मन में है, विश्वास !
By Admin | Published: May 13, 2017 12:52 PM2017-05-13T12:52:47+5:302017-05-13T13:02:17+5:30
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी आपल्या आत्मचरित्र्याच्या मलपृष्ठावर त्याचं प्रयोजन सांगितले आहे. म्हटले तर ते त्यांच्या जीवनयात्रेची दिशा आहे
- वसंत भोसले
ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचा लागायच्या. अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची. माझ्या डोळ्यात भोळीभाबडी स्वप्नं होती. त्यांना प्रयत्नांची, कष्टाची जोड दिली. जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश !
काळ बदलतो, वेळ बदलते, पात्रं बदलतात आणि भूमिकाही ! बस्स ! मनगटात स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखांत बळ निर्माण करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते.
माझ्यासारख्या तळागाळातल्या, कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या घरातल्या अपुऱ्या साधन-सामग्रीनं आणि पराकोटीच्या ध्येयनिष्ठेनं कुठल्यातरी कोपऱ्यात ज्ञानसाधना करणाऱ्या अनेक ‘एकलव्यां’ना दिशा दाखविण्यासाठी हा पुस्तक प्रपंच केला आहे.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी आपल्या आत्मचरित्र्याच्या मलपृष्ठावर त्याचं प्रयोजन सांगितले आहे. म्हटले तर ते त्यांच्या जीवनयात्रेची दिशा आहे आणि म्हटले तर आजच्या समाज वाटचालीतील ‘एकलव्यां’ची कहाणी आहे. त्यांनी आत्मचरित्रात्मक पुस्तकातून व्यक्त होण्याचा जो प्रयत्न केला आहे, तो एक प्रातिनिधीक असला तरी आपल्या समाजाच्या (तुमच्या-आमच्या परिसराच्या) वाटचालीचा तो भाग आहे. त्यांचा निर्धार आहे. त्यासाठीचे कष्ट आहेत, संपूर्ण व्यवस्थेतील ‘मी एक अधिकारी, एक प्रशासनातील दुवा आहे’, असेही त्यास म्हणता येईल. वडील गावचे सरपंच असलेल्या गावातून ते आलेले असले तरी शाळेची पायरी चढताना वाहणा काढाव्या लागत नव्हत्या. कारण ते अनवाणीच शाळेची वाट तुडवित होते. अशा एका विश्वातून आलेल्या विश्वास नांगरे-पाटील यांनी आपल्या मनात एक विश्वास आहे, ‘मन में है, विश्वास!’ असे म्हटले आहे.
ही सर्व आठवण जागी करण्याची कारणे दोन आहेत. एक तर कोल्हापूरच्या इतिहासात त्यांच्या पुढाकाराने एका देशातील उंचीच्या पातळीवरील दुसऱ्या क्रमांकाचा ध्वज गेल्या महाराष्ट्र दिनापासून आजन्म फडफडत राहणार आहे. त्याची उंची तीनशे तीन फूट असणार आहे. ती एक ऐतिहासिक नोंद होणार आहे. ज्या कोल्हापूरच्या मातीत त्यांची जडणघडण झाली, त्याच मातीवर असा झेंडा फडकाविण्याची संकल्पना राबविण्याचे आणि आपण सारे त्याचे साक्षीदार असल्याचे भाग्य लाभणेही महत्त्वाचे आहे. दुसरे कारण ते फार महत्त्वाचे आणि लोकशिक्षणाचे आहे. आपण साऱ्यांनी आत्मक्लेश करून घेण्यासारखे आहे. कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील प्रशस्त रस्त्यावरून प्रदीप सोळंकी हे उद्योजक दुपारच्या जेवणासाठी घरी निघाले होते. त्यांच्या दुचाकीस सहज धक्का मारून जावं, असा एक धक्का दुसऱ्या दुचाकीधारकाने दिला. तो मागे वळूनही पाहिला नाही. ज्याला आपण (अनवधानाने का असेना) धक्का दिला तो माणूस रस्त्यावर कोसळतो आहे, तरी त्याची फिकीर नाही. कोसळलेले सोळंकी सद्गृहस्थ आपल्या साठाव्या वाढदिवशीच मरण पावले. हे उदाहरण याच्यासाठी की, विश्वास नांगरे-पाटील यांच्या पुढाकाराने रस्त्यावर बेधडक वाहने चालविणाऱ्यांवर जोरदार कारवाई सुरू आहे. ही घटना घडण्यापूर्वीच त्यांनी ही कारवाई कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांत सुरू केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात एकाच दिवशी किमान सहा ते सातशे पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. येणाऱ्या-जाणाऱ्या आपल्या भावी पिढीकडे (देश घडवू पाहणारी) दुचाकी चालविण्याचा परवाना मागत आहेत. दुचाकीची कागदपत्रे मागत आहेत. त्या दुचाकीचा विमा उतरविला आहे का? असे साधे प्रश्न करीत आहेत. दुचाकी वाहनावर दोघांनाच प्रवास करण्याची मुभा असताना तिघे बसले म्हणून रोखत आहेत. ही तशी साधी वाहन चालविणाऱ्यांची सभ्यता तपासण्यासारखीच बाब आहे. त्यासाठी मोहिमेच्या एका दिवशी जिल्ह्यात किमान दोन हजार लोकांना पकडताच निम्म्याहून अधिकजण विना वाहकचालक परवाना न घेता वाहन चालविताना आढळून आले. जवळपास दहा टक्के वाहनचालक ट्रिपलसीट होते. या मोहिमेबद्दल विश्वास नांगरे-पाटील आणि चाळीसच्यावर तापमान असताना रस्त्यावर दिवसभर थांबून काम करणाऱ्या पोलिसांचे अभिनंदन करायला हवे.
लेखक लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक आहेत