशी एज्युकेशन, एनफोर्समेंट आणि इमर्जन्सी याची अजूनही मुंंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कमतरता आहे.

ही यंत्रणा आहे का? रस्त्यावर वाहन चालविण्याचे प्रशिक्षण, लेन सिस्टीम पाळणे, वेगावर नियंत्रण, गाडी उत्तम स्थितीत असणे, मोबाइलवर न बोलणे, टायर वेळोवेळी तपासून घेणे. वेळोवेळी रस्ता सुरक्षा अभियानाचा, तंत्रज्ञानाचा उत्तम व कल्पक वापर. या नियमांची सर्व चालकांनी अंमलबजावणी केल्यास अपघातांची संख्या निश्चितपणे कमी होऊ शकेल. संपूर्ण एक्स्प्रेस वेला ब्रायफेन रोपचा वापर करणे. (ज्याला मंजुरी मिळाली आहे) मोबाइल रडार, स्पीडगन्स, थर्मल कॅमेरे, उत्तम दर्जाचे कमांड सेंटर. मद्यपान करून गाडी चालवू नका, सीट बेल्ट लावा, ओव्हरस्पीडिंग करू नका, अशा आॅडिओ मेसेजेसचा वापर

एक्स्प्रेस-वे आदर्श
कसा असावा?
रस्त्याचे उत्कृष्ट बांधकाम
अपघातांवर नियंत्रण
उत्तम वैद्यकीय व्यवस्था
आपत्ती निवारण व्यवस्था
मृत्यूचे अत्यल्प प्रमाण
तंत्रज्ञानाचा उत्तम व कल्पक वापर
उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाला उत्तम असे प्रशिक्षण
अपघात आणि आपत्ती
टाळण्यासाठी नवनवीन
कल्पनांचा वापर
उत्तम सर्व्हिस लेन्स

सीसीटीव्हीचे महामार्गावर जाळे उभारणे
डेल्टा फोर्सच्या विशेष टास्क फोर्सची निर्मिती
संपूर्ण महामार्गावर ब्रायफेन रोपची उभारणी
प्रभावी अंमलबजावणीसाठी महामार्ग पोलीस आणि परिवहन या विभागाने ३६५ दिवस पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देणे.
ओझर्डे येथे एमएसआरडीसीच्या माध्यमातून उभारण्यात आलेले ट्रॉमा केअर सेंटर पी.पी.पी. तत्त्वावर चालू करणे.
यमुना एक्स्प्रेस वे (अंतर १६५ कि.मी.), भारतातील सर्वात जास्त लांबीचा नियंत्रित ६ लेन्सचा एक्स्प्रेस वे, सीसीटीव्ही, एस.ओ.एस. बुथ आणि मोबाइल रडार, दर २५ कि.मी.वर हायवे पेट्रोलिंग.

११ उड्डाणपूल, ४ टोलनाके. ३२ टोलनाके दिल्ली-हरियाणा बॉर्डरवर. दक्षिण आशियामधील दुसऱ्या क्रमांकाचा, दर दीड कि.मी.वर एस.ओ.एस. सुविधा. ४७ कि.मी.चे सर्व्हिस रस्ते, सीसीटीव्ही.

Web Title: Haa Express Way's Death Trap ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.