आरोग्यदायी दिवाळीच्या शुभेच्छा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 01:08 AM2020-11-14T01:08:15+5:302020-11-14T01:08:20+5:30
सण-उत्सवांमध्ये उत्साहाच्या भरात या त्रिसूत्रीचा विसर पडण्याची दाट शक्यता आहे.
यंदाची दिवाळी ही वेगळी आहे, असे गेल्या काही दिवसांपासून वरचेवर कानावर पडत आहे. अर्थात ते बरोबरच आहे. कारण यंदा फेब्रुवारी-मार्च महिन्यात विमानमार्गे भारतात दाखल झालेला ‘कोरोना’ हा चिनी पाहुणा अजून काढता पाय घ्यायला तयार नाही. कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी त्याची दुसरी की तिसरी लाट येणार किंवा कसे, याबाबत तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत. सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे व प्रतिकारशक्ती शाबूत राखणे या त्रिसूत्रीचा विसर पडल्यास कोरोना पुन्हा बेटकुळ्या फुगवून आपल्यासमोर उभा राहील, अशी भीती आहे.
सण-उत्सवांमध्ये उत्साहाच्या भरात या त्रिसूत्रीचा विसर पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन ध्रुवांवरील दोन नेतेही एकसुरात बंधनांचा विसर पडू देऊ नका, असे आर्जवी स्वरात सांगत आहेत. कोरोनामुळे गुढीपाडव्यापासून रमजान ईदपर्यंत अनेक सणांवर बोळा फिरला. गेल्या सहा-सात महिन्यांतील सर्व सण-उत्सव लोकांनी घरात बसून ‘साजरे’ केले. आता मॉलपासून थिएटरपर्यंत आणि हॉटेलपासून रिसॉर्टपर्यंत सारे खुले झाल्याने सेलिब्रेशनची खुमखुमी अनेकांना स्वस्त बसू देत नसेल. मात्र केवळ टाइमपास किंवा मौजमजा म्हणून हुंदडण्यापूर्वी दहावेळा विचार करा.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिवाळीच्या तोंडावर पत्रकार परिषद घेऊन अर्थव्यवस्था पुन्हा बाळसे धरत असल्याचे जाहीर केले. चार महिन्यांपूर्वी राज्यांचे जीएसटीचे पैसे देण्यावरून केंद्र व राज्य सरकारे यांच्यात संघर्ष सुरू असताना सीतारामन यांचा ओढग्रस्त चेहरा आणि कालचा प्रफुल्लित चेहरा यात बरेच अंतर होते. ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेंतर्गत तब्बल दोन लाख ६५ हजार कोटींच्या तिसऱ्या आर्थिक सहाय्याची घोषणा त्यांनी केली. भविष्य निर्वाह निधीशी संलग्न आस्थापनांमध्ये १५ हजारांपर्यंत मासिक वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचे काम अर्थमंत्र्यांनी केले आहे. मार्च ते सप्टेंबर २०२० या कालावधीत रोजगार गमावलेल्या आणि १ ऑक्टोबरला पुन्हा रोजगार मिळवलेल्या कर्मचाऱ्यांचा कंपनी मालकांकडून दिला जाणारा भविष्य निर्वाह निधीतील प्रत्येकी १२ टक्क्यांचा मासिक हप्ता पुढील दोन वर्षांकरिता केंद्र सरकार भरणार आहे.
रोजगार निर्मिती व मिळालेला रोजगार टिकून राहण्याकरिता हा निर्णय लाभदायक ठरणार आहे. पाच-सहा महिन्यांकरिता बेकारीची झळ सोसलेल्या हातावर पोट असलेल्या व्यक्तीकरिता हा निर्णय मोठा दिलासा आहे. कोरोनाकाळात २६ वेगवेगळ्या क्षेत्रांना फटका बसला आहे. यामध्ये बांधकाम, आरोग्य वगैरे क्षेत्रांचा समावेश आहे. या क्षेत्रांना दिलासा देण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केला. यामुळेच धनत्रयोदशीला सोन्याची खरेदी करण्याकरिता बाजारपेठांमध्ये गर्दी झाल्याचे चित्र वेगवेगळ्या शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय हरित लवादाने हवेची गुणवत्ता निकृष्ट व अतिनिकृष्ट दर्जाची असलेल्या शहरांमध्ये फटाके फोडण्यास बंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रात सरसकट फटाके फोडण्यावर बंदी लागू न करता लोकांनी कोरोना संकटात फटाक्यांमुळे प्रदूषण वाढेल व परिणामी लोकांच्या फुफ्फुसावर त्याचा विपरीत परिणाम होईल, अशी कृती करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
मुंबई महानगर क्षेत्रातील वेगवेगळ्या शहरांत प्रदूषणाचे प्रमाण अधिक असल्याने व कोरोनाचा उद्रेक झाला तेव्हा मोठ्या प्रमाणावर जीवितहानी याच परिसरात झाली असल्याने येथील महापालिकांनी फटाके फोडण्यावर कडक निर्बंध लागू केले आहेत. फटाके फोडण्याचा सर्वाधिक त्रास लहान लहान मुले, वृद्ध व ज्यांना श्वसनाचे विकार आहेत त्यांना होतात. श्वसनाचे विकार असलेल्या व वृद्धांकरिता कोरोनाचे संकट त्यामुळे गहिरे होऊ शकते. कोरोनाची संभाव्य लाट ही अशीच डोके वर काढू शकते.
निर्बंध असतानाही जर कुणाला फटाके फोडायची खुमखुमी असेल तर हरित फटाक्यांचा पर्याय आहे. परंतु हे हरित फटाके प्रदूषणकारी असल्याचे पर्यावरणवादी संघटनांचे म्हणणे आहे. या फटाक्यांतही प्रदूषण पातळी वाढवणाऱ्या घटकांचा समावेश आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी फटाक्यांपासून चार हात दूर राहणे हेच शहाणपणाचे आहे. गेले चार-पाच महिने अनेकजण घरी असल्याने अनेकांचे वजन दोन-चार किलोनी वाढले आहे. त्यामुळे दिवाळी फराळावर हात मारतानाही सावधान. यावर कुणी म्हणेल की, दिवाळीत इतकी बंधने कशाला तर त्याचे उत्तर एकच यंदाची दिवाळी ही आपल्याला आरोग्यदायी दिवाळी म्हणूनच साजरी करायची आहे.