हॅपिनेस: विधायक सृजनतेची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 08:03 AM2020-04-25T08:03:07+5:302020-04-25T08:04:30+5:30
‘मी आणि माझं’ ही अतिमहत्त्वाकांक्षा कोरोनाच्या लढाईनंतर बदलावी लागेल. विद्यमान स्थितीत केजरीवाल- सिसोदिया यांनी हॅपिनेसच्या निमित्ताने दाखविलेली विधायक सृजनता हे देशाचे शुभवर्तमान ठरू शकते.
- विकास झाडे, संपादक, लोकमत दिल्ली
आज टाळेबंदीला महिना झाला. सगळ्यांना घरात थांबणं नकोसं झालंय. सर्वसामान्य चित्र असे आहे की, घरातील सगळे सदस्य एकत्र असूनही त्यांच्यात ‘संवाद’ नाही. प्रत्येकजण परिवारासाठीच खस्ता खातो; परंतु स्वत:ची ‘स्पेस’ नाही, अशी भावना त्यांच्यात निर्माण होत आहे. कोरोनामुळे देशात आर्थिक आणीबाणी येईल, या भीतीने आपल्या परिवाराचे भविष्य सुखावह होणार की नाही? असे प्रश्न त्यांना ग्रासत आहेत. यामुळे जीवनातील व्यक्तिगत आनंद संपुष्टात आला आहे.
दुसरीकडे मोबाईलवर विविध अॅप्सच्या माध्यमातून धडकणाऱ्या माहितीमुळे त्यांच्यातील अस्वस्थता वाढली आहे. कोणाचातरी द्वेष करण्याची, अमानवीय पद्धतीने व्यक्त होण्याची दुर्बुद्धीही अनेकांमध्ये दिसून येते. अनेकांच्या मनाचा ताबा व्हॉट्स अॅप, फेसबूक, ट्विटरने मिळविला आहे. क्लेश, भय, दहशत, धर्मांधता, आदी गोष्टींचे बीजारोपण या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोनाविरुद्ध लढताना लोकांच्या टाळक्यांमध्ये केली जाणारी अविवेकी पेरणी घातक ठरेल. टीव्हीवरही यापेक्षा वेगळे दृश्य नाही. काही बातमीदार आगळं-वेगळं देत असल्याचे भासवून समाजमन बिघडविण्याचे काम करीत असतात. आपल्या पाठीशी ‘शक्तिमान नेते’ असल्याचा उन्माद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतो. ‘ग’ची बाधा झालेल्या अशा व्यक्तींना तोंडाचा अतिसार होतो अन् त्याचे त्याला शल्यही वाटत नाही. हाच आपला धर्म म्हणून ते मिरवतात. पालघर येथील क्लेशदायक घटनेच्या निमित्ताने अशा काही व्यक्ती समाजापुढे आल्यात, हे देशाचे दुर्दैव म्हणावे लागेल.
हा झाला एक भाग; परंतु संकटातून बाहेर पडू आणि पुन्हा आनंददायी जीवन जगू, अशी हिंमत देणारेही अनेकजण आहेत. दिल्ली सरकारचे पाऊल त्याच दिशेने आहेत. ‘हॅपिनेस क्लास’च्या माध्यमातून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी केलेला प्रयोग जगात चर्चेचा विषय ठरला. चांगली पिढी निर्माण व्हावी. केवळ कष्ट व दडपण नव्हे, तर तणावमुक्त होऊन विद्यार्थ्यांना आनंदाने जगता यावे, ही त्यामागची संकल्पना आहे. दिल्लीच्या शाळांमध्ये काही महिन्यांपूर्वी ‘आनंद अभ्यासक्रम’ सुरू झाला. जीवन सुंदररीत्या जगता येऊ शकते याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली. फेब्रुवारीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात आले, तेव्हा त्यांची पत्नी मिलेनिया ट्रम्प यांनी ‘हॅपिनेस क्लास’ला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या उपक्रमाचे त्यांनी कौतुकही केले. सद्य:स्थिती पाहत केजरीवाल यांनी पालकांनाही ‘हॅपिनेस क्लास’मध्ये सहभागी करून घेतले आहे. समाजमाध्यमे विध्वंसक अस्त्रांचे रूप धारण करत असतानाच तिचा वापर विधायक कार्यासाठीही होऊ शकतो, याचा प्रत्यय ते देत आहेत. फेसबूक लाईव्ह व यूट्युबच्या माध्यमातून ‘हॅपिनेस क्लास’ घराघरांत पोहोचले. या वर्गात स्वसंमोहनापासून तर विविध उद्बोधक कथेच्या माध्यमातून प्रबोधन केले जाते. खरं तर सर्वच राज्ये व केंद्र सरकारने राजकारणापलिकडे जाऊन या उपक्रमाचे अनुकरण करण्याची गरज आहे.
यंदाचा वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट जाहीर झाला आहे. यात २०१७ ते २०१९ या कालावधीतील १५३ देशांचे सर्वेक्षण केले आहे. सामाजिक समर्थन आणि विश्वास, प्रामाणिक सरकारे, सुरक्षित वातावरण, निरोगी जीवन, नैसर्गिक व शहरी वातावरण हे सगळे एकत्रित केल्यानंतर आपल्या आनंदावर त्याचा कसा परिणाम होतो, सामाजिक विश्वासाने अडचणींचे ओझे कमी होते, या बाबी त्यात अधोरेखित करण्यात येत असतात. या हॅपिनेस इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक १४४ वा लागतो. फिनलँड, डेन्मार्क, स्वित्झर्लंड, आईसलॅँड, नॉर्वे, नेदरलँड, स्वीडन, न्यूझिलंड, ऑस्ट्रिया, लुक्सेमबर्ग हे आनंदी असलेले पहिले १0 देश आहेत. यूके १३व्या, तर अमेरिका १८व्या स्थानावर आहे. शेजारी पाकिस्तान ६६व्या क्रमांकावर आहे. गेल्या काही वर्षांत भारत महाशक्तिमान होत असल्याच्या वल्गना करणाऱ्या आणि देश किती महान आहे, याचे पौराणिक आणि ऐतिहासिक दाखले देतानाच हिरव्या, निळ्या, भगव्या रंगात विभाजन करणाऱ्यांना आपण जगात नेमके कुठे आहोत, याची या अहवालाच्या निमित्ताने ओळख होण्याची गरज आहे.
दक्षिण आफ्रिका आणि नेल्सन मंडेला यांनी जगाला ओळख करून दिलेल्या ‘उबुंटू’मध्ये माणसाने माणसाला माणसासारखे वागवावे, हे वास्तव मांडले आहे. प्रेम, सत्य, शांतता आणि आनंद ही ‘उबुंटू’ची बलस्थाने आहेत. मागे असलेल्यांसाठी थांबणे व त्याला सोबत घेऊन सरतेशेवटी ‘आम्ही सर्व जिंकलो’ हा स्पर्धेतील एकत्रित आनंद व्यक्त करताना सामुदायिक दायित्व व मानवीयतेचा वास्तववादी अर्थ ‘उबुंटू’मध्ये उलगडतो. ‘आय अॅम बिक्वॉज वुई आर’ ही भावना यामागे अभिप्रेत आहे; मात्र, याउलट स्थिती भारतात आहे. आपण अमेरिकन आणि युरोपीयन जीवनशैली अंगीकारली. जागतिकीकरणाच्या रेट्यात जीवन आत्मकेंद्री झाले. १२ ते १४ तास काम करायचे आणि खूप पैसा मिळवायचा, हे तरुणपिढीचे लक्ष्य ठरले. जीवनाची सर्वसमावेशकता टांगणीस ठेवून अतिरेकी गरजा वाढविल्या. संत ज्ञानेश्वरांनी जे पसायदान मागितले ते संपूर्ण जीवसृष्टीसाठी होते. ‘भूतां परस्परें पडो। मैत्र जीवांचे॥’ हे आम्ही विसरून त्यांची शिकवण केवळ संदर्भग्रंथापुरती मर्यादित ठेवली. ‘मी आणि माझं’ ही अतिमहत्त्वाकांक्षा कोरोनाच्या लढाईनंतर बदलावी लागेल. विद्यमान स्थितीत केजरीवाल- सिसोदिया यांनी हॅपिनेसच्या निमित्ताने दाखविलेली विधायक सृजनता हे देशाचे शुभवर्तमान ठरू शकते.