‘मिशन शक्ती’बद्दल वैज्ञानिकांना सलाम!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 07:52 AM2019-04-01T07:52:57+5:302019-04-01T07:53:19+5:30
जमिनीवरून एक क्षेपणास्त्र सोडून भारताने अंतराळातील स्वत:च्याच एका उपग्रहाचा अचूक वेध घेऊन तो नष्ट करण्याची ‘मिशन शक्ती’ मोहीम यशस्वी केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात केली
विजय दर्डा
जमिनीवरून एक क्षेपणास्त्र सोडून भारताने अंतराळातील स्वत:च्याच एका उपग्रहाचा अचूक वेध घेऊन तो नष्ट करण्याची ‘मिशन शक्ती’ मोहीम यशस्वी केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात केली आणि भारतीय अंतराळ संशोधन संघटनेच्या (इस्रो) व संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडीओ) वैज्ञानिकांनी आपल्या कर्तृत्वातून प्रत्येक भारतीयाची मान गर्वाने पुन्हा एकदा ताठ केली. सध्या लोकसभा निवडणुकीचा हंगाम असल्याने मोदींनी नाट्यमयरीत्या ही घोषणा करून वैज्ञानिकांच्या यशाचे राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही स्वाभाविकपणे झाला. ज्यांनी ही कामगिरी फत्ते केली त्यांनीच त्याची घोषणा करायला हवी होती, असे हा आक्षेप घेणाऱ्यांचे म्हणणे होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर उपग्रहाचा हा लक्ष्यभेद करण्याची काही गरज होती का, असाही प्रश्न उपस्थित केला गेला. ही कामगिरी भाजपाचे सरकार येण्याआधी चार वर्षांपूर्वीही करता आली असती, असेही म्हटले गेले. त्यासाठी त्या वेळच्या निर्णयाचे दाखलेही दिले गेले.
यावरून नंतर आरोप-प्रत्यारोपांची मालिकाच सुरू झाली. भाजपाचे नेते म्हणू लागले की, वैज्ञानिकांची ही चाचणी घेण्याची आधीपासूनच तयारी होती, पण त्या वेळच्या काँग्रेस सरकारने त्यांना त्यासाठी परवानगी दिली नाही. याला उत्तर देताना काँग्रेसने स्पष्ट केले की, या योजनेवर सन २०१२ मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारच्या काळातच काम सुरू झाले होते. परंतु या पद्धतीची महान वैज्ञानिक उपलब्धी असलेल्या बाबींचे कधीही कोणी राजकारण करू नये, असे माझे स्पष्ट मत आहे. आपले वैज्ञानिक किती मेहनतीने आणि समर्पणाच्या भावनेने काम करत असतात याची आपल्याला बाहेर बसून कल्पनाही येणार नाही. संयुक्त संसदीय समितीचा सदस्य या नात्याने सुमारे पाच वर्षांपूर्वी मी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ प्रक्षेपण केंद्रात गेलो होतो. तेथील वैज्ञानिकांची निष्ठा व कामात झोकून देण्याची वृत्ती मी स्वत: अनुभवली आहे. तेथील वातानुकूलित खोल्यांमध्येही त्यांच्या कपाळावर येणारा घाम मी पाहिला आहे. तेथील वैज्ञानिकांनी मला सांगितले की, नव्या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्याआधी त्याची प्रतिकृती भगवान बालाजीला अर्पण करण्यासाठी आम्ही घेऊन गेलो तेव्हा आमच्यावर वैज्ञानिक धर्माच्या आहारी गेल्याची टीका झाली. अशा प्रकारच्या राजकारणाने या वैज्ञानिकांना नक्कीच मानसिक क्लेष होतात. वैज्ञानिक असले तरी एक व्यक्ती म्हणून त्यांनाही धर्म व श्रद्धा आहेतच की! ते आपली कामगिरी वैज्ञानिक उपलब्धी म्हणून पाहतात, राजकारणाच्या नजरेतून नव्हे!
तुम्हाला सांगितले तर आश्चर्य वाटेल की, पाकिस्तानच्या नंतर एक वर्षाने म्हणजे सन १९६२ मध्ये भारताने अंतराळ संशोधन कार्यक्रम सुरू केला. आज या क्षेत्रात आपण पाकिस्तानच्या कितीतरी पुढे आहोत. याचे कारण एकच की, आपल्याकडे केंद्रात कोणत्याही पक्षाची सत्ता असली तरी अंतराळ संशोधनाच्या कार्यक्रमाला नेहमीच प्रोत्साहन दिले गेले.
अंतराळ विज्ञानाच्या बाबतीत भारताने प्रगती करत यशाचे शिखर गाठावे, हे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे स्वप्न होते. त्यांचे विश्वासू सहकारी व थोर वैज्ञानिक डॉ. विक्रम साराभाई यांनी ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. सन १९६२ मध्ये भारतीय अंतराळ संशोधन समितीची स्थापना झाली. त्यानंतरची यशोगाथा देदीप्यमान आहे. ती पाहता केवळ नेहरूच नव्हे, तर सर्वच पंतप्रधानांनी या कार्यक्रमास प्रोत्साहन दिले हे उघड आहे. मला हे सांगावेसे वाटते की, ३० डिसेंबर १९७१ रोजी डॉ. साराभाई यांचे अचानक निधन झाले तेव्हा ‘इस्रो’ची धुरा कोणाकडे सोपवायची, असा मोठा प्रश्न निर्माण झाला. सर्वांचे लक्ष अमेरिकेत काम करणाऱ्या प्रा. सतीश धवन यांच्याकडे होते. त्यांच्याशी संपर्क साधला गेला, पण डॉ. धवन यांनी लगेच भारतात परत येण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात प्रा. एम.जी.के. मेनन यांना अध्यक्ष केले गेले. प्रा. धवन यांना भारतात येण्यास उद्योगपती जे.आर.डी. टाटा यांनी राजी करावे, असा आग्रह तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी धरला. तेव्हा त्याचे महत्त्व लक्षात घेत टाटांनी शब्द टाकला आणि प्रा. धवन तयार झाले! ही पार्श्वभूमी समजून घेतली, तर आज आपण ‘इस्रो’च्या यशाबद्दल बोलतो तेव्हा इंदिराजींचे योगदान विसरता कसे येईल? इंदिराजींनी १९७२ मध्ये अंतरिक्ष आयोगाची स्थापना केली. त्याच आयोगाच्या कक्षेत ‘इस्रो’ काम करते.
त्यामुळे आधीच्या सरकारने काहीच केले नाही, जे केले ते फक्त आम्हीच, असे कोणी म्हणणे पूर्णपणे अयोग्य आहे. वास्तव असे आहे की, चीनने सन २००७ मध्ये जेव्हा क्षेपणास्त्राने उपग्रह नष्ट करण्याची क्षमता विकसित केली तेव्हाच भारतानेही या दिशेने काम सुरू केले होते. याचे कारण देशाच्या सर्वांगीण संरक्षणासाठी ही क्षमता विकसित करणे नितांत गरजेचे होते. आता बॅलेस्टिक क्षेपणास्त्रविरोधी संरक्षण सज्जतेत भारत वेगाने प्रगती करेल. भारत आपली धोरणे वेगाने बदलत आहे, याचेही हे द्योतक आहे. खरोखरच युद्धाची वेळ आली, तर शत्रूची अण्वस्त्रेही हवेतल्या हवेत नष्ट करण्याची क्षमता भारत आत्मसात करू शकेल. या अभिमानास्पद कामगिरीबद्दल वैज्ञानिकांना माझा सलाम!
(लेखक लोकमत समुहात एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन आहेत)