पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याची पोकळ दर्पोक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2016 04:25 AM2016-09-30T04:25:22+5:302016-09-30T04:25:22+5:30

भारतावर हल्ला चढवून त्याची राखरांगोळी करण्याची पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद आसीफ यांची ताजी दर्पोक्ती त्या देशाच्या युद्धखोर प्रवृत्तीचे आणि तो बंदुकीच्या

The Harmless Defense of the Pakistani Defense Minister | पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याची पोकळ दर्पोक्ती

पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याची पोकळ दर्पोक्ती

Next

- सुरेश द्वादशीवार

भारतावर हल्ला चढवून त्याची राखरांगोळी करण्याची पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद आसीफ यांची ताजी दर्पोक्ती त्या देशाच्या युद्धखोर प्रवृत्तीचे आणि तो बंदुकीच्या चापावर बोट ठेवून बसलेला देश असल्याचे स्पष्ट करणारी आहे. ‘आमचा देश अण्वस्त्रधारी आहे आणि आम्ही आमची अण्वस्त्रे शोकेसमध्ये ठेवायला तयार केली नाहीत’ असे म्हणताना, ‘आमची अस्त्रे आमच्या संरक्षणासाठी आहेत आणि जर कोणी आमच्या सुरक्षेला बाधा उत्पन्न करत असेल तर त्याच्याविरुद्ध ती वापरायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही’, असेही ते म्हणाले आहेत.
पाकिस्तानचा संरक्षणमंत्री दूरचित्रवाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत भारताला अशी जाहीर धमकी देतो तेव्हा ती तेवढ्याच गंभीरपणे घेतली जाणे आवश्यक आहे. आताच्या ताज्या धमकीपूर्वी दि. १७ सप्टेंबरलाही त्याने अशीच धमकी भारताला दिली होती आणि तिच्या दुसऱ्याच दिवशी उरी या भारताच्या लष्करी ठाण्यावर पाकिस्तानने हल्ला चढवून त्यातील १८ जवानांची हत्या केली. पठाणकोट आणि उरी या दोन घटनांच्या गंभीर परिणामांची पाकिस्तानने फारशी गंभीर दखल घेतली नाही असे सांगणारा हा प्रकार होता.
भारत सरकारने पाकिस्तानशी समोरासमोरचे युद्ध टाळण्याचा आणि त्याची आर्थिक व राजकीय कोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानात होणाऱ्या दक्षिण आशियाई देशांच्या परिषदेवर भारताने बहिष्कार घातला आहे. भारताच्या भूमिकेचे समर्थन करणाऱ्या बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि भूतान या देशांनीही त्या परिषदेपासून आपण दूर राहू असे जाहीर केले आहे. परिणामी ती परिषदच मोडीत निघाली असून पाकिस्तानला त्याच्या सर्व शेजारी देशांकडून योग्य ती समजही आता मिळाली आहे.
संयुक्त राष्ट्र संघटनेत पाकिस्तानच्या काश्मीरविषयक आवाहनाला जराही समर्थन प्राप्त झाले नाही. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी पाकिस्तान सरकारला त्याच्या भूमीचा वापर दहशतखोरांना करू न देण्याची तंबी नव्याने दिली आहे. रशिया हा देश पाकिस्तानसोबत आता लष्कराच्या संयुक्त कवायती करीत आहे. तरीही त्याने पाकिस्तानला काश्मीर प्रश्नावर योग्य ते निर्देश दिले आहेत. एकट्या चीनचा अपवाद वगळला तर जगातल्या बहुतेक सर्व देशांनी पाकिस्तानच्या उरीवरील हल्ल्याची निंदा केली आहे. अशी निंदा करणाऱ्या देशांत मध्य आशियातील किमान चार मुस्लीम राष्ट्रांचा समावेश आहे, ही बाब महत्त्वाची आणि काश्मीर प्रश्नावर मुस्लीम राष्ट्रांना आपल्या मागे आणण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न अपयशी झाले असल्याचे सांगणारी आहे. याच काळात भारत सरकारने सिंधू नदीच्या पाण्याच्या वापराबाबत दोन देशात झालेल्या कराराची फेरतपासणी करण्याचा व तो करार त्याच्या मूळ स्वरुपात अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी पाकिस्तानात जाणारे सिंधू खोऱ्यातील पाणी कमी होणार असून त्या देशातील सिंचन योजना अडचणीत येणार आहेत. भारत हाही एक अण्वस्त्रधारी देश आहे. भारताजवळही अतिशय परिणामकारक ठरतील अशी वेगवान क्षेपणास्त्रे आहेत. पाकिस्तानने भारतावर अणुहल्ला केल्यास भारताची अण्वस्त्रे व क्षेपणास्त्रे त्यांच्या जागी थांबून राहतील असे अर्थातच नाही. दरम्यान भारताने अरबी समुद्रात व विशेषत: पाकिस्तानच्या दक्षिण सीमेजवळ आपल्या नाविक दलाच्या शक्तीशाली कवायती सुरू केल्या आहेत. त्यांचा उद्देश पाकिस्तानला त्याचे समुद्री मार्ग भारत रोखून धरू शकेल हे शिकवणे हाच आहे. तात्पर्य, सार्क परिषदेचा उडालेला फज्जा, संयुक्त राष्ट्र संघटनेत वाट्याला आलेले एकाकीपण आणि जगातल्या कोणत्याही प्रमुख देशाने न दिलेला पाठिंबा एवढ्या साऱ्या बाबी विरोधात गेल्यानंतरही पाकिस्तानचे संरक्षणमंत्री भारताला अणुयुद्धाची धमकी देत असतील आणि ते ती देत असताना त्या देशाचे पंतप्रधान व लष्करप्रमुख गप्प राहत असतील तर ती बाब पाकिस्तान सरकारचे इरादे स्पष्ट करणारी व भारत सरकारला जास्तीचे सावध राहायला सांगणारी आहे.
राजकीय व आर्थिक कोंडी एखाद्या विकासवादी देशाला नमवू शकायला पुरेशी असते. मात्र अशी कोंडी विघातक विचार करणाऱ्या युद्धखोर देशाला भिंतीला पाठ लावून अखेरचा लढा लढायला उद्युक्त करू शकते हे वास्तव अशा वेळी साऱ्यांनी ध्यानात घ्यावे असे आहे. ख्वाजा मोहम्मद आसिफ यांच्या दर्पोक्तीची भारताने अजून फारशी दखल घेतली नसली तरी त्यांच्यासारख्या तिय्यम दर्जाच्या पुढाऱ्याची वक्तव्ये आपल्या सरकारला दखल घेण्याजोगी न वाटणे ही बाबही स्वाभाविक आहे. मात्र या दर्जाचे पाकिस्तानचे पुढारी अशी भाषा आताच्या जागतिक राजकारणातील तणावाच्या पार्श्वभूमीवर बोलू शकतात हीच बाब मुळात गंभीर व चिंतेची वाटावी अशी आहे.
भारताने पाकिस्तानच्या चालविलेल्या कोंडीमुळे आपण जराही घाबरलो नाही हे दाखविण्यासाठीदेखील या ख्वाजाने असे वक्तव्य केले असणे अस्वाभाविक नाही. मात्र पाकिस्तानचा आजवरचा भारताविषयीचा दृष्टीकोन पाहता त्याच्या त्या वक्तव्याला युद्धखोरीची दीर्घ परंपरा आहे ही बाबही येथे लक्षात घ्यावी अशी आहे.सारांश पाकिस्तानची कोंडी करतानाच भारताला आपली सुरक्षा व्यवस्था सज्ज व सावध राखणे गरजेचे आहे.
या दृष्टिकोनातून विचार करता बुधवारी रात्री भारताच्या वीर जवानांनी नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानाच्या चिथावणीतून तिथे पोसल्या जाणाऱ्या ३८ दहशतवाद्यांचा खात्मा करुन आपल्या सज्जतेची चुणूक दाखवून दिली आहे. तरीही जणू काही झालेच नाही व हा भारताने सुरु केलेला अपप्रचार आहे, असा कांगावा पाकिस्तानने करणे हा त्या देशाचा आणि तेथील सरकार व लष्कराचा स्थायीभाव आहे.
अर्थात भारतातदेखील ख्वाजा मोहम्मद आसीफचे काही अवतार आहेत आणि सध्या त्यांचा सत्तावर्तुळात वावर आहे. भारताने बुधवारी रात्री खऱ्या अर्थाने जो ईटका जबाब पत्थरने दिला आहे, त्याने पाकिस्तान पिसाळून उठेल यात शंका नाही. त्यामुळे संयम आणि सलोखा यांची कधी नव्हे इतकी आज भारताला गरज आहे.

( लेखक लोकमत नागपूर आवृत्तीचे संपादक आहेत)

 

Web Title: The Harmless Defense of the Pakistani Defense Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.