आत्मविश्वासाचा राजमार्ग

By admin | Published: January 18, 2015 12:31 AM2015-01-18T00:31:56+5:302015-01-18T00:31:56+5:30

शालेय-महाविद्यालयीन जीवनात सर्वाधिक गरज भासते ती म्हणजे आत्मविश्वास आणि एकाग्रतेची.

Highway of confidence | आत्मविश्वासाचा राजमार्ग

आत्मविश्वासाचा राजमार्ग

Next

योग विषय अनुभवजन्य असल्याने लहान मुलांना तो अनुभव जरुर द्या. मुलांच्या निमित्ताने त्यांच्या पालकांनीही योग हे प्रकरण नेमके आहे तरी काय? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर कदाचित आत्तापर्यंत ओळख न झालेला एक असा विषय समजेल, ज्यामुळे आयुष्याला वेगळी कलाटणी मिळेल. नावीन्याचा ज्यांना शोध आहे, अनुभव घेण्याची ज्यांना इच्छा आहे, अशा प्रयोगशील पालकांनीही योग विषयाचा अनुभव जरूर घ्यावा. आनंदाने जगण्याचा एक प्रशस्त मार्ग यातून निश्चितपणे मिळेल, याची खात्री बाळगा. पालक आणि पाल्य यांच्यातील संवादालाही यातून बळ मिळेल, संवाद अधिक सशक्त होईल.
शालेय-महाविद्यालयीन जीवनात सर्वाधिक गरज भासते ती म्हणजे आत्मविश्वास आणि एकाग्रतेची. एकावेळी अनेक विषयांचा अभ्यास, शाळा-क्लासेस, खेळ, मित्र-मैत्रिणी, सहली, परीक्षा, सुट्ट्या, पुन्हा परीक्षा हे चक्र सुरूच असते. हे करीत असताना प्रत्येक ठिकाणी स्पर्धा ही ओघानेच आली. आत्मविश्वास कुठल्याही स्थितीत ढळू न देता एकाग्रतेने सगळ्या परीक्षांना सामोरे जाऊन त्यात यश मिळविणे हे शालेय-महाविद्यालयीन आयुष्यातील आव्हान असते. त्यामुळे या काळात निर्माण होणाऱ्या ताणाचेही नियोजन व्यवस्थित व्हायला हवे. किंबहुना ताण निर्माण न होता, कशा पद्धतीने सकस असे यश मिळवता येईल, यावर सध्या मोठे संशोधन सुरू आहे.
योग विषयक अभ्यासामुळे ताणतणावांना दूर सारून निर्भेळ असे यश मिळवता येणे शक्य असल्यावर जगभरातील आरोग्य आणि शालेय शिक्षणात काम करणाऱ्या तज्ज्ञांचे एकमत होत आहे. स्वत:च्या अंगी मूलभूत क्षमता असतानादेखील केवळ आत्मविश्वासाची कमतरता असल्याने विद्यार्थी एखादी गोष्ट करण्यासाठी धजावतात. शाळा अथवा महाविद्यालयातील विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी आवाहन केले जाते. तेव्हा क्षमता असूनही काही विद्यार्थी मागे राहतात. मात्र त्या वेळी पाल्यांशी पालकांचा संवाद अत्यंत आवश्यक आहे. या संवादातूनच पाल्यांमध्ये आत्मविश्वासाची पातळी कमी असल्याचे त्यांच्या लक्षात येऊ शकते. बहुतांशवेळा ही बाब त्या-त्या मुलांना लक्षात येण्याची शक्यता फारच कमी आहे. पहिले पालक आणि दुसरे शिक्षक यांना ही बाब लक्षात यायलाच हवी. अन्यथा अनेक छोटी रोपटी मोठे वृक्ष कधी बनूच शकणार नाहीत. लहानपणापासून योगविषयक आवड निर्माण झाली तर स्वत:तील जाणिवांचा विकास होतो. त्यामुळे साधारण नववी-दहावीतील विद्यार्थ्यांनादेखील आपण आत्मविश्वास आणि एकाग्रतेत कोठे कमी पडतो, हे समजणे शक्य आहे. योगाच्या अभ्यासातून या प्रश्नांवर हे विद्यार्थीदेखील स्वत: मार्ग काढू शकतात. तेवढ्या जाणिवा विकासनासाठी मात्र त्यांना योगाची आवड निर्माण करून त्यात गती निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे.

आयुष्यातील पाया म्हणजे शालेय जीवन. ही पायाभरणी संपूर्ण आयुष्यात पदोपदी तुम्हाला मार्ग दाखवत असते. आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या कार्यशाळांना मिळणारा प्रतिसाद आणि त्यात सहभागी होणाऱ्यांचे वय तपासले तरी ही बाब सहज लक्षात येतील. वय १२-१३ ते वय वर्षे ६५-७०पर्यंतच्या व्यक्तीही आत्मविश्वास कार्यशाळांमध्ये सहभागी होतात, आत्मविश्वास वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. चढउतार हे आयुष्यात असतातच. यश जसे आयुष्याचा भाग आहे तसेच अपयशदेखील येते. पण यशात हुरळून न जाता आणि अपयशात खचून न जाता पुढे जात राहणे अत्यावश्यक आहे. ‘योग’ शिक्षणातून यश आणि अपयश या दोन्ही विषयांकडे समदृष्टीने पाहण्याची क्षमता विकसित होते. शालेय जीवनात हे बाळकडू मिळल्यास अधिक क्षमतेने दोन्ही स्थितींमध्ये मार्गक्रमण सुरू राहते.

Web Title: Highway of confidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.