अतिंद्रिय शास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 06:03 AM2018-12-29T06:03:34+5:302018-12-29T06:03:47+5:30
आपल्यापैकी थोड्यांनाच पटेल की, निसर्गातील दोन सत्यभौतिक व अतिंद्रिय ही एकमेकांशी जुळणारी व मिसळणारी आहेत.
- डॉ़ मेहरा श्रीखंडे
आपल्यापैकी थोड्यांनाच पटेल की, निसर्गातील दोन सत्यभौतिक व अतिंद्रिय ही एकमेकांशी जुळणारी व मिसळणारी आहेत. परंतु भौतिक जग हे आपल्या पाच कर्मेंद्रियाशी निगडित असते व जागृतावस्थेत असते तर अतिंद्रिय जग हे अंधुक अशा चेतनेशी निगडित असून तर्कशास्त्र व वादविवाद यांच्यापलीकडे असते. भौतिकशास्त्र व अतिंद्रिय शास्त्र यामधील फरक हा जडत्व व भूत, मर्यादित व अमर्यादित, मानव व ईश्वर यांच्यातील फरकासारखा आहे.
आपले भौतिक शरीर ही एक माया आहे. या मायेच्या शरीराखाली जीवनाचा मूळ प्राण आहे. प्राण हा विश्वाचा असून सर्वव्यापक ऊर्जा, जी सर्व प्राणिमात्रात वास्तव्यास आहे, त्याचाच एक भाग आहे.
एक पुनर्जन्म हा फक्त त्या आत्म्याच्या पृथ्वीप्रतलातील एक प्रवास आहे. प्रत्येक आत्मा हा अनेक जन्मांतून फिरत असतो. या साखळीतूनच तो स्वत:ची प्रगती करून घेत असतो. हे भौतिक विश्व हेच सत्य आहे, हे जाणून घेण्यासाठीच तो भौतिक शरीरात प्रवेश करतो.
ज्याप्रमाणे पाणी, बर्फ व वाफ ही विविध तरंगलहरींवरील एकाच गोष्टीची रूपे असतात, त्याप्रमाणे आपले भौतिक शरीरही असते. परंतु अवकाशीय जग हे वेगळ्या तरंगलहरीवर असते. जर त्या तरंगलहरींबरोबर आपण सूर जुळविला तर आपल्याला त्या लहरी समजू शकतात.
आपण एकटे नाही, हे आपण जाणून घेतले पाहिजे. या विश्वाचाच आपण एक भाग आहोत. निर्माण करणाऱ्याने जे निर्माण केले त्यात व आपणात एक प्रकारची एकवाक्यता आहे. आपण आपल्याला घडवू शकतो व आपल्या अंधुक जाणिवांची उत्क्रांती घडवून आणू शकतो. आपल्या अतिंद्रिय शक्तींचा विकास करून विश्वातील ऊर्जा बघू व जाणवू शकतो. त्याच्याचमुळे आपण मानव व प्राणी यांच्या भोवतीचे दैवी आवरण बघू शकतो. अवकाशीय जगातील आवाज ऐकू शकतो व अतिंद्रिय शक्तीने अनेक गोष्टींचे ज्ञानही मिळवू शकतो. प्रत्येक मानवाला त्याच्या स्वत:च्या प्रयत्नाने विश्वाशी जोडण्याची प्रक्रिया निर्माण करायची असते. दैवीतत्त्वाचे ज्ञान समजून घेणे हे विशेष काम आपणास करायचे असते. आपल्यातले पुष्कळ जण ही महत्त्वाची गोष्ट न समजताच जगतात. मेंदूमध्ये खोलवर असलेली वाटाण्यासारखी पिनियल ग्रंथी ही तत्त्वज्ञानी व गूढवादी यांच्या मते भौतिक व अतिंद्रिय जगाशी संपर्क साधणारी एकसारखी आहे. ज्याला तिसरा डोळा किंवा आत्म्याची जागा असे म्हटले जाते, ती ही ग्रंथी ध्यान व दैवी शिक्षण याद्वारे उद्दीपित केली जाते.