खरा कस लागेल

By admin | Published: March 30, 2016 03:10 AM2016-03-30T03:10:56+5:302016-03-30T03:10:56+5:30

उत्तर प्रदेश विधानसभेच्या आगामी निवडणुकीची व्यूहरचना करण्याची कामगिरी काँग्रेस पक्षाने या विषयातील तज्ज्ञ म्हणून अलीकडच्या काळात मान्यता पावलेले प्रशांत किशोर यांच्यावर

Have a great deal of tightness | खरा कस लागेल

खरा कस लागेल

Next

उत्तर प्रदेश विधानसभेच्या आगामी निवडणुकीची व्यूहरचना करण्याची कामगिरी काँग्रेस पक्षाने या विषयातील तज्ज्ञ म्हणून अलीकडच्या काळात मान्यता पावलेले प्रशांत किशोर यांच्यावर सोपविली असून त्यांच्यातील वकूब खऱ्या अर्थाने तिथे कसाला लागेल असे म्हणता येईल. तब्बल चारशे कोटींचा अर्थसंकल्प, पाचशे कार्यकर्त्यांची फौज, कांग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या दोनेकशे सभा आणि प्रियंका गांधी-वड्रा यांचा सक्रीय सहभाग असे या व्यूहरचनेचे ढोबळ स्वरुप असल्याचे सांगितले जाते. प्रशांत किशोर प्रकाशझोतात आले, ते लोकसभेच्या मागील निवडणुकीच्या वेळी. त्यावेळी त्यांच्यावर भाजपाच्या प्रचार मोहिमेची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या निवडणुकीचा निकाल साऱ्या जगासमोर आहे. त्यानंतर बिहार विधानसभेच्या निवडणुकीत नितीशकुमार यांनी प्रशांत किशोर यांना स्वत:कडे वळवून घेतले आणि आपल्या निवडणूक प्रचाराची धुरा त्यांच्या खांद्यावर ठेवली. त्या निवडणुकीचा निकालदेखील लोकांच्या समोर आहे. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला किंवा व्यक्तिश: नरेन्द्र मोदी यांना जे घवघवीत यश मिळाले त्याचे शिल्पकार म्हणून त्या पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांचेही नाव घेतले जाते. लोकसभा निवडणुकीनंतर पाठोपाठच झालेल्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या यशाचेही तेच शिल्पकार होते. पण दिल्ली आणि बिहारमध्ये त्यांची कला काही फळली नाही. पण लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या यशात आणखी एक मोठा आणि महत्वाचा वाटेकरी होता आणि तो म्हणजे संपुआची आधीची कारकीर्द. त्यामुळे केवळ एकट्या प्रशांत किशोर यांनी भाजपा आणि मोदी यांना सत्तास्थानी बसविले असे म्हणणे म्हणजे मोदी, शाह आणि काँग्रेस यांचे श्रेय हिरावून घेणे! तोच प्रकार बिहार निवडणुकीबाबत. लालू आणि शरद हे दोघे यादव नितीशकुमारांसकट कधीच एकत्र येऊ शकत नाहीत असा माध्यमांचा होरा होता तर त्यांनी एकत्र येऊ नये असा भाजपाचा आशावाद होता. पण प्रत्यक्षात भाजपाच्या विरोधात मोठी आघाडी उभी राहिली आणि शाह यांचे शिल्पकला कौशल्य पुन्हा एकदा उघडे पडले. अशी आघाडी झाली नसती आणि मोहन भागवतांनी आरक्षणासंबंधी वादग्रस्त विधान केले नसते व तरीही नितीशकुमार घसघशीत बहुमताने मुख्यमंत्री बनले असते तर नि:संशय ते प्रशांत किशोर यांचे शिल्पकला कौशल्य मानले गेले असते. उत्तर प्रदेशाची तर बातच निराळी. मुलायमसिंह, मायावती, भाजपा आपले अस्तित्व राखून असतानाच आता बिहारातील मोठी आघाडीही तिथे उतरणार आहे. त्यांच्या तुलनेत काँग्रेसची आजची स्थिती अत्यंत नाजूक म्हणता येईल अशीच आहे. साहजिकच तिथे काँग्रेसचे शंभर जागांचे उद्दिष्ट साध्य करण्यात प्रशांत किशोर यशस्वी ठरले तरच त्यांच्या कौशल्यावर शिक्कामोर्तब होईल आणि म्हणूनच आता खरा त्यांचा कस लागेल.

Web Title: Have a great deal of tightness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.