माणसा माणसा माणूस हो !
By किरण अग्रवाल | Published: January 30, 2020 08:29 AM2020-01-30T08:29:30+5:302020-01-30T08:30:56+5:30
प्रत्येकच जण आपापल्या व्यापात वा कामात असा काही गुरफटला आहे की, इतरांसाठी द्यायला कुणाकडे वेळच नाही. यातून ओढवणारे एकटेपण, एकारलेपण ही खरी समस्या आहे. त्यात होणारी वाढ ही चिंतेचीच बाब ठरली आहे.
- किरण अग्रवाल
साधनांची उपलब्धता ही समाधानाकडे नेणारी असते हे खरेच; पण तेवढ्याने व्यक्ती निश्चिंत होते असे नाही. साधन, सुविधा, संपत्तीचे ऐश्वर्य असूनही कसली ना कसली चिंता भेडसावणारी, चिंतामग्न असणारी माणसे कमी नाहीत. जे जे म्हणून साध्य करायचे असते, ते सारे साधूनही चिंतामुक्ती काही होत नाही; कारण साधनाखेरीजची सुहृदयता असणारी व्यवस्था दिवसेंदिवस क्षीण होत आहे. प्रत्येकच जण आपापल्या व्यापात वा कामात असा काही गुरफटला आहे की, इतरांसाठी द्यायला कुणाकडे वेळच नाही. यातून ओढवणारे एकटेपण, एकारलेपण ही खरी समस्या आहे. त्यात होणारी वाढ ही चिंतेचीच बाब ठरली आहे.
समाजात वाढत्या विभक्त कुटुंब पद्धतीने अनेक समस्यांना जन्म दिल्याचे म्हणता यावे. संयुक्त कुटुंबात सुख-दु:खाचे वाटेकरी लाभत असल्याने व विशेषत: अडीअडचणीच्या काळात सहयोगी लाभून समस्यांचे निराकरण होणे तुलनेने सुलभ ठरत असल्याने जबाबदारीचे दडपण येत नाही. पण, विभक्तावस्था वाढल्याने ती ताण-तणावास निमंत्रण देणारी ठरत आहे. त्यातून एकटेपणा वाढीस लागतो, जो विविध समस्यांना निमंत्रण देणारा ठरतो. अमेरिकेतील सिग्मा या विमा एजन्सीने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार अमेरिकेतील ६१ टक्के लोक एकटेपणाच्या समस्येने ग्रासले आहेत. ही एकटेपणाची व त्यातून आकारास येणारी नैराश्याची भावना ही तेथील समाजशास्रींसाठी चिंतेची बाब ठरली आहे. ही चिंता यासाठी की, विशेषत: उतार वयात आधार हरविलेल्या ज्येष्ठांना एकटेपणा अधिक बोचतो, असे सर्वसाधारणपणे समजले जाते. ते खरेही आहे. पण त्याचसोबत १८ ते २२ या वयोगटातील तरुणांमध्येही एकटेपणा वाढतो आहे, असे या सर्वेक्षणात आढळून आले; म्हणून याकडे गांभीर्याने लक्ष पुरविले जाण्याची गरज समोर येऊन गेली आहे. ज्या पिढीने काहीतरी करून दाखविण्याची धमक बाळगावी, गुलाबी स्वप्ने रंगवत आयुष्याकडे पहावे; तीच पिढी एकटेपणा अनुभवताना आढळणार असेल व त्यातून ओढवणारे समस्यांचे ओझे वाहत तणावग्रस्त राहणार असेल तर कुटुंबातील असो, की समाजातील; निकोपता-सुदृढता कशी वाढीस लागावी, हा यातील खरा प्रश्न आहे.
हल्लीची तरुणपिढी सोशल माध्यमांच्या आहारी गेल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होते, हातातल्या मोबाइलमध्ये सदोदित गुंतून राहणारे तरुण याद्वारे मित्रांशी ‘कनेक्ट’ होतात; पण यातले ‘कम्युनिकेशन’ त्यांच्यातल्या एकटेपणाची भावना दूर करण्यास उपयोगी पडत नाही. गर्दीत राहूनही गर्दीपासून दूर राहण्यासारखा हा प्रकार आहे. फेसबुक-व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आदी सोशल माध्यमांवर तरुण व्यक्त होतो खरा; पण ती अभिव्यक्ती त्याच्या एकटेपणातून आकारास आलेली असते, असेच यासंबंधी म्हणता यावे. कारण, कुटुंबातच ज्याच्या खांद्यावर डोके ठेवून रडण्याची अगर हातात हात घेऊन हसण्या-खेळण्याची व्यवस्था असेल, ती व्यक्ती समाजमाध्यमांच्या चावडीवर जाऊन आपल्या वैयक्तिक, खासगी स्वरूपाच्या भावभावनांचे प्रदर्शन मांडेल कशाला? पण हल्ली त्याचे प्रमाणही वाढलेले दिसते आहे. अमेरिकेतील सर्वेक्षणात एकटेपणा अनुभवणाऱ्यांमध्ये या सोशल माध्यमात सक्रिय राहणाऱ्यांची संख्या मोठी आढळून आली आहे, ती त्यामुळेच. कारण कुटुंब, त्यातील लहानथोर मंडळी, नात्यातील भावबंध हे सारे आज उरले कुठे आहे? अमेरिकेत तर त्याची खूपच वानवा आहे. पण आपलीही वाटचाल त्याच दिशेने होते आहे, हे दुर्लक्षिता येऊ नये.
महत्त्वाचे म्हणजे, नोकरी-व्यवसायामुळे असेल किंवा अन्य कारणांमुळे कुटुंबापासून दूर राहात असलेल्यांमध्ये जसा एकटेपणा वाढीस लागलेला दिसून येतो, तसाच त्यांचा सामाजिक सहभागही कमी आढळून येतो. म्हणायला मोबाइलमुळे माणूस सोशल झाला खरा; पण तो समाजापासून अलिप्तच झाल्याचे म्हणता यावे. संक्रांत असो, की विजयादशमी; तिळगूळ व आपट्याचे सोने व्हॉट्सअॅपवरच पाठविण्याची सोय झाली म्हटल्यावर गावातल्या गावात किंवा गल्लीतही कुणी प्रत्यक्ष भेटीस जाताना दिसत नाही. अशा भेटींमधून गहिरे होणारे नात्यांमधले, मित्रत्वातले भावबंध आता खुंटत चालले आहेत. पूर्वी आजी-आजोबा, काका-मामांकडे जाण्यासाठी शाळांना सुट्या लागण्याची वाट बघितली जायची. आता सुट्यांमध्ये घराबाहेरचे ‘आउटिंग’ वाढले आहे. परिणामी तरुणांसोबतच लहान मुलांमध्येही एकटेपण-एकारलेपण वाढताना दिसत आहे. ही समस्या तणाव वाढविणारी तर आहेच, सामाजिक व कौटुंबिक पातळीवर समस्यांना निमंत्रण देणारीही आहे. तेव्हा, माणसा-माणसांतली माणुसकी जागवून संवेदनांचा पाझर प्रभावी होणे हाच यावरील उपाय ठरावा. अमेरिकेतील सर्वेक्षणामुळे याकडे लक्ष वेधले जाणे स्वाभाविक ठरले असून, या एकटेपणापासूनच्या मुक्तीचे मार्ग शोधले जाणे त्यामुळेच गरजेचे ठरले आहे.