हिलरींचा वादविजय

By Admin | Published: September 28, 2016 05:13 AM2016-09-28T05:13:27+5:302016-09-28T05:13:27+5:30

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील दोन प्रमुख पक्षांच्या उमेदवारांत होणारा वादविवाद अतिशय महत्त्वाचा व बहुदा निर्णायक ठरणारा असतो. डेमोक्रॅट हिलरी क्लिंटन

Hillary controversy | हिलरींचा वादविजय

हिलरींचा वादविजय

googlenewsNext

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील दोन प्रमुख पक्षांच्या उमेदवारांत होणारा वादविवाद अतिशय महत्त्वाचा व बहुदा निर्णायक ठरणारा असतो. डेमोक्रॅट हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सोमवारी झालेला पहिला वादविवाद असाच महत्त्वाचा व निर्णायकतेच्या दिशेने जाणारा आहे. परवापर्यंत झालेल्या लोकमताच्या सर्वेक्षणात दोन्ही उमेदवार बरोबरीने चालत असल्याचे व क्लिंटन यांना ट्रम्प यांच्या केवळ तीन टक्के लोकांची अधिकची पसंती असल्याचे नोंदविले गेले होते. त्यांच्यातील आताच्या पहिल्या वादविवादाने (त्यांच्यात आणखी दोन वादविवाद व्हायचे आहेत) हिलरींच्या उमेदवारीला जास्तीचे बळ मिळवून दिले आहे. आजवर झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत पहिला वादविवाद जिंकणारा उमेदवारच अखेरपर्यंत पहिल्या क्रमांकावर राहिला असल्याचे दिसले आहे. केनेडी विरुद्ध निक्सन, जॉन्सन-गोल्ड वॉटर, बराक ओबामा-रोम्नी आदि वादविवादांची परिणती अशीच झालेली जगाने पाहिली आहे. हिलरी-ट्रम्प यांच्यातील सोमवारचा वादविवाद अमेरिकेची अर्थव्यवस्था, अंतर्गत सुरक्षा व देशातील वर्णविद्वेषाच्या प्रश्नांवर केंद्रीत होता. या प्रश्नांवरील दोन्ही उमेदवारांच्या भूमिका देशाला ज्ञात होत्या. मात्र समोरासमोर उभे राहून आपलीच भूमिका योग्य असल्याचे सांगण्याची संधी या वादविवादाने त्यांना दिली. झालेच तर हा जगातला सर्वात मोठा व किमान दहा कोटी लोकांसमक्ष दूरचित्रवाहिन्यांवर झालेला वादविवाद होता. त्याच्या आरंभी ट्रम्प हे त्यांच्या आरोपखोरीच्या व अभिनिवेशाच्या बळावर बाजी मारतील असे प्रेक्षकांना व श्रोत्यांना वाटले होते. पण त्यांचा आवेश पहिल्या वीस मिनिटांत ओसरला. त्यांची माहिती अपुरीच नव्हे तर चुकीची असल्याचे व त्यांचे नेतृत्व कृतीशील असण्याहून प्रचारकीच अधिक असल्याचे स्पष्ट होत गेले. त्यांनी हिलरींवर केलेल्या आरोपांचे हिलरींनी कमालीच्या शांतपणे व हंसतमुखाने खंडन तर केलेच पण ट्रम्प यांना त्यांच्या अनेक भूमिका त्यांनी गिळायलाही लावल्या. कृष्णवर्णीय अमेरिकनांवर ट्रम्प यांचा असलेला रोष, मुसलमान अमेरिकनांविषयीचा त्यांचा विद्वेष, मेक्सिकन कामगारांविषयी त्यांना वाटणारी घृणा आणि त्यांच्या भूमिकेत आरंभापासूनच दिसलेला स्त्रियांविषयीचा तुच्छ भाव हिलरींनी अनेक उदाहरणे देत उघड केला आणि ट्रम्प यांना निरुत्तर केले. ट्रम्प यांनी त्यांच्यावर केलेला शारीरिक दुबळेपणाचा आरोप फेटाळून लावताना हिलरींनी त्यांच्या चार वर्षांच्या परराष्ट्र मंत्रिपदाच्या कारकीर्दीत ११२ देशांना दिलेल्या भेटी, त्यात केलेले करार व समझोते, नव्या व्यवस्थांना दिलेली चालना आणि प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन सैनिकांसोबत घालविलेला वेळ यांची उदाहरणे सांगून आपले शारीरिक बळ शाबूतच नव्हे तर चांगले भक्कम असल्याचे टाळ््यांच्या गजरात सांगितले. अखेरच्या क्षणी ‘तुम्ही स्त्रियांची तुलना डुकरांशी आणि कुत्र्यांशी केली’ हे सांगून त्यांनी ट्रम्प यांचा सारा अभिनिवेशच मोडून काढला. सुरुवातीलाही ट्रम्प यांनी किमान दोन वेळा कर चोरी केली असल्याचे सप्रमाण सांगून ‘कर चुकविणारा इसम देशाला अध्यक्ष म्हणून चालणार आहे काय’ असा प्रश्न श्रोत्यांनाच विचारला. साऱ्या वादविवादात ट्रम्प दर पाच-दहा मिनिटांनी पाण्याचे घोट घेताना आणि प्रमुख प्रश्नांवर भर न देता तपशीलांवर बोलण्यात अडकताना दिसले. हिलरी साऱ्या तयारीनिशी व अभ्यासानिशी वादविवादात उतरल्या होत्या. अमेरिकेच्या पहिल्या महिला नागरिक, आठ वर्षे सिनेटच्या सदस्य आणि चार वर्षे अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री राहिलेल्या हिलरींचा राजकीय अनुभव, दृष्टी आणि आवाका त्यांच्या प्रत्येक शब्दातून स्पष्ट होत होता. उलट ट्रम्प हे वादविवाद जिंकण्याच्या ईर्ष्येने आलेल्या उत्साही माणसासारखे सारा काळ दिसत होते. अमेरिकेला पुन्हा एकवार पूर्वीचा दर्जा प्राप्त करून देण्याची, मित्रदेशांकडून त्यांना दिलेल्या मदतीचा मोबदला वसूल करण्याची, मुसलमानांना देशात प्रवेश न देण्याची व मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याची त्यांची दुराग्रही भूमिका या वादविवादात हिलरींच्या अभ्यासपूर्ण प्रतिपादनामुळे पार उडत गेलेलीच जगाला दिसली. अशा वादविवादांपासून भारतासकट जगातल्या अन्य लोकशाही देशांतील नेत्यांनी शिकावे असे बरेच काही आहे. नेता अभ्यासू असावा, सर्व महत्त्वाच्या विषयांच्या तपशीलावर त्याची पकड असावी आणि देशातील सर्वच सामाजिक वर्गांना त्याने आपले मानावे यासारख्या गोष्टी या पुढाऱ्यांनी हिलरींपासून शिकाव्या अशा आहेत. द्वेष आणि मत्सर या गोष्टी नेत्यांना मोठ्या बनवीत नाहीत, त्या त्यांना कमालीच्या एकांगी व लहान बनवीत असतात. याचा अनुभव साऱ्या जगाने घेतला आहे. राष्ट्रीय नेतृत्व करणाऱ्याला देशाचे सगळेच नागरिक त्याचे वाटावे लागतात. जात, धर्म, वर्ण, वंश यापलीकडे जाऊन त्याला देशाने आपले मानावे लागते. हा या वादविवादाचा धडा जगातले पुढारी जेवढ्या लवकर आत्मसात करतील तेवढ्या लवकर त्यांच्या देशात व जगातही शांतता प्रस्थापित होईल.

Web Title: Hillary controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.