प्रश्न पडलाय?- चॅटबॉट उघडा, खुद्द भगवान श्रीकृष्णांनाच विचारा!
By Shrimant Mane | Published: May 27, 2023 12:13 PM2023-05-27T12:13:26+5:302023-05-27T12:13:55+5:30
गीताजीपीटी, आस्कगीता डॉट फेथ यासारखे चॅटबॉट हजारो प्रश्नांची उत्तरे देतात. चॅटबॉट वापरणारे जणू अर्जुन बनतात आणि त्यांच्या मनात येतील ते प्रश्न विचारतात!
- श्रीमंत माने, कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूर
मानवी जीवनाचे, सगळ्या प्रकारच्या व्यवहारांचे सार भगवद्गीतेत आहे, असे मानले जाते. तेव्हा, एखाद्या निर्णायक क्षणी काय करावे, अशी द्विधा मनात असेल, नेमका मार्ग सुचत नसेल तर माणसे महाभारत युद्धाच्या वेळी कुरुक्षेत्रावर आप्त-स्वकीय, नातेवाईकांवर शस्त्र कसे उचलू असे म्हणत अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नांना श्रीकृष्णाने दिलेल्या उत्तरांचा, उपदेशाचा आधार घेतात. पण, अठरा अध्यायांमधील सातशे श्लोकामध्ये मनातली शंका नेमकी कुठे शोधायची? - आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे तंत्रज्ञान स्वत:च तो शोध घेईल, तुम्हाला उत्तर देईल आणि अध्याय, श्लोकाच्या क्रमांकासह त्याचे संदर्भही देईल. किमया म्हणावी अशी ही गोष्ट गीता तत्त्वज्ञानावर आधारित चॅटबॉटच्या रूपाने आता तुमच्या-माझ्या हातात आहे.
गेल्या जानेवारीत बंगळुरूच्या सुकुरू साई विनीत या अभियंत्याने आस्कगीता डॉट फेथ हे चॅटबॉट आणले. त्याचवेळी अनंत शर्मा यांनी गीताजीपीटी आणली. अवघ्या आठवडाभरात केवळ गीतेमधील उपदेशावर आधारित पाच चॅटबॉट आले. किशन कुमार यांचे गीता डॉट किशन्स डॉट इन, विकास साहू यांचे गीताजीपीटी डॉट इन आणि वेद व्यास फाउंडेशनचे भगवद्गीता डॉट एआय ही इतर चॅटबॉटसची नावे. यापैकी गीताजीपीटी दररोज सरासरी पन्नास हजार प्रश्नांची उत्तरे देते. आस्कगीता डॉट फेथने आतापर्यंत एक कोटीहून अधिक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. इतरांचे आकडेही लाखांच्या घरात आहेत. यात चॅटबॉट वापरणारे जणू अर्जुन बनतात, हवे ते प्रश्न विचारतात, एखाद्या कृत्याचे अनुकूल-प्रतिकूल परिणाम, आयुष्याचे इप्सित काय तेही विचारतात. दोन प्रश्न सतत पुढे येतात-पहिला, मनाला शांतता हवी आहे, काय करू?- आणि दुसरा : धर्मरक्षणासाठी मी काय करू शकतो? काहींनी तर विचारले, की धर्मरक्षणासाठी हत्या करणे न्यायोचित आहे का? इथे थोडी गडबड झाली. उत्तर स्क्रिप्टच्या बाहेरचे आले. एखाद्याचा जीव घेणे हा अखेरचा पर्याय असतो, असे सांगताना दुर्बलाचे रक्षण हाच खरा धर्म, अशी शिकवण दिली गेली.
तथापि, हा गीताजीपीटीचा सगळा व्यवहार असा प्रसन्न नाही. तसेही आपल्या अवतीभोवतीचे वातावरणच असे आहे, की धर्मरक्षणाच्या नावाने होणाऱ्या हिंसेमुळे माणसे भयभीत आहेत. त्यामुळे गीतेने सांगितले तरी हिंसेचे समर्थन कसे करता येईल? म्हणून मग हे चॅटबॉट धर्मासाठी जीव द्यायला व घ्यायलाही तयार असलेल्यांना अहिंसा बाळगण्याचा उपदेश करते. पण, तेवढ्याने भय इथले संपत नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान राजकीय लाभासाठी वापरण्याचा प्रकार इथेही सुरू आहे. ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामवर सुरू असते तशी पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यातील तुलना इथेही पोहचली आहे. काही चॅटबॉटनी मोदी थोर नेते असल्याचे, राहुल गांधी सक्षम नसल्याचे उत्तर दिल्यामुळे जाणकार मंडळी या प्रयोगाकडे संशयाने पाहू लागली आहेत.
तसाही धर्म हा जगातला सर्वात मोठा व्यवसाय आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून धर्माचा उपदेश करण्याचा प्रयोग केवळ भारतात व तोही हिंदू धर्मातच झालाय असे नाही. मुळात गीताजीपीटीची कल्पनाच स्टॅनफर्ड विद्यापीठातील अँड्रू कीन गाव यांच्या बायबल जीपीटीवरून सुचली. गेल्या नोव्हेंबरमध्ये एआयकडून ॲप्लिकेशन प्रोग्रॅमिंग इंटरफेस जाहीर करण्यात आला आणि जगभरातील तंत्रज्ञांच्या हाती आपापल्या सोयीने चॅटबॉट तयार करण्याचे तंत्रज्ञान आले. चॅटजीपीटी त्यातूनच आले. बायबलपाठोपाठ कुराणावरही जीपीटी आल्या. तथापि, हा अत्यंत संवेदनशील मामला असल्याने आस्ककुराण चॅटबॉट आल्यानंतर कुराणाचा उपदेश देताना गोंधळ झाला. तेव्हा, त्याच्या निर्मात्यांनी डिस्क्लेमर जोडला. हदीसजीपीटी लगेच बंद पडले. तंत्रज्ञान वापरण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या, अशी सूचना दिली गेली. थोडक्यात, ‘परिवर्तनही संसार का नियम है’ सांगणाऱ्या गीतेचा चॅटबॉट प्रयोग वरवर आनंददायी असला तरी तो संयमाने, विवेकाने आणि महत्त्वाचे म्हणजे धार्मिक सदभाव राखण्यासाठी करायला हवा. वैज्ञानिक शोध, तंत्रज्ञानाचा विकास जणू सामान्यांच्या हातात आलेला चाकू आहे, त्याचा वापर कशासाठी करायचा यावर त्याचे परिणाम अवलंबून असतील.
shrimant.mane@lokmat.com