तुमच्या शेजारी अलीकडे घरफोडी झालीय का?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 11:12 AM2022-10-22T11:12:00+5:302022-10-22T11:14:43+5:30
तुमच्या शेजारी अलीकडेच घरफोडी झालीय का? झाली असेल तर लगेच सावध व्हा. कारण आता लवकरच तुमच्याही घराचा नंबर लागू शकतो. शहराच्या अमुकतमुक परिसरात घरफोड्यांचे सत्र सुरूच अशा मथळ्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा वाचल्या असतील.
- विश्राम ढोले
(माध्यम, तंत्रज्ञान, संस्कृती या विषयांचे अभ्यासक)
प्रेडपोल : गुन्ह्याचा प्रकार, गुन्ह्याची जागा आणि गुन्हा झाला तो दिवस वेळ या तीन विदाबिंदूच्या आधारे गुन्ह्यांची संभाव्यता व्यक्त करणारे अल्गोरिदम.
तुमच्या शेजारी अलीकडेच घरफोडी झालीय का? झाली असेल तर लगेच सावध व्हा. कारण आता लवकरच तुमच्याही घराचा नंबर लागू शकतो. शहराच्या अमुकतमुक परिसरात घरफोड्यांचे सत्र सुरूच अशा मथळ्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा वाचल्या असतील. हे मथळेही हेच सांगतात की, एखाद्या भागात घरफोडी झाली की पुढे काही दिवस त्या परिसरात घरफोड्या होत राहतात. कधीकधी तर एकाच घरात महिना दीड महिन्याच्या अंतराने दोनदा घरफोड्या होतात. पोलिसांना अनुभवाने हा धोका माहीत असतो.
पण अनुभवातून जाणवणाऱ्या या धोक्याला गणितीय संभाव्यतेच्या रुपात व्यक्त करण्याचा पहिला प्रयत्न केला तो लॉस एंजेलिस पोलीस विभागाचे प्रमुख बॅटन यांनी. त्यासाठी त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या गणित तज्ज्ञांची मदत घेतली. पोलीस विभागाकडे असलेली ८० वर्षातील सुमारे सव्वा कोटी घरफोड्यांच्या गुन्ह्यांची माहिती त्यासाठी उपलब्ध करून दिली. अशा अभ्यासासाठी घरफोडी हा फार उपयुक्त गुन्हा होता. कारण इतर गुन्ह्यांच्या तुलनेत घरफोडी कुठे आणि कोणत्या कालावधीत झाली हे अधिक नेमकेपणे सांगता येते. शिवाय घरफोडीचे गुन्हे नोंदविलेही अधिक जातात. एका अर्थाने घरफोडी संबंधीची विदा अधिक विश्वासार्ह असते. त्यामुळे त्या गणित तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासाला मोठे यश मिळाले.
घरफोड्यांच्या विदेमुळे भाकितांचे घबाडच हाती लागले. भूकंपानंतरचे धक्के कधी आणि किती प्रमाणात बसतील हे सांगणारी गणिती सूत्रे एखाद्या गुन्ह्यानंतरचे गुन्हे कधी आणि किती प्रमाणात घडतील याचेही अंदाज तितक्याच उपयुक्तपणे वर्तवू शकत होते. पोलिसांच्या लवकरच हेही लक्षात आले की, ही संभाव्यता फक्त घरफोडीच नव्हे तर हल्ल्यांपर्यंत अनेक प्रकारच्या गुन्ह्यांबाबत वर्तविता येऊ शकते. हे मोठेच यश होते. कारण त्यामुळे कोणत्या परिसरात कोणता गुन्हा घडू शकेल याबाबतच्या ढोबळ अंदाजापेक्षा अगदी एखाद्या विशिष्ट रस्त्याच्या भागात गुन्हा घडण्याची शक्यता किती टक्के आहे हे सांगता येणार होते आणि अर्थातच पोलिसांनी कुठे लक्ष द्यावे कुठे गस्त वाढवावी हेही कळू शकणार होते.
त्यातून सुरुवात झाली ती प्रेडपोल (प्रेडिक्टिव्ह पोलिसिंग) या गुन्ह्यांचे भाकीत करणाऱ्या अल्गोरिदमची. गुन्ह्याचा प्रकार, गुन्ह्याची जागा आणि गुन्हा झाला तो दिवस वेळ या तीन विदाबिंदूंच्या आधारे हे अल्गोरिदम शहराच्या कोणत्या भागात कोणत्या दिवशी कोणत्या प्रकारचा गुन्हा घडू शकेल याची संभाव्यता टक्केवारीच्या स्वरुपात व्यक्त करते. लक्षात घ्या, भाकीत गुन्ह्याच्या जागेबद्दलचे आहे. स्टीफन स्पिलबर्गच्या गाजलेल्या मायनॉरिटी रिपोर्ट या चित्रपटात दाखविल्याप्रमाणे ते व्यक्तीबद्दलचे नाही.
प्रेडपोलच्या भाकीत क्षमतेची परीक्षा घेण्यात आली. त्याची स्पर्धा लावली ती थेट अनुभवी पोलीस अधिकाऱ्यांशी. लॉस एंजेलिसचा एक मोठा विभाग आणि इंग्लंडमधील केंट या परगण्यात ही चाचणी घेण्यात आली. दीडशे चौरस मीटरचा एक भाग याप्रमाणे वीस भागांपैकी कोणत्या भागात पुढील १२ तासात सर्वाधिक गुन्हे घडतील याचे भाकीत अधिकाऱ्यांनी वर्तविले आणि प्रेडपोलनीही. त्या १२ तासात प्रत्यक्षात झालेल्या गुन्ह्यांशी त्याची तुलना करण्यात आली. लॉस एंजेलिसच्या अधिकाऱ्यांची भाकिते २ टक्के जागांबाबत खरी ठरली, तर प्रेडपोलची त्याच्या जवळजवळ दुप्पट. कॅटच्या बाबतीत अधिकाऱ्यांचे भाकीत साडेपाच टक्के जागांबाबत खरे ठरले तर प्रेडपोलचे जवळजवळ २० टक्के. दोन्ही चाचण्यांमध्ये प्रेडपोलने मानवी अंदाजक्षमतेवर मात केली होती.
वरकरणी ४ किंवा २० टक्के हे प्रमाण फार भारी वाटत नसेलही. पण, शहरातील एखाद्या दीडशे चौरस मीटरच्या भागात किती आणि कोणत्या प्रकारचे गुन्हे घडू शकतील याचे आपले रैंडम अंदाज १ टक्क्यांपेक्षा जास्त बरोबर ठरत नाही हे वास्तव लक्षात घेतले तर प्रेडपोलच्या क्षमतेचे महत्त्व कळते. एकदा प्रेडपोलच्या या खबरीने टीप दिली की मग, त्या भागातील लोकांना सावध करता येऊ शकते किंवा परिसरात पोलिसांची गस्त वाढवता येऊ शकते. त्यातील विशेषतः दुसऱ्या उपायामुळे त्या भागातील गुन्ह्यांचे प्रमाण ४ ते १३ टक्क्यांनी घटते असेही काही अभ्यासांमध्ये दिसून आले आहे. अर्थात प्रेडपोलसारख्या अल्गोरिदमच्या वापराची एक मानवी बाजूही आहे. एखाद्या भागात गुन्हा घडण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस गस्तीसाठी तिथे मायनॉरिटी रिपोर्ट या चित्रपटात दाखविल्याप्रमाणे ते गेले की, साहजिकच केवळ त्यांच्या उपस्थितीमुळे इतर ठिकाणांच्या तुलनेत तेथील गुन्हे शोधले व नोंदले जाण्याचे प्रमाणही वाढते. मग हीच वाढीव विदा अल्गोरिदमच्या पुढील भाकितासाठी आधार ठरते. त्यातून हा भाग सांख्यिकीदृष्ट्या धोकादायक ठरण्याचे प्रमाण वाढते. त्यातून गस्त वाढते आणि हे चक्र सुरुच राहते. यालाच फिडबॅक लूप म्हणतात.
प्रेडपोल आणि त्यासारखे इतरही काही अल्गोरिदम आज युरोप अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये वापरले जातात. त्यातले काही तर फक्त जागाच नाही तर संशयित व्यक्तींबद्दलचीही भाकिते वर्तवितात. हे अल्गोरिदम म्हणजे नवे खबरीच. त्यांची उपयुक्तता तर नक्की आहे. पण, हुशार पोलीस अधिकाऱ्याला खबरीच्या मर्यादा माहीत असतात. खबरीचाच गेम होण्याची किंवा खबरींकडून गेम होण्याचे धोकेही माहीत असतात. कृत्रिम खबरींचेही काही वेगळे नाही. म्हणूनच त्यांच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर कधी आणि कितपत विश्वास ठेवायचा याचा निर्णय अनुभवाने सिद्ध झालेल्या मानवी बुद्धीवरच सोडणे योग्य.