हिलरी विरुद्ध ट्रम्प

By admin | Published: June 18, 2016 05:37 AM2016-06-18T05:37:48+5:302016-06-18T05:37:48+5:30

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची नोव्हेंबरात होणारी निवडणूक डेमॉक्रेटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होईल हे आता स्पष्ट झाले आहे. हिलरींना अखेरच्या

Hillary v Trump | हिलरी विरुद्ध ट्रम्प

हिलरी विरुद्ध ट्रम्प

Next

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची नोव्हेंबरात होणारी निवडणूक डेमॉक्रेटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होईल हे आता स्पष्ट झाले आहे. हिलरींना अखेरच्या क्षणापर्यंत विरोध करणारे त्यांच्या पक्षाचे दुसरे उमेदवार सिनेटर बर्नी सँडर्स यांना हिलरींच्या वॉशिंग्टनमधील प्रायमरीच्या विजयानंतर आपला पराजय दिसला आहे आणि पक्षाच्या एकजुटीसाठी आणि निवडणुकीतील त्याच्या विजयासाठी आपण प्रयत्न करू असे त्यांनी घोषित केले आहे. त्यासाठी वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये हिलरी क्लिंटन यांची भेट घेऊन त्यांनी वाटाघाटीही केल्या आहेत. परिणामी हिलरींचा पूर्वीच मोकळा असलेला उमेदवारीचा मार्ग आता आणखी प्रशस्त झाला आहे. अमेरिकेतील निवडणुका भारतासारख्या सहसा लाटेवर लढविल्या जात नाहीत. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या लोकहिताच्या व अमेरिकेच्या सुरक्षेच्या प्रश्नावरच त्यांचा भर असतो. तथापि, यावेळची निवडणूक वेगळी असेल, कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्या उमेदवारीने तिला धार्मिक, वांशिक आणि नुसते संकुचितच नव्हे, तर स्त्रीविरोधी स्वरूप आणले आहे. अमेरिकेत येऊ इच्छिणार्‍या सरसकट सगळ्या मुस्लिमांवर बंदी घालण्याचा इरादा त्यांनी जाहीर केला आहे. मेक्सिकोमधून अमेरिकेत पोटापाण्यासाठी येणार्‍या आणि तसे येताना तिकडची गुंडगिरी व व्यसने अमेरिकेत आणणार्‍या सार्‍यांना पायबंद घालण्याचा व त्यासाठी अमेरिका आणि मेक्सिको यांच्या सीमेवर एक प्रचंड व अनुल्लंघ्य भिंत बांधण्याचा मुद्दा त्यांनी पुढे केला आहे. अमेरिकेत जन्माला येणार्‍या प्रत्येकच मुलाला व मुलीला अमेरिकेचे नागरिकत्व मिळते. तरीही अमेरिकेत जन्माला येऊन अमेरिकेचे नागरिक झालेल्या व तेथील न्यायाधीशांसारखी सन्माननीय पदे भूषविणार्‍या मूळच्या मेक्सिकनांना त्यांनी परकीय म्हणून अपमानित केले आहे. झालेच तर भारत, पाकिस्तान व अन्य युरोपीय देशांतील तरुणांनी अमेरिकेत येऊन आमच्या मुलांच्या वाट्याला येणार्‍या नोकर्‍या लाटल्या आहेत आणि त्यांना बेकारीच्या खाईत लोटले आहे, असेही ट्रम्प यांचे म्हणणे आहे. अशा सार्‍यांवर निर्बंध लादण्याचा संकल्पही त्यांनी जाहीर केला आहे. परिणामी या निवडणुकीचे स्वरूप साधे राजकीय न राहता धार्मिक व वांशिकही झाले आहे. त्यामुळे ही निवडणूक जेवढी हिरीरीची तेवढीच रंगतदार व काहीशी कुरूपही झाली आहे. ट्रम्प यांनी आपल्याच पक्षातील प्रतिस्पर्धी उमेदवारांना चोर, खोटारडे व लबाड यासारखी शेलकी विशेषणे लावून हैराण केले आहे. 'अध्यक्षीय प्रासादाचा सर्वाधिक गैरवापर करणार्‍या इसमाशी या बाईने लग्न केले' असे सांगून त्यांनी हिलरी यांचीदेखील निर्भर्त्सना केली आहे. अर्थात त्यांच्यावर भुलणार्‍यांचाही एक वर्ग अमेरिकेत आहे. खुद्द ट्रम्प यांच्या पक्षातही त्यांच्या या उद्दाम वर्तनाने कमालीचा संताप व त्यांच्याविषयीची बेफिकिरी आली आहे. त्यांना पाठिंबा देण्याच्या प्रश्नावर रिपब्लिकन पक्ष फुटतो की काय, अशी स्थिती काही काळापूर्वी तेथे निर्माण झाली होती. त्या पक्षाच्या अनेक प्रमुख नेत्यांनी, गव्हर्नरांनी, सिनेटरांनी आणि लोकप्रतिनिधींनी त्यांची उमेदवारी अजूनही याच कारणाखातर मान्य केलेली नाही. तिकडे हिलरी देशाला चांगल्या परिचित असलेल्या व भारतातही लोकप्रियता मिळविलेल्या नेत्या आहेत. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेत त्यांचे नाव 'चिअरफुल' म्हणून दर्ज आहे. बिल क्लिंटन यांच्या अध्यक्षीय राजवटीत त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला नागरिक होत्या. त्याच काळात त्यांच्या प्रशासन व अर्थकारणाविषयीच्या ज्ञानाचा अमेरिकेत गौरव होता. पुढे न्यूयॉर्कच्या सिनेटर म्हणून त्यांनी अतिशय ठाशीव कामगिरी केली. बराक ओबामांच्या सरकारात त्या परराष्ट्र मंत्री होत्या आणि 'देशाच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी परराष्ट्र मंत्री' असा ओबामांनीच त्यांचा गौरवही केला. त्यांना महिला वर्गात, श्रमिकांत, कृष्णवर्णीय अमेरिकनांत आणि साध्या मध्यमवर्गीयांत मिळत असलेला पाठिंबा मोठा आहे. त्या बळावर त्या निवडणूक जिंकू शकतील असे जाणकारांचे म्हणणे आहे. भारताच्या दृष्टीने तर त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदी येणे हे विशेष महत्त्वाचे व लाभाचेही आहे. त्यांचा डेमॉक्रेटिक पक्ष नेहमीच भारताला अनुकूल राहिला आहे. हिलरी यांनीही त्यांच्या संबंध राजकीय कारकीर्दीत नेहमी भारताला अनुकूल अशाच भूमिका घेतल्या आहेत. याउलट ट्रम्प हे उघडपणे भारत, पाक, मेक्सिको, पूर्व युरोप व मध्य आशियाई देशांविषयी व त्यातील जनतेविषयी उथळपणे बोलत आले आहेत. त्यातला अनेकांवर असलेला त्यांचा रोष जाहीरही आहे.

Web Title: Hillary v Trump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.