तो गेला, पण... तिचे मातृत्व अबाधित...
By गजानन जानभोर | Published: November 30, 2017 12:26 AM2017-11-30T00:26:49+5:302017-11-30T00:28:09+5:30
ती चार दिवस त्याच्या जवळच बसून असते. त्याचे बोट किंचित हलले तरी ती सावध होते. डॉक्टरांना हाक मारते, ‘‘बघा, तो हालचाल करतो, जिवंत आहे, तो आता उठेल’’...डॉक्टर नि:शब्द. तिची समजूत कशी घालायची? ‘तो डोळे उघडेल, आई म्हणून हाक मारेल’, ही तिची आशा.
ती चार दिवस त्याच्या जवळच बसून असते. त्याचे बोट किंचित हलले तरी ती सावध होते. डॉक्टरांना हाक मारते, ‘‘बघा, तो हालचाल करतो, जिवंत आहे, तो आता उठेल’’...डॉक्टर नि:शब्द. तिची समजूत कशी घालायची? ‘तो डोळे उघडेल, आई म्हणून हाक मारेल’, ही तिची आशा. डॉक्टरांच्या लेखी मात्र तो मृत पावलेला. वैद्यकीय भाषेत तो ‘ब्रेन डेड’. पण, ती आई. तिच्या हंबरण्यापुढे या गोष्टी शून्य. ‘आणखी दोन दिवस थांबा ना. तो परत येईल’ काकुळतीला येऊन ती डॉक्टरांना सांगत असते. डॉक्टरही तिच्या समाधानासाठी थांबतात. ही गोष्ट कुठल्याही कांदबरीतील नाही, सिनेमातीलही नाही. नागपुरातील एका खासगी रुग्णालयात मुलाच्या निष्प्राण देहाजवळ बसून असलेल्या मातेची ही कहाणी...
ती वर्ध्याची. तो तिचा एकुलता एक मुलगा. कोल्हापुरातून त्याने केमिकल इंजीनिअरिंग केले. परीक्षेसाठी नागपुरात आला अन् अपघात झाला. अत्यावस्थेत त्याला दवाखान्यात भरती केले. मेंदूला मोठी इजा झालेली, त्याला वाचविण्याचे प्रयत्न झाले, पण व्यर्थ ठरले. डॉक्टर म्हणाले, तो ‘ब्रेन डेड’ आहे. त्याच्या आईला त्याचे अवयव दान करण्याची विनंती केली. जड अंत:करणाने तिने मान्यही केले. पण, सारखे वाटायचे की तो परत येईल. म्हणून ती चार दिवस त्याच्याशेजारी बसून होती. तिच्या डोळ्याला डोळा लागला नाही. तो जागा झाला तर...मृत्यूने झडप घालू नये म्हणून तिचा असा पहारा. चार दिवसांत त्याच्या असंख्य आठवणी दाटून आल्या. नऊ महिने त्याला पोटात सांभाळले, रक्ताचे पाणी करून २२ वर्षे जीवापाड जपले. तो पोटात असताना तिच्या श्वाच्छोश्वासावरच त्याच्या हृदयाचे ठोके जिवंत होते. त्याला जन्म देताना तिने प्राणांतिक कळा सोसल्या. त्या कशा होत्या? तिने कुणालाच कधी सांगितले नाही. त्यालासुद्धा नाही...त्याने शेवटचा श्वास घेतला तेव्हा तशाच वेदना पुन्हा झाल्या. तिच्या कुशीत तो अनेकदा रडला असेल. त्याच्या आयुष्यातील सारी दु:खे वाहून तिच्या काळजात पाझरली असतील. त्याची भूक तिलाच पहिल्यांदा कळली. त्याला छातीशी कवटाळले, त्याच क्षणी जगात आल्यानंतरचा भूकेचा पहिला प्रश्न तिनेच सोडवला. कधीकधी ती रागात असायची. पण, आई म्हणताच तिला पान्हा फुटायचा. त्याला साधे खरचटले, कुणी मारले तरी तिच्या छातीत धस्स व्हायचे. त्याच्या स्वप्नात राक्षस घाबरवायला यायचा. तिने कुशीत घेतले की तो पळून जायचा. जन्मापूर्वी तिच्या गर्भात आणि जन्मानंतर तिच्या कुशीतच त्याला सुरक्षित वाटायचे.
तिने त्याला कष्टाने वाढविले. परवा तो इंजीनिअर झाला तेव्हा तिच्या कष्टाची फुले झाली. पण, त्या दिवशी ती सारी त्याच्या देहाजवळ विखरून पडलेली... आपला मुलगा जिवंत नाही हे माहीत असूनही सत्य स्वीकारायला तिचे मन तयार नव्हते. आप्तांनी तिची समजूत घातली पण अखेरपर्यंत ती आशेवर होती. अखेर तिला कळून चुकले, तो कधीचाच या जगातून निघून गेलेला... त्याचे अवयव कुणाचे तरी प्राण वाचवू शकतात! ज्यांना त्याची गरज आहे त्यांनाही आई असेल, ती देखील आपल्यासारखीच तळमळत असेल. तिच्यातील करुणा जागी झाली. तिने अवयवदानाला परवानगी दिली. त्याचे यकृत, किडनी आणि डोळे गरजूंना देण्यात आले. अवयवदानासाठी शीतपेटी आली तेव्हा मात्र ती हादरली.
ज्या हातांनी त्याला गोंजारले, खेळवले त्याच हातांनी त्याचे कलेवर डॉक्टरांना सोपवताना तिचे हदय पिळवटून निघाले. अवयव घेऊन जाताना ती सारखी त्या पेटीकडे बघत होती, जणू तिचे प्राण कुणीतरी हिरावून नेत आहेत. त्याला जन्म दिला त्या दिवशी ती अशीच कळवळली होती पण त्या कळा तिला हव्या होत्या... नियतीने दिलेल्या या यातना मात्र तिचे प्राण हिरावणाºया...तिच्यामुळे त्याने पहिला श्वास घेतला. शेवटच्या श्वासाक्षणी ती तिथेच होती. तिला ठाऊक आहे, तो आता कधीच परत येणार नाही. पण तिचे मन तिलाच सांगते, ‘तो केवळ शरीराने गेला’. अवयवरूपाने आजही जिवंत आहे. त्याच्यामुळे पुनर्जन्म मिळाला तीसुद्धा तिचीच मुले. पोटचा गोळा जाऊनही तिचे मातृत्व असे अबाधित...
gajanan.janbhor@lokmat.com