Happy New Year 2020 : ऐसी कळवळ्याची जाती!
By किरण अग्रवाल | Published: January 2, 2020 08:21 AM2020-01-02T08:21:16+5:302020-01-02T08:26:56+5:30
वर्ष सरले, म्हणजे कॅलेंडर बदलले. हा बदल होताना काळाचे संक्रमण घडले.
किरण अग्रवाल
आनंद कशात मानायचा अगर जल्लोष कसा साजरा करायचा, हा खरे तर व्यक्तिगणिक बदलणाऱ्या उत्तरांचा प्रश्न. पण एक नक्की खरे की, आपला आनंद इतरांना तापदायी ठरू नये. अर्थात जिथे सुहृदयता वा संवेदना असते तिथे आपल्या स्वत:पेक्षा इतरांचा विचार प्राधान्याने डोकावल्याखेरीज राहात नाही. सरत्या वर्षाला निरोप देऊन २०२० या नववर्षाचे स्वागत करताना अनेक व्यक्ती, संस्था, समूहांनी तो केल्याचे प्रकर्षाने दिसून आले. अंधाऱ्या रात्रीच्या गर्भात उष:कालाचे बीज अंकुरते ते या अशाच विचार-शलाकांनी. काळ्या परिघावरले हे पांढरे ठिपके दिवसेंदिवस कसे वृद्धिंगत करता येतील हा खरा प्रश्न आहे.
वर्ष सरले, म्हणजे कॅलेंडर बदलले. हा बदल होताना काळाचे संक्रमण घडले. यात वर्तमानाच्या ओसरीत उभे राहात आपण २०१९ला निरोप देताना २०२०चे स्वागत केले. ते करताना आनंद वा जल्लोषासाठी निमित्त शोधणारा मनुष्य स्वभाव असल्याने प्रत्येकानेच आपापल्यापरीने त्याची योजना केली. पण, हा नववर्ष स्वागताचा आनंद साजरा करताना व जल्लोष करतानाही आपली काळजी घेण्यासाठी शहरा-शहरांतील रस्तोरस्ती पोलिसांना तैनात करावे लागले. म्हणजे, समाजातील मोठा वर्ग आनंदात डुंबत असताना एका अन्य वर्गाला मात्र काळजीवाहकाच्या भूमिकेतून भर थंडीत रात्र जागून काढावी लागली. यात काय विशेष, ती तर त्यांची जबाबदारीच म्हणूनही याबाबत सांगितले जाऊ शकेल; परंतु असली वेळच का यावी, किंवा आपल्या आनंदाच्या अतिरेकावर नजर ठेवण्यासाठी इतर कुणास राखण करावी लागणार असेल तर त्यास आनंद म्हणायचा का, किंवा अशा आनंदाच्या उपभोगातून लाभणारे समाधान काय कामाचे हा यातील खरा प्रश्न ठरावा. आपला आनंद अगर जल्लोष हा इतरांसाठी तापदायी ठरणारा असेल तर त्याला आनंदच म्हणता येऊ नये. अशा आनंदामागे धावणारे काही कमी नाहीत, हे खरे असले तरी इतरांच्या आनंदात आपला आनंद मानणारेही काही आहेत याकडे दुर्लक्ष करता येऊ नये. असल्या सत्कार्य व सत्प्रवृत्तींनी लकाकणाऱ्या पणत्यांचा प्रकाश भलेही मर्यादित असेल; पण उद्याचे अवकाश व्यापण्याची ताकद त्यात आहे हे नक्की!
नववर्षाचे स्वागत व जल्लोष करण्यासाठी हॉटेल्सच्या पार्ट्यांमध्ये आनंद शोधणारे एकीकडे दिसत असताना, दुसरीकडे अनाथालयातील बालके, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ तसेच रुग्णालयातील कॅन्सरग्रस्त व एड्सग्रस्तांसोबत वेळ घालवत आनंद साजरा करणारेही यंदा मोठ्या प्रमाणात दिसून आले. रस्त्याच्या कडेवर थंडीत कुडकुडणाऱ्या वंचित बालकांच्या अंगावर मायेच्या शालीचे पांघरूण घालणाऱ्या काही संस्थाही पुढे आलेल्या पाहावयास मिळाल्या. दिवाळीच्या वेळी गावकुसाबाहेरील गोरगरिबांच्या व अनाथांच्या अंगणी संवेदनांचे दीपप्रज्वलित करून त्यांना गोडधोड खाऊ घालणाऱ्या व नवीन कपडेलत्ते देत दिवाळी साजरी करणाऱ्या संस्थांची जशी प्रतिवर्षी भर पडताना दिसते, तशी यंदा नववर्षाचे स्वागत करतानाही असे माणुसकीचे पाट वाहताना दिसले ही खूप आशादायी बाब आहे. अनेक सामाजिक संस्था व व्यक्तींनी नववर्षाचे स्वागत करताना गरजूंना मायेची ऊब दिली. काहींनी शहरातील हॉटेल्समध्ये न रमता वाड्यापाड्यांवर जात तेथील बांधवांसोबत नववर्षाचे स्वागत केले तर काहींनी रुग्णालयांतील रुग्णांसोबत आपला आनंद वाटून घेतला.
शेवटी आनंद हा वाटून घेण्याने वाढतो म्हणतात हेच खरे. स्वत:च्या आनंदात इतरांना सहभागी करून घेतल्याने व त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे भाव न्याहाळण्यात किंवा अनुभवण्यात जे समाधान लाभते ते दुसरे कशात लाभावे? अर्थात, त्यासाठी किंवा असा विचार करण्याकरिता संवेदना असावी लागते. संत तुकोबारायांनी मातृहृदयाच्या वत्सल भावाचा दाखला देत, ‘लेंकराचे हित, जाणे माउलीचें चित्त। ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभाविण प्रीती।।’ असे जे म्हटले आहे ते यासंदर्भाने लागू पडावे. नववर्षाचे स्वागत करताना आईच्या हृदयाने, पाल्याबद्दलचा कळवळा वाटावा अशा भूमिकेतून विविध संस्था व व्यक्तींनी दाखविलेली मानवतेची वाट म्हणूनच आदर्शदायी आहे. या अशा प्रयत्नांची संख्या आज कमी असली तरी स्वकेंद्री आचरणाला बहुकेंद्री चेहरा देण्याच्या दृष्टीने एक ठिणगी म्हणून त्याकडे पाहता यावे. हीच ठिणगी उद्याची माणुसकीची मशाल बनून पुढे येण्याची अपेक्षा करूया...