युरोपातील असहाय्य निर्वासित

By Admin | Published: September 4, 2015 10:20 PM2015-09-04T22:20:37+5:302015-09-04T22:20:37+5:30

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर करणाऱ्यांचा प्रश्न आपल्याकडे बऱ्याचदा डोके वर काढत असतो. पण स्थलांतरितांच्या घुसखोरीचा प्रकार फक्त आपल्याकडेच होतो असे नाही

Helpless refugees in Europe | युरोपातील असहाय्य निर्वासित

युरोपातील असहाय्य निर्वासित

googlenewsNext

प्रा.दिलीप फडके (ज्येष्ठ विश्लेषक)
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर करणाऱ्यांचा प्रश्न आपल्याकडे बऱ्याचदा डोके वर काढत असतो. पण स्थलांतरितांच्या घुसखोरीचा प्रकार फक्त आपल्याकडेच होतो असे नाही. अशी घुसखोरी जगात इतर ठिकाणीही होत असते. युरोपमध्ये सध्या अशा घुसखोरांच्या प्रश्नाने अनेक देशांमध्ये डोकेदुखी निर्माण केली आहे. निर्वासितांची ही ‘ब्याद’ आपल्या देशातून हाकलून लावायच्या प्रयत्नात सध्या युरोपियन राष्ट्रे आहेत. हंगेरीसारख्या देशांनी तर आपल्या सीमांना कुंपणे आणि भिंती घातल्या आहेत. त्यापायी अडवले गेलेले निर्वासित रस्ते, फुटपाथ किंवा मिळेल त्या मोकळ्या जागी आपले डेरे टाकून कसेबसे राहत आहेत. त्यात लहान मुले आणि म्हातारी माणसेही आहेत. मिळेल त्या मार्गाने युरोपात शिरण्यासाठी केल्या जाणाऱ्या धडपडीत शेकडांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. निर्वासितांचा प्रश्न ही ग्रीस, इटली, फ्रान्स, जर्मनी, हंगेरी यासारख्या देशांपुढील मोठी समस्या बनला आहे.
ब्रान्को मिलनोविक या न्यूयॉर्क सिटी युनिव्हर्सिटीमधल्या प्राध्यापकानी या समस्येचे अतिशय वस्तुनिष्ठ विश्लेषण करणारा ब्लॉग लिहिला आहे. युरोप आणि आफ्रिकेमधल्या लोकांच्या आर्थिक परिस्थितीत रुंदावत चाललेली दरी, युरोपातल्या देशांची निर्वासितांना सामावून घेण्याची कमी होत असलेली क्षमता, लिबिया, सिरीया यासारख्या देशांमधली अस्थिरता आणि त्या देशांबद्दलची चुकीची राजकीय धोरणे, तसेच युक्रेन, आर्मिनिया यासारख्या देशांमधली यादवी यासारख्या अनेक कारणांनी ही समस्या गंभीर झाली असल्याचे ते सांगतात.
‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने या संदर्भात मार्गारेट फेहर या बुडापेस्टमधल्या ज्येष्ठ पत्रकाराचे एक वार्तापत्र प्रकाशित केले आहे. त्यात निर्वासितांमुळे हंगेरीवर होणाऱ्या परिणामांचे चित्रण केले आहे. हंगेरीने आपल्याकडच्या रेल्वेचे दरवाजे निर्वासितांसाठी बंद केले असून ज्यांच्याकडे तिकीट आहे, त्यांनाही रेल्वेत घेतले जात नाही. केलेटी स्टेशनच्या जवळ एका मोकळ्या जागेला कुंपण घालून तिथे या लोकांसाठी तात्पुरत्या शिबिरासाठी तंबू वगैरे टाकून काही सोयी केल्या जात आहेत. बुडापेस्ट शहरावर या लोकांची कोणतीही कायदेशीर जबाबदारी नाही, हे सांगत आपण मानवी दृष्टीकोनातून शक्य तेवढी मदत करीत आहोत, असे बुडापेस्टचे महापौर इस्तिवान तर्लोस यांनी म्हटले आहे.
बुडापेस्टहून जर्मनीला जाणाऱ्या रेल्वेच्या प्रवासात निर्वासितांमुळे ज्या समस्या उभ्या राहत आहेत त्यांचे जे वर्णन ‘बीबीसी’ने आपल्या वार्तापत्रात केले आहे, ते वाचले की आपल्याला निर्वासित किती भयानक अवस्थेत आहेत याची पक्की कल्पना येते. या समस्येमुळे सध्या हंगेरीतली पश्चिम युरोपातल्या देशांकडे जाणारी रेल्वेवाहतूक बंद करण्याचा निर्णय तिथल्या सरकारने घेतला आहे. बुडापेस्टमध्ये निर्माण झालेल्या गंभीर स्थितीचे वर्णन ‘द इकॉनॉमिस्ट’नेही केले आहे. जर्मनी (धोक्याचे )इशारे देत आहे पण हंगेरीने आपले दरवाजे बंद करून घेतले आहेत असे सांगतानाच या लेखात निर्वासितांच्या हलाखीच्या स्थितीेची माहिती दिली आहे. काहीजण त्यांना आर्थिक कारणांसाठी आलेले निर्वासित मानतात तर काहीजण त्यांना राजकीय निर्वासित समजतात. पण त्यांच्या दृष्टीकोनातून या फरकाला काहीच अर्थ नाही. केलेटी स्टेशनजवळच्या छावणीत ते आपल्याला पश्चिम युरोपात जायची संधी मिळण्याची वाट बघत आहेत. इथवर येताना अनेकजण प्रवासात मृत्युमुखीसुद्धा पडले आहेत. त्यांना इथे आणणाऱ्या स्मगलर्सनी त्यांना अमानवी पद्धतीने आणले आहे. जे भूमध्य समुद्र ओलांडून आले आहेत त्यांच्यातले अनेकजण वाटेत मृत्यू पावले आहेत. मागच्या महिन्यात आॅस्ट्रियात सापडलेल्या एका ट्रकमध्ये पंचाहत्तरजण मृतावस्थेत सापडले होते तर मागच्याच आठवड्यात एका वाहनाच्या बंदिस्त कंपार्टमेंटमधून चोवीस अफगाणी युवकांना सोडवल्यामुळे त्यांचे जीव वाचले होते. बहुसंख्य निर्वासितांना जर्मनीला जायचे आहे. कारण जर्मनीने सर्वाधिक लोकाना सामावून घेतले आहे. जवळपास चाळीस हजार निर्वासित तिथे आहेत. बुडापेस्टहून प्रकाशित होणाऱ्या ‘पोर्टफोलिओ’ या आर्थिक विषयावरच्या नियतकालिकाने आणि हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ओर्बान यांचे कॅबिनेट प्रमुख जनोस लाझर यांनी दोषाचे खापर जर्मनीवर फोडले आहे. जर्मनीच्या कडक नियमांमुळे तिकडे जाणाऱ्या निर्वासितांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितल्याचे पोर्टफोलिओने म्हटले आहे.
तिकडे इंग्लंडने अधिकाधिक लोकाना स्वीकारले पाहिजे, अशी मागणी इंग्लंडमधूनच उठायला लागली असल्याची बातमी ‘द टेलिग्राफ’ने दिली आहे. पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांना देण्यासाठी तयार होत असलेल्या या आशयाच्या एका अर्जावर जवळपास साठ हजारपेक्षा जास्त लोकांनी सह्या केल्या असल्याची माहितीही टेलिग्राफने दिली आहे. जर्मनीच्या ‘बी न्यूज बर्लिन’ने या विषयावरच्या आपल्या बातमीत निर्वासितांसाठी जर्मनीत जी तयारी केली जाते आहे तिची सविस्तर माहिती दिली आहे. हंगेरीमधून आलेले चौदा हजार निर्वासित सध्या बर्लिनमध्ये आहेत असे नमूद करून त्या बातमीत पुढे नव्याने येणाऱ्या निर्वासितांची संख्या निश्चित नसली तरी त्यांच्यासाठी निवासाची आणि इतर व्यवस्था करायला सुरुवात केली असल्याची माहिती दिली आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांच्या मदतीने जवळपास चार हजार लोकांसाठी अन्न आणि कपडे वगैरे जमवण्याच्या प्रयत्नाला बर्लिनचे महापौर मायकेल मुल्लर आणि त्यांचे सहकारी लागले आहेत. या लोकांना राजकीय आश्रय मागण्याचा अधिकार असला तरी आपल्यालाही राष्ट्रप्रेमाचे आणि कायद्याच्या संपूर्ण पालनाचे धोरण अवलंबण्याचा अधिकार आहे, हे जर्मनीच्या अध्यक्ष अन्जेला मार्केल यांनी सांगून याबाबत आपल्या सरकारचे धोरण कसे असेल याची चुणूक दाखवली आहे. मात्र आपल्याकडे येणाऱ्या लोकाना त्रास होणार नाही आणि त्यांना हिंसाचार आणि जर्मन जनतेच्या तिरस्काराचा अनुभव येऊ देता कामा नये हे सांगायला त्या विसरलेल्या नाहीत.
दरम्यान समुद्रमार्गे ग्रीसमध्ये घुसताना बोटीतल्या एका तरुणाच्या हातातून त्याचे अलान कुर्दी नावाचे लहान मूल निसटले आणि पाण्यात पडले. त्याचा विद्रुप झालेला मृतदेह तरंगत ग्रीसच्या किनाऱ्याला लागला. त्या घटनेची सचित्र हृदयद्रावक कहाणी ‘ल मॉंद’सह अनेक वृत्तपत्रांनी प्रकाशित केली आहे. युरोपातल्या निर्वासितांच्या या समस्येचा विषय जगाच्या चिंतेचा विषय झालेला असतानाच दक्षिण आशियात मलेशियात येण्याच्या प्रयत्नात बोट उलटून चौदा निर्वासित बडून मृत्यूमुखी पडल्याची बातमी बीबीसीने दिली आहे. पूर्व असो की पश्चिम, असहाय्य निर्वासितांची समस्या सगळीकडेच पाहायला मिळते. इंग्लंडमधल्या ‘द इंडिपेंडंट’मधले सोबतचे व्यंगचित्र कुणालाही अंतर्मुख करणारे आहे हे नक्की .

Web Title: Helpless refugees in Europe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.