तारणहार शेतीला तडाखा! हवामानाने अनाकलनीय वळण घेतल्याचा मोठा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 02:20 AM2020-10-16T02:20:54+5:302020-10-16T02:21:18+5:30
कोरोनाच्या महामारीत कृषी हे क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेसाठी तारणहार ठरणार असे वातावरण होते; पण हवामान खात्याचा अंदाज सरासरीपुरता खरा ठरत असला तरी पाऊस कसा-कसा पडत राहील याचा अंदाज देण्यात पुन्हा एकदा हे खाते नापास झाले.
कोरोना महामारीमुळे पृथ्वीच्या इतिहासात २०२० हे दुर्दैवी वर्ष म्हणून नोंदविले जात असताना निसर्गाच्या आगळ्या-वेगळ्या अवतारानेही लक्षात राहणार आहे. संपूर्ण पृथ्वीवरील मानवी समूहाच्या व्यवहारावर आणि जगण्याच्या आनंदावर विरजण टाकणाऱ्या या घटनांचा फटका सर्वच क्षेत्राला कमी-अधिक प्रमाणात बसला आहे. उद्योग, व्यापार, रोजगार, सेवा क्षेत्र, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण आदी सर्वच क्षेत्रांवर गंभीर परिणाम होत आहे. अनेकांना मानसिकदृष्ट्याही भयावह त्रास सहन करावा लागतो आहे. शेतावर काम करणारा शेतकरी, असंघटित मजूर, रोजंदारीवरील कामगार ते आयटी क्षेत्रातील अभियंते, तंत्रज्ञ, संशोधकांना जगण्यासाठी नव्या कल्पना आणि संधीचा शोध घेण्याची वेळ आली आहे. अशा पार्श्वभूमीवर आपल्या देशातील हवामानाने अनाकलनीय वळण याच महामारीच्या काळात घेतल्याचा मोठा फटका शेती-शेतकरी यांना बसला आहे.
कोरोनाचा सर्वच क्षेत्राला नकारात्मक फटका बसला असताना केवळ अन् केवळ कृषी हे एकच क्षेत्र असे होते की, चालू वर्षातील हंगामात तुलनेने उत्तम पाऊस झाल्याने भारतीय जनतेला तारणहारच्या रूपात मदतीला येणार होते. भारत हा विविध संस्कृती, धर्म, भाषांचा देश आहे. तसाच तो विविध प्रकारच्या हवामानाचे स्तर असलेला आहे. परिणामी खरीप आणि रब्बी तसेच बारमाही पद्धतीच्या पिकांचा प्रदेश आहे. पिकांची विविधता खूप आहे. त्यानुसार विकसित झालेल्या खाद्यसंस्कृतीचाही जगण्याशी संबंध आहे. यासाठी कृषिक्षेत्राचे उत्पादन चांगले होणे महत्त्वाचे असते. पावसाळा चांगला झाला की, भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी येते. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही चालू हंगाम उत्तम जाणार, सरासरीपेक्षा थोडा अधिकच पाऊस होणार हा अंदाज होता. मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली तेव्हाच मान्सून वेळेवर आहे, अशी हाकाटी हवामान खात्याने दिली. शेतकऱ्यांनी गडबडीने पेरण्या केल्या आणि जुलै महिना कोरडा जाताच दुबार, तिबार पेरण्या कराव्या लागल्या. अनेक ठिकाणी बनावट बियाणांचा फटका बसला.
ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाने सरासरी ओलांडली आणि कृषिक्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा तारणहार ठरणार असे वातावरण होते; पण हवामान खात्याचा अंदाज सरासरीपुरता खरा ठरत गेला असला तरी पाऊस कसा-कसा पडत राहील याचा अंदाज देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात पुन्हा एकदा हे खाते नापास झाले. १२ नोव्हेंबर १९७७ रोजीचा इतिहासाचा दाखला देत ‘लोकमत’ने वृत्तांत दिला, तोच खरा ठरला. तब्बल ४३ वर्षांनंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला. मागील दोन महिन्यांत उत्तम पाऊस झाल्याने ऑक्टोबर हिटने भरपूर बाष्प तयार झाले होते. त्यामुळे बंगालच्या उपसागरावर कमी दाबाच्या पट्ट्याने निर्माण झालेल्या वादळाचे घोंगावणे सुरू झाले. त्याचवेळी पश्चिमेच्या अरबी समुद्रात कमी दाब तयार होताच तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, गुजरात असा प्रवास करीत चक्रीवादळ पश्चिमेकडे सरकत राहिले. त्यातून गेल्या चार दिवसांत दररोज ठिकठिकाणी शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस होत राहिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तम पिकणाऱ्या शेतीचे पार वाटोळे झाले. उभी पिके पाण्यावर तरंगू लागली.
सोयाबीन कुजू लागले, कापणीला आलेला भात झडू लागला. भाजीपाला, फळबागा कोसळू लागल्या. उभ्या पिकांचे होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागला नाही. तारणहारच संकटात आला. अद्याप दोन दिवस हा पूर्व-पश्चिमेच्या दिशेने धावणाऱ्या चक्रीवादळाचा तडाखा कायम राहाणार, असा अंदाज आहे. हैदराबाद या ऐतिहासिक शहराच्या परिसरात केवळ दोन तासांत दोनशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली. असा पाऊस गेल्या शंभर वर्षांत झाला नव्हता. मनुष्यहानीबरोबरच कृषिक्षेत्राचे अतोनात नुकसान झाले. आता तरी केंद्र सरकारने हवामान खात्याकडील तंत्रज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने करून पावसाचा अंदाज अचूक वर्तविला पाहिजे. असे झाले असते तर हैदराबाद शहरातील संपत्तीचे मोठे नुकसान टाळण्यास मदत झाली असती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बसलेला हा तडाखाही एक दुर्दैवी घटना म्हणून नमूद करावे लागणार आहे.