एका संघनिष्ठाची व्रतस्थ पत्रकारिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 07:02 AM2018-05-29T07:02:15+5:302018-05-29T07:02:15+5:30

संघाचे माजी बौद्धिक प्रमुख आणि त्याच्या मुखपत्राचे दीर्घकाळ संपादक राहिलेले ज्येष्ठ पत्रकार माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य यांना डी.लिट. ही सन्माननीय पदवी देऊन महाकोशलच्या विद्यापीठाने त्यांचा जो गौरव केला तो यथार्थ म्हणावा असा आहे

Healthy Journalism of a Companion | एका संघनिष्ठाची व्रतस्थ पत्रकारिता

एका संघनिष्ठाची व्रतस्थ पत्रकारिता

Next

सुरेश द्वादशीवार
(संपादक, नागपूर)
संघाचे माजी बौद्धिक प्रमुख आणि त्याच्या मुखपत्राचे दीर्घकाळ संपादक राहिलेले ज्येष्ठ पत्रकार माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य यांना डी.लिट. ही सन्माननीय पदवी देऊन महाकोशलच्या विद्यापीठाने त्यांचा जो गौरव केला तो यथार्थ म्हणावा असा आहे. बाबुरावांचा देह, मन, बुद्धी व आत्मा हे सारेच संघाचे आहे. त्यावाचून त्यांना दुसरा विचार नाही आणि वयाची ९४ वर्षे पूर्ण झाली तरी त्यांना दुसरे कोणते क्षेत्र नाही. मात्र त्यांचा संघविचार असहिष्णु नाही. गांधीजी म्हणायचे, मी सनातनी हिंदू आहे पण माझे हिंदुत्व मला इतर धर्मांचा द्वेष करायला शिकवत नाही. बाबुरावांना हिंदुत्वाविषयीचे ममत्व आहे. मात्र त्यांच्याही मनात परधर्माविषयीचा द्वेष वा संघविचारावाचून वेगळ्या विचारांविषयीचा अनादर नाही. बाळासाहेब देवरस, रज्जुभय्या आणि के. सुदर्शन यांच्या सरसंघचालक पदाच्या काळात बाबुरावांचा शब्द त्या तिघांएवढाच संघातही प्रमाण होता. ‘तरुण भारता’त त्यांनी तब्बल ४५ वर्षे त्यांचा ‘भाष्य’ हा स्तंभ लिहिला. दर रविवारी प्रकाशित होणाऱ्या या स्तंभातील बाबुरावांचे मत हेच संघाचे मनोगत असे तेव्हा मानले जात असे. सरसंघचालक हे तसेही इतरांपासून अंतर राखणारे पद आहे. मात्र त्या अंतरात शिरण्याचा व फिरण्याचाच नव्हे तर त्या पदाशी कानगोष्टी करण्याचा मानही बाबुरावांना होता. अनेकांच्या मते देवरसांनंतर रज्जूभय्या, नंतर सुदर्शन व पुढे भागवत हे त्या पदावर येण्याचे कारणही त्या पदाजवळ असलेली बाबुरावांची प्रतिष्ठा हेच आहे.
बाबुराव संस्कृत भाषेचे दीर्घकाळ प्राध्यापक राहिलेले अभ्यासू गृहस्थ आहेत. एक दिवस संघाची आज्ञा येताच आपली मोठ्या पगाराची नोकरी सोडून ते तरुण भारताच्या कार्यकारी संपादक पदावर रुजू झाले. आल्या दिवसापासून त्यांनी त्या पत्राचा संपादकीय ताबा घेतला व क्रमाने त्याला भगवेपण प्राप्त करून दिले. मात्र सर्वसमावेशक व समदृष्टी असलेल्या बाबुरावांनी त्या पत्रात इतर विचारांना, लेखकांना व अगदी संघाच्या टीकाकारांनाही स्थान दिले. ते संपादक असण्याच्या काळातच प्रस्तुत लेखक त्यांच्या पत्रात स्तंभलेखन करीत असे. ते संघावर टीका करणारे व प्रसंगी सरळसरळ संघविरोधी असे. त्यासाठी काहीजण त्यांना बोल लावीत. अशावेळी ते म्हणत ‘ते लिखाण लेखकाच्या नावाने जाते व ते वाचलेही जाते’. १९८० मध्ये त्यांनी प्रस्तुत लेखकाला आसाम आंदोलनावर व १९८४ मध्ये पंजाबात भिंद्रानवाल्याचा हिंसाचारावर लिहायला पाठविले. त्याआधी त्या विषयांबाबतचा संघाचा दृष्टिकोन त्यांनी त्याला समजावून दिला. त्यावर ‘तुम्ही सांगता तसेच सारे दिसेल तर ते मी लिहीन, मात्र तसे नसेल तर ते तुम्हाला चालणारे म्हणून मी लिहिणार नाही’. हे त्याचे म्हणणे ऐकताच बाबुराव समजुतीच्या स्वरात म्हणाले ‘मी आमचे म्हणणे सांगितले. बाकी लिहायला तुम्ही स्वतंत्र आहात’. असे सांगू शकणारा एखाद्या संघटनेच्या मुखपत्राचा संपादक महाराष्ट्रात दुर्मिळ म्हणावा असा आहे. त्याचमुळे बाबुराव संघाचे असले तरी इतरांनाही ते आपले वाटणारे आहेत.
बाबुराव ज्ञानी आहेत आणि संस्कृतसह अन्य भाषांचे त्यांचे अध्ययन सखोल आहे. त्यांचे लिखाण एकतर्फी असले तरी त्याचा डौल मात्र साºयांसोबत असल्याचा आहे. त्यात अवतरणे आहेत, वेगवेगळ्या ग्रंथांचे संदर्भ आहेत आणि त्यांच्या स्मरणशक्तीविषयी वाचकांना अचंबा वाटायला लावणारेही आहे. जरा डोळसपण व सावधगिरी राखून ते वाचले नाही तर ते वाचकाला सरळ संघस्थानापर्यंत पोहोचवणारेही आहे. एकटे बाबुरावच खरे आणि त्यांचा विचारच तेवढा मूलभूत असे वाटावे असे त्याचे स्वरूप आहे. दीर्घकाळ संघात राहून, त्याच्या मुखपत्राचे अनेक वर्षे संपादक राहून आणि सरसंघचालकापासून वाजपेयींच्या मंत्रिमंडळातील अनेकांशी घरोब्याचे संबंध राखूनही बाबुरावांनी आपले सारे आयुष्य भाड्याच्या घरात काढले. ते चांगले शेतकरी आहेत आणि हिंगणघाटजवळची आपली शेती आदर्श बनवितानाच त्यांनी गावकºयांनाही तशा उन्नतीचा हात दिला आहे. धर्म व परंपरा रीतसर सांभाळणारे बाबुराव कर्मठ नाहीत. त्यांच्या घरच्या महालक्ष्मीचे जेवण ही अनेक जातीपंथातील लोकांची पंगत असते आणि तीत शंकर पापळकरसारख्या मतिमंद व अपंगांची सेवा करणाºया फाटक्या समाजसेवकाचे पान पहिले असते. आतिथ्यशीलतेचे वरदान असलेले त्यांचे घर साºयांसाठी सदैव खुले आहे.
आयुष्यभर केलेल्या कामाची नम्र जाणीव राखणारे बाबुराव मनाने स्वच्छ, साधे व सरळ आहेत. आपली दैवते भक्तीभावाने पुजणारे त्यांचे मन इतरांचा भक्तीभाव व वैचारीक स्वातंत्र्य याविषयी आदर राखणारे आहे. ते स्वत: वादात पडत नाहीत. मात्र वाद झाला तर आवाजात जराही धार न आणता आपला मुद्दा रेटून पुढे नेल्यावाचून राहात नाहीत. वयाची नऊ दशके पूर्ण झाली तरी ते नेमाने शाखेत जातात. तीत जमलेल्या थोड्याशा लोकांशी स्नेहभावाने बोलतात. त्यांच्या भेटीला केंद्रीय मंत्र्यांपासून अनेकजण येतात पण त्याची साधी वाच्यता त्यांच्या उक्तीत नसते. ‘मला अजून पाच वर्षे जगायचे आणि माझी शंभरी पूर्ण करायची आहे’ असे ते सहजपणे म्हणतात तेव्हा त्यांना त्यांचे सेवाकार्य अजून पूर्ण व्हायचे राहिले आहे असेच वाटत असावे असे मनात येते. त्यांचे लिखाण ग्रंथबद्ध आहे. ते वाचले जाणारेही आहे. मात्र त्यावर संघाचा शिक्का असल्याने विचारवंतांच्या क्षेत्रात त्याची चर्चा नाही आणि बाबुरावांनाही त्याची खंत नाही. एवढी वर्षे संबंध राखून व त्यांच्या प्रेमाला पात्र होऊन त्यांना एखादी चांगली वस्तू भेट द्यावी असे मनात आले तेव्हा प्रस्तुत लेखकाने त्यांना पंढरपूरच्या विठूरायाची देखणी मूर्ती आदराने दिली. त्यांनी तात्काळ आपल्या पत्नीला बोलावले व त्या दाम्पत्याने त्या मूर्तीला भक्तीभावाने हात जोडले. त्यांचे ते साधेपण प्रस्तुत लेखकालाच सद्गदीत करणारे ठरले.
आता बाबुराव तरुण भारतात लिहीत नाही. त्यांचे लिखाण संघविचाराची इतर पत्रे प्रकाशित करतात. गेली दहा वर्षे ते लोकमतच्या दिवाळी अंकात आपला वैचारीक लेख लिहितात. तो पटणारा नसला तरी सन्मानपूर्वक प्रकाशित होतो. ‘त्यात तुम्हाला बदल करायचा असला तर करा’ असे ते म्हणतात. पण त्यांच्या लिखाणात दुरुस्ती करण्याचे धाडस कुणी करीत नाही. त्यांचे वय झाले आहे. त्यांच्या चर्येवर एक प्रसन्न समाधान आहे. आपण एक सार्थ आयुष्य घालविल्याची जाण त्यावर आहे. मात्र एवढ्या सबंध काळात त्यांच्या चर्येला अहंकाराच्या रेषेने कधी स्पर्श केला नाही. नागपूरकरांनी व त्यांच्या विचारांच्या लोकांनी त्यांच्या कार्याचे करावे तेवढे कौतुक केले नाही. त्याचमुळे आताचा महाकोशलचा त्यांच्या वाट्याला आलेला सन्मान ही कसर पूर्ण करणारा आहे असे मनात येते. त्यावेळचा त्यांचा उपदेशही ध्यानात घ्यावा असा आहे. ‘वृत्तपत्र जनतेचे असते व ते सर्वसमावेशक राखणे हे संपादकाचे उत्तरदायित्व आहे’ असे ते म्हणाले.
अशा या निर्लेप, नि:स्वार्थी व निरहंकारी संपादक कार्यकर्त्याला मन:पूर्वक शुभेच्छा आणि असा माणूस आशीर्वादासाठी सदैव आपल्यासोबत राहावा ही अपेक्षा.

Web Title: Healthy Journalism of a Companion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.