इथे मृतांना मिळतो ‘न्याय’
By संतोष आंधळे | Published: November 20, 2022 03:36 PM2022-11-20T15:36:33+5:302022-11-20T15:38:59+5:30
श्रद्धा वालकर या तरुणीच्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला. अत्यंत थंड डोक्याने केलेली हत्या आणि तेवढ्याच क्रूरतेने केलेले मृतदेहाचे 35 तुकडे, हे सर्व अक्षरश: काळजाचा थरकाप उडवणारे आहे. आता या सगळ्यांची जुळवाजुळव करून मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम न्यायवैद्यक विभाग करणार आहे...
फॉरेन्सिक सायन्स अर्थात न्यायवैद्यक शास्त्राची तोंडओळख आपल्याला अलीकडच्या वेब सीरिजच्या माऱ्यामुळे वा सिनेमा, टीव्हीवरील मालिकेमुळे झालेली असते. मात्र, त्याचे काम नेमके चालते कसे हे जाणून घेणे उद्बोधक आहे. सध्या देशभर गाजत असलेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात फॉरेन्सिक विभागच केंद्रबिंदू ठरणार आहे. श्रद्धाचा लिव्ह-इन पार्टनर आणि मारेकरी आफताबने तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून ते दिल्लीच्या आसपासच्या परिसरात इतस्तत: टाकले आहेत. ते तुकडे शोधण्याचे मोठे आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे. त्यानंतर सापडलेल्या हाडांच्या आधारे ते नेमके कुणाचे आहेत यासाठी त्यांना सर्वस्वी न्यायवैद्यक शास्त्र तज्ज्ञांवर अवलंबून राहावे लागणार आहे.
२०१२ साली शीना बोरा हत्या प्रकरणाने अशाच पद्धतीने देशभर खळबळ माजली होती. या प्रकरणात आरोपींनी शीनाची हत्या करून तिचा मृतदेह रायगड येथील जंगलात पुरला होता. त्यावेळी या प्रकरणातील आरोपीना अटक करून तो मृतदेह उकरून बाहेर काढून त्याचा काही भाग न्यायवैद्यक शास्त्र विभागाला दिला होता. त्यामध्ये नायर रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. शैलेश मोहिते यांनी वैद्यकीय संशोधन करून त्या मृतदेहाची ओळख पटवली होती. त्यांचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला होता. न्यायवैद्यक शास्त्राच्या मदतीने आजपर्यंत मोठमोठ्या घटनांमध्ये पोलिसांना पुरावे शोधून देण्याचे काम केले आहे.
मानवी हाडे आणि दात सर्वसामान्य वातावरणात तीन वर्षापर्यंत राहू शकतात. त्यावर ओलसरपणा, हवेच्या आर्द्रतेचा परिणाम होत असतो. शरीरातील मोठे हाड म्हणजे मांडीचे हाड असेल तर शोध घेणे सोपे होते. जर कवटी मिळाली तर दाताच्या आधारावरसुद्धा त्या व्यक्तीचे वय शोधणे सोपे जाते. हाडाच्या आधारावर न्यायवैद्यक शास्त्रातील विविध निकषांवर त्या हाडांचे वर्गीकरण केले जाते. प्रयोगशाळेतील परीक्षण महत्त्वाचे असते.
- डॉ. राजेश ढेरे, न्यायवैद्यक शास्त्र विभाग प्रमुख, सायन हॉस्पिटल.
असा होतो उलगडा... -
डॉ. महिते यांनी लोकमतला सांगितले, हाडाच्या आधारावर ओळख पटविणे ही शास्त्रीय पद्धत आहे. यासाठी शरीररचना शास्त्र विभागातील तज्ज्ञ व न्यायवैद्यक प्रयोगशाळेची मदत घेतली जाते.
पोलिस ज्यावेळी एखादा हाडाचा तुकडा आणतात. त्यावेळी डोळ्यांनी सहज पाहून पॅथॉलॉजिस्टच्या मदतीने हिस्टोपॅथॉलॉजी चाचणी करतो.
सर्वप्रथम ते हाड मानवाचे आहे की प्राण्याचे हे शोधून काढतो. ते मानवाचे आहे, हे निश्चित झाल्यानंतर त्याच्यातील डी. एन. ए. काढण्यासाठी ते न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविले जाते.
त्यानंतर प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर त्या चाचणीचा आणि त्या मृत व्यक्तीचे नातेवाईक म्हणजे आईवडील, सख्खे भाऊ-बहीण यांचे रक्ताचे नमुने घेऊन डीएनए जुळतात की नाही ते पाहिले जाते.
डीएनए जुळले तर ती व्यक्ती त्यांचीच आहे हे सिद्ध होते. त्या हाडाच्या आधारे, त्या व्यक्तीचे वय, लिंग, तसेच ते हाड कधी पुरण्यात आले आहे.
तो हाडाचा तुकडा जिवंतपणीच आहे की मृत्यूनंतरचा आहे, या अशा विविध गोष्टी न्यायवैद्यक शास्त्राच्या आधारावर उलगडा करणे शक्य आहे. हाडाचा तुकडा मिळाल्यानंतर १० दिवसांत त्याचा शोध करून मिळू शकतो.