अरे अजित!.. शिवाजी पार्क रो रहा है
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 06:26 AM2018-08-20T06:26:31+5:302018-08-20T06:26:50+5:30
मराठी भूमी आणि मुंबापुरीतील शिवाजी पार्कवर निस्सीम प्रेम असणाऱ्या यमकेला अजितसरांना पाहून अक्षरश: गहिवरले.
इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर यमके खूप आनंदात होता. महागुरू नारदांनी त्याला इंद्रदरबाराला जाऊ असे सांगून चक्क स्वर्गलोकी आणले होते. स्वर्गलोकाचे दर्शन मिळत असल्याच्या संधीमुळे त्याला तसे वाटत होते. दुधात साखर पडावी तशी त्याच्या आनंदात भर पडणारी घटना त्याला अनुभवायला मिळत होती. अटलजींच्या जाण्याने भारतभूमी अश्रू ढाळत असताना स्वर्गलोकी मात्र त्यांच्या स्वागताची जंगी तयारी चालल्याचे तो अनुभवत होता. गोळवलकर गुरुजी, शामाप्रसाद मुखर्र्जींपासून अगदी प्रमोदजी, गोपीनाथराव, वहाडणेंसह फरांदे सरांपर्यंतची सर्व मंडळी स्वागतासाठी विशेष शामियान्यात दाखल झाली होती. नारदांचे बोट धरून आलेला यमके आणखी कोण कोण आलंय याचा अंदाज घेत असतानाच अटलजींचे तिथे आगमन झाले. शामियान्यातील आपल्या आसनावर ते विसावतायत तोवरच डुलत डुलत अजित वाडेकरचेही तेथे आगमन झाले. मराठी भूमी आणि मुंबापुरीतील शिवाजी पार्कवर निस्सीम प्रेम असणाऱ्या यमकेला अजितसरांना पाहून अक्षरश: गहिवरले. नारदांचे बोट सोडून तो त्यांच्याकडे धावण्याच्या प्रयत्नात असतानाच नारदांनी यमकेला थांबविले.
नारद : अरे अगोदर अटलजींना भेट आणि मग त्या भल्या माणसाला भेट...
यमके : गुरुदेव, अटलजी तर भारतभूमीच्या हृदयात दडलेले आहेत. पण अजितसरांचे स्थान हृदयाच्या एका वेगळ्या कप्प्यात आम्ही जतन करतो. द्वारकानाथ संझगिरी म्हणतात तसे बॅटिंगला पीचपर्यंत पोहोचतानाच्या आळसावलेल्या त्याच्या एंट्रीवर आम्ही सदैव प्रेम केले आहे.
नारद : त्या सज्जन माणसावर दिव्यांग क्रिकेटपटूपासून प्रत्येक क्रिकेटप्रेमी जीवापाड प्रेम करतो, हे आम्हास ठाऊक आहे.
यमके : आजचे क्रिकेट आणि पैसा तुम्हाला माहीत आहेच. पण हेल्मेटही न मिळण्याच्या काळात रॉबर्टस्, गार्नर तोफखाना गोलंदाजांच्या समोर खंबीरपणाने उभे राहण्याची हिंमत देणारा हा दिलदार कर्णधार आहे. जगावर राज्य करणाºया भारतीय क्रिकेटचा पाया वेस्ट इंडिज आणि गोºयांच्या देशात पहिल्यांदा विजय मिळवून त्याने रचला, हे आम्ही कसे विसरू ?
नारद : मला तू बोलतोस ते सर्व मान्य आहे. पण आधी अटलजींना भेट आणि नंतर अजितना भेट.
यमके : गुरुदेव आपण अजितसरांना भेटू आणि त्यांना घेऊनच अटलजींच्या दर्शनाला जाऊ. (शिष्याचा आग्रही मूड पाहून नारदांनीही यमकेच्या म्हणण्याला दुजोरा दिला. ते दोघे अजितसरांना भेटले आणि त्यांच्यासोबत अटलजींकडे येण्याची गळ त्यांना घातली. अजित वाडेकरांनी स्वभावाप्रमाणे ती मान्य केली आणि तिघेही अटलजींच्या पुढ्यात जाऊन उभे ठाकले.)
यमके आणि अजितसरांनी अटलजींचे चरण स्पर्श केले...
अटलजी : अरे अजित... तुम बिना बताये इधर निकल आये... उधर शिवाजी पार्क अभीभी रो रहा है. (हे वाक्य ऐकून अजित सद्गदित झाले.)
अजित : अटलजी, माझे सोडा ! तुम्ही मात्र तिथे थांबायलाच पाहिजे होते. सामाजिक समरसता आणि सर्वधर्मसमभाव हा पुन्हा एकदा भारतभूमीला आणि तुमच्या ‘परिवारा’ला समजून सांगणारा माणूसच तिथे उरला नाही... (यमकेसह नारदही अडवाणी, राहुल यांच्यासारखा चेहरा करून अजितसरांकडे पहातच राहिले.)
- राजा माने