हवाहवासा ‘हवाई’ विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:32 AM2018-02-09T00:32:20+5:302018-02-09T00:32:30+5:30

‘स्मार्ट सिटी’कडे वेगाने विकास करीत असलेल्या नागपूर शहराचे नाव देशाच्या हवाई नकाशावर ठळकपणे घेतल्या जात आहे.

Havoc 'Hawaii' development | हवाहवासा ‘हवाई’ विकास

हवाहवासा ‘हवाई’ विकास

Next

‘स्मार्ट सिटी’कडे वेगाने विकास करीत असलेल्या नागपूर शहराचे नाव देशाच्या हवाई नकाशावर ठळकपणे घेतल्या जात आहे. नागपूरसह विदर्भात विमान प्रवासाची आवश्यकता सर्वसामान्यांदेखील वाटत असून २०१७ या वर्षभरात नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून थोड्याथोडक्या नव्हे तर १० लाख प्रवाशांनी उड्डाण केले. मोठ्या शहरांच्या तुलनेत हा आकडा कमी असला तरी ही ‘मिलियन’भरारी भविष्यातील संधी आणि बदलांचे संकेत देणारी आहे. उपराजधानीची वाटचाल देशातील प्रमुख हवाई शहरांकडे होत असल्याचेच हे द्योतक आहे. भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे स्थान असलेल्या नागपूरचा महामार्ग व रेल्वेच्या तुलनेत क्षमता असूनदेखील ‘हवाई’ क्षेत्रात हवा तसा विकास झाला नाही. विमानतळाचा विस्तारदेखील विविध तांत्रिक बाबींमध्ये अडकला व राजकीय इच्छाशक्तीचीदेखील साथ मिळाली नाही. मात्र गेल्या दशकापासून हे चित्र पालटताना दिसून येत आहे. मध्य भारतातील एक महत्त्वाचे विमानतळ अशी नागपूरची ओळख निर्माण झाली आहे. येथील विमानांची वर्दळ वाढली असून खासगी विमानांची वाढती संख्या ही शहराचे वाढते महत्त्व स्पष्ट करणारी आहे. विमानप्रवास हे केवळ ‘व्हीआयपी’ व धनाढ्यांच्या प्रवासाचे साधन राहिलेले नाही. मुंबई, पुणे किंवा इतर शहरात जाण्यासाठी रेल्वेलाच प्राधान्य देणारी मंडळी आता बिनदिक्कतपणे विमानप्रवासाकडे वळत आहेत. नागपूरप्रमाणेच विदर्भात गोंदिया, अकोला, अमरावती येथे विमानतळ आहेत. गोंदिया येथील बिरसी विमानतळाची धावपट्टी तर बरीच जुनी आहे. या विमानतळांसाठीदेखील येणारा काळ चांगला राहू शकतो. २०१८-१९ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात वित्तमंत्र्यांनी लहान विमानतळांच्या विकासासाठी घोषणाच केली. ‘हवाई चप्पल’ वापरणाºया सर्वसामान्य मनुष्यालादेखील विमानप्रवास करता यावा, यासाठी केंद्राकडून ‘उडान’ योजनेला बळकटी देण्यात येणार आहे. फारशी वापरात नसलेली ५६ विमानतळे एकमेकांशी जोडण्यात येणार आहेत. याची अंमलबजावणी जर योग्य पद्धतीने झाली तर विदर्भातील ‘हवाई’ क्षेत्राला नक्कीच ‘अच्छे दिन’ येतील. येथील विमानतळांचा विकास करण्यासाठी राजकीय पुढाकारदेखील तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे. नागपूरबाबत तशी पावले उचलण्यात येत आहेत. इतर विमानतळांनादेखील प्राधान्य दिले गेले तर विदर्भात उद्योग स्थापनेसाठी अनुकूल वातावरणनिर्मितीकडे ते एक मोठे पाऊल ठरेल. असा ‘हवाई’ विकास उद्योगक्षेत्रापासून ते सर्वसामान्यांना हवाहवासाच वाटेल यात शंका नाही.

Web Title: Havoc 'Hawaii' development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.