आपण लाज-लज्जा गमावली आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 05:44 AM2019-05-11T05:44:55+5:302019-05-11T05:47:48+5:30

विद्यार्थी अनेक कारणांनी सध्या तणावात आहेत. कधी स्वत:पाशी पुरेशा पदव्या नसल्याची त्यांना चिंता वाटते तर कधी शिक्षणाच्या दर्जाने ते चिंतित असतात.

Have you lost your emotions? | आपण लाज-लज्जा गमावली आहे का?

आपण लाज-लज्जा गमावली आहे का?

Next

- डॉ. एस. एस. मंठा
(माजी चेअरमन, एआयसीटीई एडीजे, प्रोफेसर, एनआयएएस, बंगळुरू)


विद्यार्थी अनेक कारणांनी सध्या तणावात आहेत. कधी स्वत:पाशी पुरेशा पदव्या नसल्याची त्यांना चिंता वाटते तर कधी शिक्षणाच्या दर्जाने ते चिंतित असतात. वाढलेली फी, रोजगारासाठी आवश्यक कौशल्याचा अभाव, परीक्षेनंतर मूल्यांकनातील घोटाळे, उशिरा लागणारे निकाल आणि उत्तीर्ण झाल्यावर रोजगाराच्या संधी न मिळणे, हीदेखील त्यांच्या चिंतेची कारणे असतात. त्यामुळे विद्यार्थी जर तणावाखाली असतील तर ते आपल्या पद्धतीने त्यावर प्रतिक्रिया देतात किंवा बाह्य जगताचे चुकीचे आकलन करतात. त्यासाठी जबाबदार कोण? अति ताणामुळे किंवा परिस्थितीला तोंड देण्यास कमी पडल्याने विद्यार्थी दबावाखाली येतात. अशावेळी सरकारचे किंवा समाजाचे कर्तव्य काय असते?


कधी कधी अतिरिक्त ताण हा व्यक्तीला अधिक कार्यप्रवणही करू शकतो. अस्तित्वासाठी त्याची गरजही असते. धोका समोर दिसत असताना त्याचा मुकाबला केव्हा करायचा किंवा त्यापासून दूर केव्हा जायचे, हेही आपल्याला समजत असते. पण एखादवेळी अनेक प्रश्नांना एकाचवेळी सामोरे जाण्याचा प्रसंग येऊन त्याचा सामना करण्यास व्यक्ती कमी पडते तेव्हा ती स्थिती अपायकारक ठरू शकते. तेलंगणात अशी स्थिती निर्माण झाल्यावर काय करायला हवे, याचा अंदाज न आल्याने २२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याचा मार्ग पत्करला. तेलंगणा राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल १८ एप्रिलला जाहीर झाला. तो लावताना सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे गुण आणि परीक्षा क्रमांक यांची अनेक ठिकाणी योग्य जुळवणी न झाल्याने अनेक विद्यार्थी नापास घोषित झाले. त्यामुळे निराशेने घेरून काहींनी आत्महत्या केली. एखाद्याने आत्महत्या केल्यावर त्याच्यामागे जे आप्त असतात, त्यांच्यात अपराधीपणाची भावना निर्माण होते, पण याची पूर्वकल्पना तरी कुणाला असते?

जाणीवपूर्वक जर कुणासाठी तणावाची स्थिती निर्माण करण्यात आली तर त्याला तोंड द्यावे लागणाऱ्या व्यक्तीला भावनिक आघाताला सामोरे जावे लागते. या वेळी त्या स्थितीला सामोरे गेलेले विद्यार्थी त्यांना झालेल्या त्रासाबद्दल नुकसानभरपाई मिळण्यासाठी परतही येऊ शकत नाहीत. त्यांच्या पालकांना तुटपुंज्या नुकसानभरपाईच्या रकमेवर समाधान मानावे लागते. तेवढ्याने समाजाला किंवा सरकारला स्वत:च्या जबाबदारीतून मुक्त होता येते का?
मुलांनी आत्महत्या केल्याचे लक्षात आल्यावर आणि पालकांकडून त्या घटनांचा निषेध व्यक्त होऊ लागल्यावर तेलंगणा सरकारने सर्वच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे विनामूल्य फेरमूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला. याला न्याय म्हणायचे? जर नियमात फेरमूल्यांकनाची तरतूद होती तर ते यापूर्वीच का करण्यात आले नव्हते? सरकारने या घटनेकडे उपेक्षेने का बघितले? या घटनेला स्वत:हून दखलपात्र ठरवून सर्वोच्च न्यायालयाने त्याविरोधात सार्वजनिक हितयाचिका का दाखल करून घेतली नाही आणि सरकारच्या काम करण्याच्या पद्धतीवर कोरडे का ओढले नाहीत? आपण सर्व जण समाज या नात्याने किंवा एक राष्ट्र म्हणून त्याविषयी शोकदेखील व्यक्त करीत नाही? आपण इतके असंवेदनशील झालो आहोत का?

आत्महत्या हा तात्पुरत्या प्रश्नाचा कायमचा तोडगा असतो. पण अशा प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी आपण एखादी पद्धत निर्माण करू शकलो आहोत का? आत्महत्या ही अनेकदा माणसाच्या भेकडपणातून जन्माला येत असते, पण ती नेहमीच तशी नसते. २०१६ साली १५ ते ३९ या वयोगटातील २,३०,३१४ माणसांनी आत्महत्या केली होती. दरवर्षी संपूर्ण जगात १० लाख लोक आत्महत्या करतात, त्यात १७ टक्के लोक भारतातील असतात! त्यातही दक्षिणेकडील राज्यात हे प्रमाण भयावह आहे आणि त्यात पुरुषांचे प्रमाण जास्त आहे.

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात चढ-उतार हे येतच असतात. ते जेव्हा आपल्या आवाक्यात असतात तेव्हा आपण त्यांना समर्थपणे तोंड देतो. पण ते जेव्हा आवाक्याबाहेर जातात, तेव्हा माणसाच्या मनात डिप्रेशन येते. त्यामुळे त्याला त्या संकटाला आपण तोंड देऊ शकत नाही, याची लाज वाटते. ती असह्य झाली की माणूस आत्महत्येला प्रवृत्त होतो. तेलंगणात नेमके असेच झाले. तेव्हा समाज या नात्याने आपण अपयशी ठरलो, असे म्हणावे लागेल. विद्यार्थ्यांनीही परीक्षेनंतर मन शांत ठेवले पाहिजे. परीक्षेतील यशापयश हेच काही जीवनात सर्वस्व नसते. परीक्षेतील अपयशानंतरही आपण जीवनात यशस्वी ठरू शकू, याचा विश्वास त्यांनी बाळगायला हवा. जीवनात शिस्त असली की ती माणसाला अशा प्रसंगांचा सामना करण्यास शिकवते. अडचणीच्या वेळी मित्रांची आणि कुटुंबाची मदत मागण्यात काहीच गैर नसते.

या घटनेने पालकांनासुद्धा योग्य धडा मिळाला आहे. मुलांमध्ये डिप्रेशन निर्माण झाले की ते स्वत:ची विचार करण्याची शक्ती गमावून बसतात. ‘माझ्या नसण्याने कुटुंबाचे फार काही नुकसान होणार नाही.’ या तºहेच्या विचारापासून मुलांना दूर ठेवायला हवे. डिप्रेशनवरही मात करता येते हे मुलांना समजावून सांगावे. मुलांशी आडवळणाने बोलण्यापेक्षा त्यांच्याशी सरळ बोलावे. प्रश्न आपोआप सुटतील असा विचार करून प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नये. अल्कोहोल किंवा ड्रग्ज यांच्या आहारी गेलेल्यांना त्यापासून परावृत्त करता येते. त्यासाठी मुलांकडे सतत लक्ष ठेवण्याची गरज आहे. मुलांमध्ये अपराधीपणाची भावना निर्माण झाली की ती भावना त्यांना लाज आणते. त्यापासून मुलांना वाचवायचे असेल तर मुलांवर प्रेम करणे, त्यांना योग्य सल्ला आणि शिक्षण देणे गरजेचे आहे.

Web Title: Have you lost your emotions?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.