पक्ष फोडाफोडीच्या संभ्रम-काळात अविचल निष्ठेचा सन्मान

By अतुल कुलकर्णी | Published: July 30, 2024 08:11 AM2024-07-30T08:11:07+5:302024-07-30T08:12:29+5:30

सलग ४० वर्षे एकाच पक्षात राहून सक्रिय राजकारण करणाऱ्या हरिभाऊ बागडे यांना त्यांच्या पक्षाने निष्ठेचे फळ दिले, ही आजच्या काळात मोठी सुखद बातमी!

haribhau bagde appointed as rajasthan governor and salute to unswerving loyalty in a confusing time of party fissures | पक्ष फोडाफोडीच्या संभ्रम-काळात अविचल निष्ठेचा सन्मान

पक्ष फोडाफोडीच्या संभ्रम-काळात अविचल निष्ठेचा सन्मान

अतुल कुलकर्णी, संपादक, लोकमत, मुंबई.

या पक्षातून त्या पक्षात उड्या मारण्याचा हा काळ. पक्षनिष्ठा, नेत्यांविषयीची निष्ठा या गोष्टी दिवसेंदिवस दुर्मीळ होत असणारा हा काळ. फोडाफोडीचे राजकारण हेच खरे राजकारण; हे आजचे वास्तव. एखादा नेता सलग दोन वर्षे एका पक्षात राहिला तर आश्चर्य वाटावे अशी स्थिती असणारा हा काळ. अशा काळात सलग ४० वर्षे एकाच पक्षात राहून सक्रिय राजकारण करणाऱ्या हरिभाऊ किशनराव बागडे ऊर्फ नाना यांना त्यांच्या पक्षाने निष्ठेचे फळ दिले आहे. 

राजस्थानच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. (वसंतदादा पाटील, प्रभा राव, प्रतिभाताई पाटील, शिवराज पाटील चाकूरकर, राम नाईक आणि आता हरिभाऊ बागडे. महाराष्ट्रातल्या नेत्यांना राजस्थानमध्येच राज्यपाल का नेमले जाते हा एका वेगळ्या लेखाचा विषय.) त्यांचा मतदारसंघ आणि महाराष्ट्रातील जुने-नवे राजकारणी हरिभाऊ बागडे यांना नाना या नावाने ओळखतात. ‘बागडे साहेब’ असे कोणी त्यांना म्हटले की ते त्याला ‘नाना म्हणत जा’ असे सांगतात. त्याने आपुलकी वाटते असे त्यांचे म्हणणे. पूर्वीच्या जनसंघापासून नानांनी राजकारणाची सुरुवात केली. 

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या कार्याने त्यांना आकर्षित केले. पुढे त्यांच्याच नावाची शिक्षण संस्था काढून त्यांनी ग्रामीण भागात शाळा, महाविद्यालय सुरू केले. १९७२-७३ च्या दुष्काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दुष्काळ विमोचन समितीचे प्रमुख कार्यवाहक म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी छाप पाडली. शेतकरी, सहकार आणि ग्रामीण राजकारण यांची नस जाणून असल्याने नाना टिकून राहिले. ते किती वेळा आमदार झाले, मंत्री झाले याचा तपशील सर्वत्र उपलब्ध आहे. मात्र माणूस म्हणून त्यांचे वेगळेपण त्यांच्या कामातून त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे.
विधानसभेचे अध्यक्ष झाल्यानंतर ते कायम त्यांच्या भाषणात दादासाहेब मावळणकरांचा  किस्सा सांगायचे. मावळणकर लोकसभेचे अध्यक्ष झाले तेव्हा दिल्लीत एक नातेवाईक त्यांच्याकडे गेला. अर्थशास्त्राचा पदवीधर होता. दादासाहेबांनी नियोजन आयोगात त्याची शिफारस करावी अशी त्याची इच्छा होती. दादासाहेबांनी दोन दिवस त्याला घरी जेवायला बोलावले.

तिसऱ्या दिवशी सांगितले, ‘तू तुझ्या मूळ गावी परत जा. तिथे तुझी मी काही व्यवस्था लावता येते का बघतो. नियोजन आयोग ही काही तुझी जागा नव्हे!’  त्या तरुणाने कारण विचारल्यावर दादासाहेब म्हणाले, ‘माझ्यासोबत तू दोन वेळा जेवलास. पहिल्या वेळी  एक पोळी जास्त मागून घेतली आणि ताटात टाकून दिलीस. दुसऱ्या दिवशी भाजी आणि भात जास्तीचा मागून घेऊन तोही पुरता खाल्ला नाहीस. ज्या तरुणाला आपल्या पोटातली भूक किती आणि ताटात किती वाढून घ्यायचे याचे नियोजन करता येत नाही, तो देशाच्या विकास खर्चाचे नियोजन कसे करणार..?’ दादासाहेबांच्या या उत्तराने तो तरुण खजिल झाला... विधानसभेत नाना हा किस्सा सतत सांगत. मात्र ‘आज आपण कोणत्या पक्षात आहोत आणि उद्या कुठल्या पक्षात जायचे आहे’ याच्याच नियोजनात मग्न असणाऱ्यांना त्यातले मर्म किती उलगडेल, कोणास ठाऊक..?

अन्न व नागरी पुरवठा मंत्री असताना नानांनी पारदर्शक कारभार दाखवण्यासाठी धान्य खरेदीच्या निविदा ज्या दिवशी उघडणार होत्या, त्या दिवशी मंत्रालय कव्हर करणाऱ्या सर्व पत्रकारांना बोलावले. त्यांच्या समक्ष निविदा प्रक्रिया पूर्ण होईल असे सांगितले. इतक्या पारदर्शकतेत कसलीही मसालेदार बातमी न मिळाल्यामुळे कोणी त्याचे फारसे कव्हरेज केले नाही ही बाब वेगळी!  विधानसभेचे अध्यक्ष असताना लोकप्रतिनिधींना बोलावून ‘अमुक विषय तुम्ही सभागृहात मांडा. हा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे’, असे सांगणारे नाना मी पाहिले आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या आडनावाचा उल्लेख नाना अनेकदा वट्टेडीवार असा करायचे. शेवटी एकदा वडेट्टीवार यांना नानांनी भेटून त्याबद्दल खंत व्यक्त केली. त्यानंतर सभागृहात आल्यावर नानांनी वडेट्टीवार यांचे आडनाव बरोबर घेतले खरे, पण ‘आता मी वट्टेडीवार म्हणालो नाही’ असेही सांगितले. सभागृहात एकच हशा पिकला. 

असे  हसत-खेळत सभागृहाचे कामकाज चालवणे आणि प्रसंगी विरोधकांकडे पूर्णपणे पाठ करून सत्ताधाऱ्यांना हवे असणारे कामकाज नेमके काढून देणे यात नानांचा हातखंडा होता. आता ते राजस्थानचे राज्यपाल झाले आहेत. महाराष्ट्र आणि राजस्थानचे राजकीय नातेसंबंध चांगले की वाईट हे पक्ष आणि त्यांचे नेते ठरवतील. पण यानिमित्त महाराष्ट्रातून राजस्थानमध्ये जाणाऱ्यांना एक हक्काचे घर हरिभाऊ बागडे यांच्यामुळे मिळाले आहे. श्रीनिवास पाटील सिक्कीमचे राज्यपाल असताना महाराष्ट्रातून येणाऱ्यांचा ज्या आपुलकीने मान सन्मान करायचे, तसेच आदरातिथ्य आता महाराष्ट्रातल्या लोकांना राजस्थानमध्ये मिळेल यात शंका नाही.
atul.kulkarni@lokmat.com


 

Web Title: haribhau bagde appointed as rajasthan governor and salute to unswerving loyalty in a confusing time of party fissures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.