प्रासंगिक : आरोग्य व्यवस्थांपुढचे नवे आव्हान हिपॅटायटीस : ‘वी आर नॉट वेटिंग’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 08:01 AM2023-07-28T08:01:19+5:302023-07-28T08:02:30+5:30
वेगवेगळ्या विषाणूंमुळे यकृताला होणारा हिपॅटायटीस हे जगभरातल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थांपुढचे मोठे आव्हान आहे. आज ‘हिपॅटायटीस दिन’! त्यानिमित्त..
डॉ. चेतन कलाल, हिपोटोलॉजिस्ट यकृत, पित्ताशय, स्वादुपिंड तज्ज्ञ
वेगवेगळ्या विषाणूंमुळे यकृताला होणाऱ्या हिपॅटायटीस या आजारामुळे जगभरात लक्षावधी लोक मृत्युमुखी पडतात. आज २८ जुलै रोज जगभर ‘हिपॅटायटीस दिन’ साजरा होतो. या आजाराविषयी जागृती करणे हा त्यामागचा उद्देश आहे. यंदाचा ‘हिपॅटायटीस दिन’ हा ‘वी आर नॉट वेटिंग’ हे घोषवाक्य घेऊन पाळला जाणार आहे. निदान न झालेले हिपॅटिटिसचे रुग्ण शोधून त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यावर यंदा भर देण्यात येईल. ‘सायलेंट किलर’ मानल्या जाणाऱ्या या आजाराचा प्रभावी सामना करणे हे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थांपुढचे मोठे आव्हान आहे.
बी आणि सी प्रकारच्या विषाणूजन्य हिपॅटिटिसने मोठा आरोग्यविषयक प्रश्न उभा केला आहे. आतड्याचा कर्करोग होऊन मृत्युमुखी पडणाऱ्या दोन तृतीयांश लोकांना बी आणि सी प्रकारचा हिपॅटायटीस झालेला असतो. ९१ टक्के लोकांना बी प्रकारचा हेपॅटिटिस झाल्याचे लक्षात येत नाही. सी च्या बाबतीत हे प्रमाण ८० टक्के आहे. अनेक देशांत मुलांना द्यायच्या लसीच्या कमतरतेमुळे हा आजार बळावतो. जगभरात सुमारे २९ कोटी लोक या संसर्गासह जगतात आणि त्यांना या संसर्गाची कल्पनाही नसते, असे आकडेवारी सांगते. २०३० पर्यंत या दोन्ही प्रकारच्या संसर्गांना आळा घालण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
हिपॅटायटीस या आजाराचा सामना भारतालाही मोठ्या प्रमाणावर करावा लागतो. त्यात ए आणि ई या प्रकारचे जास्त रुग्ण दिसतात. यामागे अस्वच्छता, पिण्याचे असुरक्षित पाणी, भेसळीचे अन्न आणि व्यक्तिगत स्वच्छतेची काळजी न घेणे ही कारणे प्रामुख्याने आहेत. देशातील मृत्यूचे कारण असलेल्या आजारांत यकृताचे विकार १०व्या क्रमांकावर असल्याचे जागतिक आरोग्य संघटना सांगते. देशातल्या पाचपैकी एकाला तरी यकृताशी संबंधित आजार झालेला असतो. देशात पाच कोटींहून जास्त लोक या विषाणूजन्य आजाराचे वाहक आहेत. ए आणि ई प्रकारचा हिपॅटायटीस मुखावाटे विषाणू आत जाऊन होतो. थकवा, फ्लूसारखी लक्षणे, पोटात दुखणे आणि काविळ ही त्याची लक्षणे आहेत. या प्रकारचा आजार पावसाळ्यात आपल्याकडे वाढलेला दिसतो.हिपॅटायटीस बी आणि सी चा संसर्ग रक्त, वीर्य आणि अन्य शारीरिक स्त्रावांतून होतो. दूषित रक्त दिले जाणे, असुरक्षित शस्त्रक्रिया किंवा औषधांचा वापर ही त्याची कारणे आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांना चुकून सुई टोचली जाणेही संसर्गास कारणीभूत ठरते. शरीरसंबंध आणि आईकडून मुलाला संसर्ग जाणे ही प्रसाराची आणखी महत्त्वाची कारणे आहेत. हेमोडायलिसिसवर असलेल्या रुग्णांना या आजारांपासून जास्त धोका संभवतो. कित्येक वर्षे हे विषाणू कोणतीही लक्षणे न दाखवता शरीरात राहतात. पुरेशी काळजी घेतल्यास टोकाचा आजार बरा होऊ शकतो.
मात्र, घरगुती उपाय हानिकारक ठरू शकतात. आजार झालेल्यांवर कोणतेही खाण्यापिण्याचे निर्बंध नाहीत. सर्वसाधारण समजूत आहे त्यानुसार पिवळ्या रंगाचे पदार्थ (उदाहरणार्थ हळद) पोटात गेल्याने आजार बळावत नाही. घर किंवा कार्यालयात रुग्ण असला तरी बी आणि सी प्रकारांचा संसर्ग होत नाही. लवकर निदान आणि उपचार तसेच या आजाराला लागलेला सामाजिक कलंक कमी करणे महत्त्वाचे आहे.
हिपॅटिटिसच्या उपचारावर बऱ्यापैकी खर्च होतो. रुग्णाचे मानसिक आरोग्य बिघडते. म्हणून वेळीच निदान आणि उपचार गरजेचे असतात. भारतात एक तर याविषयी पुरेशी जागृती नाही, निदानाच्या सुविधा अपुऱ्या पडतात; तरी सरकारने ‘नॅशनल व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम’ राबवून मोफत निदान आणि उपचार उपलब्ध करून दिले आहेत. जागृती आणि वेळीच उपचार हेच हा आजार रोखण्यासाठी महत्त्वाचे आहे.
ए आणि बी प्रकारच्या हिपॅटिटिसवर लसही उपलब्ध आहे. सी वर प्रभावी उपचार होऊ शकतात. हा असाध्य आजार नाही. नियमित चाचण्या, वेळीच उपचार आणि लसीकरण यावर भर देऊन यंदा ‘वी आर नॉट वेटिंग’ असा उद्घोष करण्यात आला आहे. म्हणून आजच्या जागतिक हिपॅटायटीस दिनी आपण सर्व मिळून जगाला या विषाणूजन्य आजाराच्या विळख्यातून सोडविण्यासाठी वचनबद्ध होऊया. निदान झालेले रुग्ण शोधून त्यांना उपचार देऊन, प्रतिबंधात्मक उपाय योजून लक्षावधी लोकांचा जीव आपण वाचवू शकतो.