सबसे उँची प्रेमसगाई
By admin | Published: June 9, 2016 05:00 AM2016-06-09T05:00:38+5:302016-06-09T05:00:38+5:30
ज्ञान आणि प्रेम अधोरेखित करण्यासाठी भक्तिमय वर्षाव करणारा उत्सव म्हणजेच ज्ञानोत्सव
ज्ञानातून बोध अंकुरायला हवा, बोधातून आनंद उमलायला हवा, आनंदातून उत्सव जन्मायला हवा आणि उत्सवातून परमोच्च आनंद प्रस्फोटित व्हायला हवा, या उन्नत हेतूने पिंपरी-चिंचवडमधील चिरंजीव पीठ कार्यरत आहे. ज्ञानयुक्तआणि देवभोळे असे दोन प्रकारचे संप्रदाय आपल्याकडे दिसून येतात. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या ‘शब्दें वाटूं धन जनलोंका..’ या न्यायाने अक्षर संचित, प्रकाशित साहित्याचे लोकार्पण करणे आणि विचारमंथनातून डोळस अध्यात्म लोकांसमोर मांडण्यासाठीचा प्रयत्न गेली तीन वर्षे सातत्याने होत आहे. ज्ञान आणि प्रेम अधोरेखित करण्यासाठी भक्तिमय वर्षाव करणारा उत्सव म्हणजेच ज्ञानोत्सव. हा उत्सव पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या सांस्कृतिक चळवळीचा मानबिंदू ठरू लागला आहे. गाणं हे आनंदासाठी आणि आनंदाने शिकण्यासाठी असते. आनंदरहित अवस्थेत संगीतातील रागही तना-मनाला स्पर्श करीत नाहीत, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. कलाधर्म आणि सत्कर्माप्रति रुची वाढविणे, कला आणि कलाकार मोठे करणे अर्थात माणुसपण मोठे करण्याच्या भावभूमिकेतून काम करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजेच चिरंजीव पीठाचे प्रमुख आणि लेखक, कवी, संगीतकार, विचारवंत, संशोधक, गायक पंडित राजू सवार होत.
लौकिकार्थाने सगाई म्हणजेच विवाह असा अर्थ रूढ आहे, परंतु ज्ञानाकडून-प्रेमाकडे नेणारा ‘प्रेमभावाचा नवा सेतू’ पंडितजींनी निर्माण केला आहे; अर्थातच प्रेमसगाई असे त्याचे नाव आहे. ज्ञान-प्रेम-भक्तिपूर्ण आणि अपूर्व अशी ‘सबसे उँची प्रेमसगाई’ होय. चिरंजीव पीठाचे कार्य ज्ञानधर्म वाढविणारे आहे. या ज्ञानोत्सवात आजवर जिनशासनसौरभ डॉ. मंजूश्रीजीमहाराज, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, कविवर्य प्रवीण दवणे, संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. र. ना. शुक्ल, शिक्षणतज्ज्ञ वसंत नुलकर यांनी आपल्या अनुभवविश्वाचे दर्शन घडविले आहे. सामाजिक जाणिवा समृद्ध करून सर्जनशील समाजाच्या निर्मितीसाठी एखादा दीपस्तंभ असणारी ही माणसं होत. या वर्षीच्या उत्सवात शिवशाहिरांसह ज्येष्ठ संशोधक डॉ. हिंमतराव बावस्कर, प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी, ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे, व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे अमूल्य विचार रसिकांंना ऐकण्यास मिळाले. त्यातून समाजमनाच्या संवेदनांचा, सुख-दु:खाचा अचूक वेध घेण्यात आला. त्यांनी दिलेले ज्ञानयुक्त प्रेम हे जीवन समृद्ध करणारे आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, गिरीश कुलकर्णी, अरुणा ढेरे यांनी कर्मरूपी विठ्ठलाचे सगुण साकार रूपाचे दर्शन घडविले. ज्याचा त्याचा विठ्ठल वेगळाच असतो, असा भाव वक्त्यांनी दृढ केला, तर डॉ. बावस्करांनी माणसांचे जगणे, त्यांची दु:खे, संवेदनांचा कल्लोळ कसा असतो, याचे दर्शन घडवित श्रोत्यांना अंतर्मुख करून सोडले. ‘माणसाने आयुष्य असे जगावे की मृत्यूलाही दु:ख होऊ नये,’ अशी जीवननिष्ठा त्यांच्या मनोगतातून व्यक्त झाली. तर ‘चांगल्या-वाईटाचा जमा-खर्च मांडत राहा, सुखा-समाधानाने जगा,’ असा संदेशही तेंडुलकर यांनी दिला.
ज्ञानोत्सवाचा कळसाध्याय पंडितजींच्या ‘सबसे उँची प्रेमसगाई’ने गाठला. त्यातून स्वर्गीय श्रवणसुखाची अनुभूती मिळाली. संतांच्या विविध भजनांना शास्त्रीय संगीताचा बाज, त्या रचनांमधील भक्ती आणि प्रेमभावाचे रहस्य उलगडत ज्ञानाकडून- प्रेमाकडे नेणारी ही मैफल अविस्मरणीय ठरली. कलावंत आणि रसिक एकरूप झाला, की परमोच्च आत्मानंदाची अनुभूती मिळते, याची प्रचिती आली. ज्ञानोत्सवाच्या रूपाने आत्मसुखाचा वर्षाव झाला. हा ज्ञानयज्ञ पूर्णत्वास नेण्यासाठी ‘आनंदे भरीन तिन्ही लोक’ या समर्पित भावनेतून चिरंजीव पीठाचे किशोर धूत, राजीव जोगळेकर, रमेश जोशी, सर्वोत्तम जोशी हे कार्यरत आहेत. ज्ञानोत्सवाची ही अनोखी, अनुपम आनंदयात्रा अखंडपणे सुरू राहावी, असा भाव रसिकजनांच्या मनातून व्यक्त होत असतो. अज्ञानाकडून- ज्ञानाकडे, ज्ञानाकडून-प्रेमाकडे नेणाऱ्या या उत्सवातील ‘प्रेमभावाची अवीट गोडी’ चिरस्मरणात राहणारी आहे.
>ज्ञान आणि प्रेम अधोरेखित करण्यासाठी भक्तिमय वर्षाव करणारा उत्सव म्हणजेच ज्ञानोत्सव. हा उत्सव पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या सांस्कृतिक चळवळीचा मानबिंदू ठरू लागला आहे.
- विजय बाविस्कर