आरोग्य सेवाच खाटेवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 12:12 AM2017-08-17T00:12:09+5:302017-08-17T00:12:20+5:30
२०१५ मध्ये देशभरात पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या तब्बल १.०८ दशलक्ष बालकांचा मृत्यू झाल्याची भयकारी आकडेवारी आता समोर आली आहे.
गोरखपूर येथील बाबा राघव दास वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात ७९ बालकांचा अवघ्या काही दिवसांच्या अंतराने मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण देश ढवळून निघाला असतानाच, २०१५ मध्ये देशभरात पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या तब्बल १.०८ दशलक्ष बालकांचा मृत्यू झाल्याची भयकारी आकडेवारी आता समोर आली आहे. याचा अर्थ त्या वर्षात दररोज २,९५९ किंवा दर मिनिटाला दोन बालके मृत्युमुखी पडली. आमच्या महान देशातील आरोग्य सेवाच रुग्णशय्येवर आहे, हे यावरून स्पष्ट व्हावे. या अवस्थेसाठी केवळ विद्यमान राज्य किंवा केंद्र सरकारवर दोषारोपण करून भागणार नाही; कारण ही स्थिती काही दोन-चार वर्षांत तयार झालेली नाही. स्वातंत्र्यापासून आजवर सत्तेत आलेल्या प्रत्येक राजकीय पक्षाला या भयावह स्थितीची जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. मुळात मनुष्य जीवित्वाविषयी गंभीर नसण्याची जी वैशिष्ट्यपूर्ण भारतीय मानसिकता आहे, ती या स्थितीच्या मुळाशी आहे. भारताच्या राज्यघटनेत सार्वजनिक आरोग्य सेवेतील सुधारणांना वाहिलेले एक स्वतंत्र कलम आहे. एवढेच नव्हे तर त्या कलमातील उद्दिष्टे साध्य करता यावीत, यासाठी २०१० मध्ये संसदेने एक कायदाही मंजूर केला. वैद्यकीय सेवा पुरविणाºया आस्थापनांनी कोणत्या किमान सेवा व सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्या, याचा उहापोह त्या कायद्यात करण्यात आला आहे. दुर्दैवाने बहुतांश डॉक्टरांनाच त्या कायद्यातील तरतुदींची माहिती नाही. मग आरोग्य सेवेतील इतर लोकांबद्दल काय बोलावे? इस्पितळ व्यवस्थापन नावाच्या गोष्टीचा भारतीयांना गंधही नाही. दुर्दैवाने आमच्या देशात अशी मानसिकता तयार झाली आहे, की आरोग्य सेवा पुरविण्यासाठी केवळ डॉक्टर प्रशिक्षित असले की झाले! मग इतर कर्मचारीवृंद कसाही असला तरी चालेल. विकसित देशांमध्ये ‘पॅरा मेडिको’ म्हणून ओळखल्या जाणाºया डॉक्टरेतर कर्मचाºयांना डॉक्टरांपेक्षाही जास्त महत्त्व दिल्या जाते; कारण आणीबाणीच्या स्थितीत रुग्णाचे प्राण वाचविण्यात आणि रुग्णाच्या जीवावर बेतणारी परिस्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्यात, तेच मोलाची कामगिरी बजावीत असतात. आमच्या देशात मात्र केवळ माणूस हवा म्हणून कोणताही माणूस उभा करून काम भागवल्या जाते अन् मग त्यातूनच अधूनमधून गोरखपूरसारख्या घटना घडत असतात. देशाला विकसित राष्ट्रांच्या पंगतीला नेऊन बसविण्याच्या गप्पा मारणाºयांनी, गोरखपूर प्रकरणापासून धडा घेऊन, देशातील सार्वजनिक आरोग्य सेवा विकसित देशांमधील आरोग्य सेवेच्या निम्मी जरी कार्यक्षम केली, तरी खूप होईल!