लेनेके देने पडे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2016 11:00 PM2016-09-14T23:00:08+5:302016-09-14T23:00:08+5:30
‘मजाक मजाक’मध्ये आपण आपल्या कार्यक्रमात पाहुण्यांपासून प्रेक्षकांपर्यंत साऱ्यांच्या टोप्या उडवतो आणि ते सारेच ती बाब हसण्यावारी नेतात आणि करमणूक करण्याचा आपला हेतू साध्य होतो
‘मजाक मजाक’मध्ये आपण आपल्या कार्यक्रमात पाहुण्यांपासून प्रेक्षकांपर्यंत साऱ्यांच्या टोप्या उडवतो आणि ते सारेच ती बाब हसण्यावारी नेतात आणि करमणूक करण्याचा आपला हेतू साध्य होतो, तेव्हां वास्तव जीवनातही आपण तसेच काही करुन आपला हेतू साध्य करुन घेऊ असा काही विचार कपिल शर्मा यांनी केला असावा. पण आपण ज्या ‘रिअॅलिटी शो’मुळे प्रसिद्धीच्या शिखरावर आज पोहोचलो आहेत त्यातील रिअॅलिटी आणि वास्तवातील रिअॅलिटी यामधील अंतर एव्हाना त्यांच्या लक्षात आले असावे. कारण गेल्या सप्ताहात भल्या सकाळी त्यांनी टिवटिवाट करुन जो गोंधळ उडवून दिला त्यापायी खुद्द त्यांच्यावरच ‘लेने के देने पडे’ अशी वेळ येऊन ठेपली आहे. मुंबईतील शर्मा यांंच्या कार्यालयाच्या कामासाठी मुंबई महापालिकेच्या कुणा (आजही अज्ञात) अधिकाऱ्याने पाच लाखांची लाच मागितल्याची तक्रार त्यांनी टिवटिवली व तसे करताना त्यात थेट पंतप्रधानांना खेचून घेतले. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी लगोलग या तक्रारीची दखल घेतली आणि टीकेचे भले मोठे मोहोळ अंगावर ओढवून घेतले. पण मुख्यमंत्री जातीने दखल घेतात म्हटल्यावर त्यांच्या हाताखालचेही सारे जातीने दक्ष झाले आणि त्यातून बाहेर पडला तो चक्क कपिल यांचाच कांगावखोरपणा. त्यातून एक शक्यता अशी दिसून येते की, आता त्यांच्यावर अनधिकृत काम करण्याचा आणि खारफुटीचे वाटोळे करण्याचा जो ठपका ठेवला गेला आहे, त्याची दाबादाबी करण्यासाठीच कुणा दयाळू अधिकाऱ्याने पाच लाख मागितले असावेत व शर्मांना ते फुकटात करुन हवे असावे. पण त्यांनी पंतप्रधानांच्या जाकिटालाच हात घातला आणि स्वत:च्या हातांनी स्वत:च्या पायांवर कुऱ्हाड मारुन घेतली. केवळ कार्यालयामध्येच नव्हे तर निवासस्थानीदेखील अनधिकृत बांधकाम करणे, खारफुटीची जमीन उद्ध्वस्त करुन सागरी किनारा प्रदेशात बांधकामासंबंधी असलेले निर्बन्ध उल्लंघिणे अशा अनेक आरोपांचे सुरे आता त्यांच्या दिशेने परजले जाऊ लागले आहेत. त्यांनी महापालिकेतील अधिकारी भ्रष्ट असल्याचा स्पष्ट आरोप केल्यामुळे तिथे सत्ता असलेली सेना-भाजपा युती तर खवळलीच आहे पण मनसे, सपा आदि पक्षदेखील (नजरेसमोर निवडणूक दिसत असल्याने) कपिलवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याच्या विचारात आहेत. तरीही हे कमीच म्हणून की काय ज्या खासगी चित्रवाणीवर त्यांचा कार्यक्रम सध्या सुरु आहे त्या चित्रवाणीनेही हा कार्यक्रम संपविण्याचा म्हणे निर्णय घेतला आहे. मोदींशी कोण कशाला पंगा घेईल?