खिदमतगार!

By Admin | Published: December 29, 2015 02:39 AM2015-12-29T02:39:26+5:302015-12-29T02:39:26+5:30

हुजरेगिरी करणारे खुशमस्करे समाजात सर्वत्र असतात. सत्तेच्या अवतीभवती ते दाटीवाटीने आढळतात. त्यांना कुठलेही क्षेत्र वर्ज्य नसते. साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रात ते जसे दिसतात

Hi! | खिदमतगार!

खिदमतगार!

Next

- गजानन जानभोर

हुजरेगिरी करणारे खुशमस्करे समाजात सर्वत्र असतात. सत्तेच्या अवतीभवती ते दाटीवाटीने आढळतात. त्यांना कुठलेही क्षेत्र वर्ज्य नसते. साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रात ते जसे दिसतात तसाच त्यांचा माध्यमातही मुक्तसंचार असतो. राजकारणात तर त्यांचे वारुळ असते. चापलुसीच्या मार्गाने आपला मतलब साध्य करणे हीच त्यांच्या आयुष्याची इतिकर्तव्यता असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा नागपुरातील राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात या चाटुगारांचे कान टोचले हे एका अर्थाने चांगलेच झाले. ‘साहित्यिकांनी राजसत्तेचे कधीही खिदमतगार होऊ नये, ज्या दिवशी साहित्यिक सत्तेची खिदमत करतील, त्या दिवशी साहित्य संपून जाईल’, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांच्या या विधानामागे कुठलीतरी पार्श्वभूमी असावी. पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांना आलेले असे काही तऱ्हेवाईक अनुभव बहुधा त्यांच्याही वाट्याला आले असावेत. मुख्यमंत्री सभ्य आणि सुसंस्कृत आहेत. आपली ‘एकनाथी’ व्याधीही स्मितहास्यातून व्यक्त करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे असेल कदाचित, त्यांनी ‘हुजरेगिरी, खुशमस्करी’ असे कठोर शब्द न वापरता ‘खिदमत’ या आतिथ्यशील शब्दाचा वापर केला. साहित्यिक मात्र ‘खिदमत’ या शब्दाचा अर्थ आपापल्या कुवती आणि मतलबानुसार लावत आहेत. खरे तर या शब्दाचा अन्वयार्थ शब्दकोशातच लावायला हवा. पण तसे न करता ते आपल्या सग्यासोयऱ्यांच्या खिदमती वर्तनात तो शोधत आहेत.
‘खिदमत’ (मुख्यमंत्र्यांनी ध्वनीत केलेला अर्थ) अर्थात खुशमस्करी, चाटुगिरी हे शब्द आता मराठी साहित्यिकांच्या वर्तुळात परवलीचे मानले जातात. काही साहित्यिकांच्या पोटापाण्याची ती सोय आहे. पुरस्कार मिळविण्यासाठी साहित्य सेवेपेक्षा सत्ताधाऱ्यांची चापलुसी म्हणजेच खिदमत करण्याकडे यातील काहींची चढाओढ असते. या खिदमतीच्या वळणवाटा थेट साहित्य अकादमीपर्यंत जाऊन पोहोचतात. यावर्षी महाराष्ट्र सरकारच्या साहित्य-संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी निवड झालेल्या सदस्यांपैकी काहीजण पूर्णवेळ खिदमतगार आहेत. त्यांचा साहित्याशी संबंध शालेय अभ्यासक्रमातील धडे गिरवताना आला तेवढाच मर्यादित. भाजपा-संघ परिवाराची वर्षानुवर्षांपासून ते इमाने-इतबारे खिदमत करीत आहेत, हीच त्यांची गुणवत्ता आणि पात्रताही. काँग्रेसच्या काळातही असे खिदमती साहित्यिक होते. परंतु अशा नियुक्त्या करताना साहित्यमूल्य हा किमान निकष तरी असायचा. पूर्वी साहित्य संमेलनात सारे राजकारणी श्रोत्यांमध्ये बसायचे. पण आता ते संमेलनांच्या व्यासपीठावर, विशेष आसनावर दिसतात. त्यांनी स्वागताध्यक्षपद स्वीकारुन संमेलनाचा आर्थिक भार उचलावा यासाठी हे खिदमतगार त्यांच्यासमोर लाचारासारखे हात जोडून उभे असतात. विश्व साहित्य संंमेलनाच्या विमान प्रवासाचे अनुदान मिळविण्यासाठी साहित्य महामंडळाने सरकारपुढे घातलेले लोटांगण मग त्यातलाच एक घृणास्पद भाग ठरतो. काही राजकारणी साहित्यिकांकडून स्वत:चे चरित्र लिहून घेतात. पीएच.डी. लिहून देणे हे तर काहींच्या उदरनिर्वाहाचे साधन झाले आहे. ज्या नेत्यांच्या शिक्षण संस्था आहेत, त्यातील प्राध्यापक साहित्यिकांच्या खिदमतीला बारोमास पीक आलेले असते.
असहिष्णुतेच्या निषेधार्थ पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांची निंदानालस्ती करणे हाही काहींच्या सरकारी खिदमतीचा अलीकडचा उद्योग. ‘मी पुरस्कार परत करणार नाही’ असे ते उगाच जाहीरपणे पीळ देऊन ओरडून सांगतात, तेव्हा त्या खिदमतीचे अर्थ भविष्यातील सरकारी नियुक्त्यांमध्ये दडलेले असतात. मराठी सारस्वतात खिदमतगारांचा पंथ पूर्वीही होता, पण आता त्याच्या झुंडी झाल्या आहेत. त्या एकदा संघटित झाल्या की अधिक आक्रस्ताळ्या होतात. सरकारी पुरस्कार आणि सरकारी समित्या, मंडळांवरील नियुक्त्यांमुळे त्यांना चिथावणी मिळत असते. मराठी साहित्य सृष्टीला खरा धोका या टोळीबाज खिदमतगारांकडून आहे. मुख्यमंत्र्यांनाही कदाचित तेच सांगायचे असावे!

 

Web Title: Hi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.