मिठाच्या व्यसनामुळे हार्ट ॲटॅक! कशामुळे वाढते मीठ? आणि यावर उपाय काय?

By संतोष आंधळे | Published: April 9, 2023 05:45 AM2023-04-09T05:45:43+5:302023-04-09T05:46:39+5:30

आपण दिवसभरात किती मीठ खाल्ले, या प्रश्नाचे आपल्याला उत्तर देता येणार नाही. कारण आपल्याकडे कुणीही मोजून मापून मीठ खात नाही.

Heart attack due to salt addiction What causes salt to rise And what is the solution read here | मिठाच्या व्यसनामुळे हार्ट ॲटॅक! कशामुळे वाढते मीठ? आणि यावर उपाय काय?

मिठाच्या व्यसनामुळे हार्ट ॲटॅक! कशामुळे वाढते मीठ? आणि यावर उपाय काय?

googlenewsNext

आपण दिवसभरात किती मीठ खाल्ले, या प्रश्नाचे आपल्याला उत्तर देता येणार नाही. कारण आपल्याकडे कुणीही मोजून मापून मीठ खात नाही. चवीला लागेल तेवढं मीठ आपण खात असतो. मिठाशिवाय जेवण, अशी कल्पना आपण करणार नाही. मात्र, याच मिठाच्या आपण इतके आहारी गेलो आहोत की, आपल्याला मिठाचे व्यसन लागले आहे, हे आपल्या ध्यानीमनीही येत नाही. या अतिरिक्त मिठाच्या सेवनाचा परिणाम थेट आपल्या हृदय आणि किडनीवर होतो. 

जागतिक आरोग्य परिषदेने मिठाचे सेवन किती करावे, याची मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत. त्यानुसार दररोज ५ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. मात्र, अनेक वैद्यकीय संशोधन अहवालातून भारतीय माणूस सरासरी १० ते १२ ग्रॅम मीठ खात असल्याचे दिसून आले आहे. याचा अर्थ आपण दुपटीने मीठ खात आहोत. या अतिरिक्त मिठाच्या सेवनामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन उच्च रक्तदाबाच्या (हायपरटेंशन) समस्येला आपल्याला सामोरे जावे लागते. उच्च रक्तदाबाचे रुग्ण गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. विशेष म्हणजे सर्वसाधारण पन्नाशीनंतर होणारा हा आजार आता तिशीच्या तरुणांना होताना दिसत आहे. आधुनिक जीवनशैलीतून हे सर्व प्रकार उदयास आले आहेत.

काही लोक जेवताना भाजीत अतिरिक्त मीठ घेतात. तसेच आधुनिक जीवनशैलीमुळे फास्ट फूड खाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात मोठ्या प्रमाणात मिठाचे प्रमाण असते. अनेक वेळा प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये चवीसाठी मीठ टाकावेच लागते.

रक्ताभिसरणासाठी रक्तवाहिन्यांमध्ये पुरेसा जोर व दाब असणे आवश्यक असते. त्यात बिघाड झाल्यास त्याचा परिणाम हृदयाच्या आणि मेंदूच्या कार्यावर होऊ शकतो. यकृताचे विकार झाल्यानंतरसुद्धा मिठाच्या सेवनावर मर्यादा येतात. सुरुवातीच्या काळात रक्तदाबाची लक्षणे फारशी जाणवत नाहीत. मात्र, नंतर त्याचा त्रास जाणवण्यास सुरुवात होते.

कोणते आजार होऊ शकतात?
- हृदयविकार
- लठ्ठपणा
- मेंदू विकार
- उच्च रक्तदाब
- किडनीचे विकार

कशामुळे वाढते मीठ? 
मीठ अन्नपदार्थ टिकवण्यासाठी वापरले जात असल्याने वाळवण्याचे पदार्थ, पापड, लोणची यात मिठाचे प्रमाण अधिक असते.
पॅकबंद अन्नपदार्थ उदा. वेफर्स, खारवलेल्या डाळी, खारवलेले काजू- पिस्ते, खारे शेंगदाणे, नाचोज, सॉसेस, शेजवानसारख्या चटण्या, वेगवेगळे स्प्रेड. 
प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ उदा. चीज, बटर, मियॉनिज, ज्यूस आदी. रेडी टू कूक पदार्थांत पराठे, ग्रेव्ही असलेल्या भाज्या, टिक्की, कटलेट, बटाटा- मका - वाटाणे यांच्यापासून तयार केलेले व तळलेले पदार्थ.

 हे करा ! 
न शिजलेले मीठ, हे कच्चे मीठ मानले जाते. ते जास्त हानिकारक मानले जाते.
समुद्री मिठापेक्षा सैंधव मीठ (खाणीतील), काळेमीठ (जमिनीतील), सरोवरातील (सांबरलवण), खाजणातील (बीडलवण) मीठ आलटून-पालटून वापरावे, असेही सुचवले जाते.

धोका किती? 
मिठाचा अतिरिक्त वापर कमी केला, तर दरवर्षी जगभरात १० लाख लोकांचा वेगवेगळ्या आजारांपासून जीव वाचू शकतो.
रेडू टू कूक पदार्थ, फास्ट फूड, हॉटेलांतील पदार्थ, रस्तोरस्ती मिळणारे पदार्थ यातील मिठाचा सढळ वापर कमी करायला हवा.
मेक्सिको, मलेशिया, सौदी अरेबिया, स्पेन, ब्राझील, चिली, झेक रिपब्लिक, लिथुआनिया, उरुग्वे आदी देशांनी मिठाचा वापर कमी करण्यात पुढाकार घेतला आहे.

जागतिक आरोग्य परिषदेने मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत. त्यापेक्षा रोज दुपटीने मीठ खाणे, हे व्यसन नाही तर काय आहे? सोडियमचे शरीरातील अतिरिक्त प्रमाण हे घातकच आहे. याबाबत आम्ही विशेष करून हृदयविकारांच्या रुग्णांना समुपदेशन करत असतो. आपल्याकडे लहानपणापासून केक, बिस्कीट, जंकफूड मुलांना खायला दिली जातात. यामध्ये मीठ मोठ्या प्रमाणात असते. 
- डॉ. विजय डिसिल्व्हा, 
संचालक, क्रिटिकल केअर विभाग, एशियन हार्ट इन्स्टिट्यूट


आम्ही रुग्णांना रोज केवळ ३ ते ४ ग्रॅम मीठ खाण्याची परवानगी देतो. हे प्रमाण जागतिक आरोग्य परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वांपेक्षाही कमी आहे. किडनीचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर जास्त मीठ खाणे टाळले पाहिजे. मीठ पचविण्यास किडनीला अतिरिक्त परिश्रम घ्यावे लागतात. त्यामुळे मीठ कमी खाणेच योग्य आहे.
- डॉ. जतीन कोठारी, संचालक, किडनी विकार विभाग, नानावटी मॅक्स रुग्णालय

Web Title: Heart attack due to salt addiction What causes salt to rise And what is the solution read here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.