प्रसन्नता आणि प्रेम... दुसरे कुठे काय लागते?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 08:57 AM2021-10-27T08:57:06+5:302021-10-27T08:58:50+5:30

प्रसन्नता हेच धर्माचे खरे लक्षण आहे. धार्मिक व्यक्तीमध्ये प्रेमाचा स्वाभाविक उगम होतो. या प्रसन्नतेतून जीवनाचा प्रसाद मिळतो.

Happiness and love ... where else? | प्रसन्नता आणि प्रेम... दुसरे कुठे काय लागते?

प्रसन्नता आणि प्रेम... दुसरे कुठे काय लागते?

Next

- गुरुदेव श्री श्री रविशंकर 
प्रणेते, ‘दी आर्ट ऑफ लिविंग’

अनेकदा मला हे कळत नाही, की आपल्या एकमेकांपासून वेगवेगळे असण्याची आपल्याला इतकी भीती का वाटते? विविधता हाच मानवी जीवनातला खरा आनंद आहे, एवढेच कशाला?-  निसर्गालादेखील विविधताच भावते ! मला एक सांगा, विविधता वजा केली तर आपले आयुष्य किती बेजान होऊन जाईल, याची कल्पना तरी तुम्ही करु शकता का? मानवी जीवन सर्व प्रकरच्य विविधतेविना व्यर्थ आहे, तरीही   विविधतेचा आपल्याला इतका द्वेष का? वेगळ्या धर्माची, वर्णाची, विचारांची माणसे आपल्या रागाचे कारण का ठरतात? 
मुळात  हा द्वेष निर्माण होतो तणावातून !  प्रत्येकाची काही ना काही मागणी असते व काही जबाबदाऱ्यादेखील असतात. पण कसलीही जबाबदारी न घेता आपण केवळ मागण्याच वाढवत गेलो तर दु:ख वाट्याला येते. दु:खी व्यक्तीचा कुठलाही धर्म नसतो. तो समाजात व्यक्ती म्हणवून घेण्यासदेखील पात्र नसतो. 

तसे पाहिले तर लोकांना बांधून ठेवतो तो धर्म. आपल्या सर्व संतांनी सर्वेपि सुखिन: सन्तु हाच मूलमंत्र दिला.  प्रत्येक धर्म, पंथाची स्वत:ची विशेषत: आहे. हेच पाहा ना, देवालादेखील विविधता आवडत असली पाहिजे,  म्हणूनच निसर्गात त्याने विविध भाज्या, फुले, फळे निर्माण केली ना? एकच बटाटा आहे, तोच् खात बसा आयुष्यभर; असे असते तर आपले जीवन किती बेचव झाले असते? 
वेगळेपणा, वैविध्य हेच जगण्यातले खरे आव्हान आणि रसही! या विविधतेने बुद्धिमान लोक आनंदित होतात तर तेच कारण करुन मूर्ख एकमेकांशी लढतात. भगवान बुद्ध एकच होते, मात्र बौद्ध धर्मात ३२ वेगवेगळ्या शाखा आहेत. येशू ख्रिस्त एकच होते, पण ख्रिश्चन धर्मात ७२ शाखा आहेत. इस्लाममध्येदेखील असेच आहे ! हिंदू धर्मात तर अगणित शाखा आहेत. या सर्वच धर्मांमध्ये अंतर्गत वैविध्यही आहे.  सर्वधर्मसमभाव व विविधता ही भारताची विशेषताच आहे. सर्वांना सोबत घेऊन सर्वांचा सन्मान करणे हीच या देशाची संस्कृती आहे, असली पाहिजे, टिकलीही पाहिजे!  आमचाच धर्म सर्वश्रेष्ठ आणि आमच्याच देवतेच्या  पूजनानेच मोक्ष मिळेल असा विचार करणे, आग्रह धरणे चुकीचे आहे. असे बोलून काही लोक विद्वेष निर्माण करण्याचे काम करतात. 

तुमची मुले कशी असावीत असे तुम्हाला वाटते? ती हसती-खेळती रहावीत, आनंदी असावीत असेच वाटते ना? आनंदाचे, प्रसन्नतेचे भोक्ते असलेले लोक प्रार्थनास्थळात गेल्यावर मात्र  अचानक गंभीर होतात. असे का असावे? गंभीर मुद्रेत असणे म्हणजेच खूप मोठे धर्मात्मा असणे असे काही असते का? प्रसन्नता हेच धर्माचे खरे लक्षण आहे. धार्मिक व्यक्तीमध्ये प्रेमाचा उगम होतो. प्रसन्नतेतून प्रसाद मिळतो. या पद्धतीने आयुष्याला सुंदर बनवता येऊ शकते. 

अध्यात्म सर्व लोकांना जोडते कारण ते मानवी-ऊर्जेशी संबंधित असते. याच शक्तीच्या बळावर मी इराकमध्ये केलेल्या एका प्रयोगाबद्दल सांगितले पाहिजे. इराकमध्ये युद्ध व तणावाची स्थिती असताना मी तेथील राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावरून त्या देशात गेलो होतो. परिस्थिती गंभीर होती. संभाव्य धोक्यांची तयारी म्हणून शहराचे तीन भाग पाडले होते :   रेड, यलो व ग्रीन झोन ! ग्रीन झोन अतिशय सुरक्षित होता. मी तेथे पोहोचल्यावर माझीदेखील ग्रीन झोनमध्येच व्यवस्था करण्यात आली.  सुरक्षाव्यवस्था इतकी कडेकोट की माझा श्वास घुसमटायची वेळ आली ! आगेमागे दोन शस्त्राधारित लष्करी वाहने आणि आजूबाजूला डझनाहून अधिक गाड्यांचा ताफा ! शेवटी मी म्हटले,  मी इराकमध्ये असा किल्ल्यात रहायला  आलो नाही, मला रेड झोनमध्ये जायचे आहे!”- माझे कुणी ऐकेना ! रेड झोनमध्ये मोठा धोका आहे असे जो तो सांगू लागला. मी  बिलकूल हार मानली नाही. म्हटले, मला जायचेच आहे! शेवटी यलो झोनच्या सीमेवर मला सोडले जाईल, तिथून मी स्वतःच्या जबाबदारीवर रेड झोनमध्ये जावे असे ठरले. मी मान्यता दिली आणि गेलो. 

 रेड झोनमधल्या लोकांनी माझे भरघोस स्वागत केले. ते लोक मला म्हणत होते, पहिल्यांदाच आमचे सुख-दु:ख वाटून घेण्यासाठी कुणीतरी आले आहे ! त्यादिवशी त्यांचा निरोप घेताना मी म्हटले, उद्या परत येईन तेव्हा माझ्यासोबत काही खास व्यक्तींना घेऊन येईन ! 
रेड झोनमधल्या लोकांनी त्यांच्या विरोधी गटातील आठ हजार कुटुंबीयांची त्यांच्या वस्तीतून हकालपट्टी केली होती. हाकलून लावल्या गेलेल्या त्या लोकांच्या प्रतिनिधींना घेऊन दुसऱ्या दिवशी मी रेड झोनमध्ये  गेलो. एकच भडका उडाला. लोक रागाने संतप्त झाले होते. ठिणग्या उडत होत्या. हलके हलके  राग निवळत गेला. मी फक्त तिथे होतो, मध्यस्थीचा-समजूत घालण्याचा प्रयत्न करत होतो. हलके हलके दोन्ही गट शांत झाले. 
 शेवटी मी म्हटले, हे तुमचेच बांधव आहेत, आता त्यांना परत इथे परतू द्या !

- रेड झोनमधल्या लोकांनी मान्यता दिली आणि काही तासांपूर्वी एकमेकांवर आग ओकणारे लोक परस्परांना मिठीत घेऊन आनंदात बुडून गेले. युद्धग्रस्त इराकसाठी तो मोठा टर्निंग पॉईंटच ठरला. निर्वासित झालेली आठ हजार कुटुंबे स्वगृही परतली. 
-  वाद, वैमनस्य यांचे समाधान फक्त संवादातून आणि  योग्य वेळी, योग्यप्रकारे झालेल्या  मध्यस्थीमुळे शक्य होते. प्रत्येक व्यक्तीत ही क्षमता आहे. वादाच्या आगीत तेल न टाकता वादांचे निराकरण करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे... कारण तेदेखील धर्माचेच काम आहे! 

(शब्दांकन : योगेश पांडे, नागपूर)
 

Web Title: Happiness and love ... where else?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.