हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर, पण गुजरातचं काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 11:39 PM2017-10-25T23:39:52+5:302017-10-25T23:39:58+5:30
हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांचा कार्यक्रम १२ आॅक्टोबर रोजी जाहीर करताना निवडणूक आयोगाने गुजरातबाबत मात्र तशी घोषणा न केल्याने सर्वच विरोधी पक्षांनी आयोगावर पक्षपाताची टीका सुरू केली होती.
हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांचा कार्यक्रम १२ आॅक्टोबर रोजी जाहीर करताना निवडणूक आयोगाने गुजरातबाबत मात्र तशी घोषणा न केल्याने सर्वच विरोधी पक्षांनी आयोगावर पक्षपाताची टीका सुरू केली होती. सहा महिन्यांच्या अंतराने मुदत संपणा-या विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची प्रथा आयोगाने मोडल्याबद्दल आयोगावर टीकाच नव्हे, आरोपही झाले. तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये अनेक विकास कामांची उद्घाटने केली, गुजरात सरकारने अनेक घोषणा केल्या, काही कर्मचा-यांचे पगार वाढवून दिले. वृत्तवाहिनीच्या सर्वेतून भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल, असा निष्कर्षही आला. अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी आणि बँकिंग क्षेत्राला दिलासा व रोजगारनिर्मिती यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मोठे निर्णयही जाहीर केले. म्हणजे आपले गुजरातबाबतचे गणित भाजपाने पक्के करून घेतले. त्यानंतरच निवडणूक आयोगाने बुधवारी गुजरातमधील निवडणुकांच्या तारखा व कार्यक्रम जाहीर केल्यामुळे विरोधकांनी केलेल्या टीका आणि आरोपांना एकप्रकारे बळ मिळण्यास मदतच झाली. गुजरातमध्ये विधानसभेसाठीचे मतदान ९ आणि १४ डिसेंबर रोजी होणार आहे. त्याआधी ९ नोव्हेंबरला हिमाचल प्रदेशातील मतदान संपलेले असेल आणि दोन्ही राज्यांत मतमोजणी मात्र १८ डिसेंबर रोजी होईल. म्हणजेच हिमाचल प्रदेशातील मतदारांना निकालासाठी सव्वा महिन्याहून अधिक काळ, तर गुजरातमधील मतदारांना केवळ चारच दिवस थांबावे लागेल. आचारसंहिताही हिमाचल प्रदेशात ६३ दिवस तर गुजरातमध्ये जेमतेम दीड महिना असेल. या साºया प्रकारांमुळेच भाजपाला आयोगाकडून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष झुकते माप मिळत असल्याच्या आरोपालाही बळकटी मिळाली आहे. निष्पक्ष असलेल्या निवडणूक आयोगाला हे आरोप व टीका टाळणे शक्य होते. पण आयोगाने खुलासा करूनही वादावर पडदा पडू शकला नाही. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य. मोदी यांनी २०१४ साली पंतप्रधान होईपर्यंत सलग १२ वर्षे तिथे मुख्यमंत्री म्हणून राज्य केले आहे. तिथे १९९५ पासून भाजपा सतत बहुमत मिळवत आली आहे. यंदा तर नरेंद्र मोदींमुळे तेथील निवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. आपण केंद्रात गेल्यावरही गुजरातवर आपला व भाजपाचाच वरचष्मा आहे, हे दाखविण्यात त्यांनी कोणतीही कसर सोडलेली नाही. मात्र मोदी कोणतीही जोखीम पत्करायला तयार नाहीत. त्यामुळेच एका महिन्यात त्यांनी गुजरातचे तीन दौरे केले. त्याच्या निम्मा वेळही त्यांनी हिमाचलला दिला नाही. मात्र मोदींच्या राज्यात सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सारी ताकद पणाला लावली आहे. पक्षाध्यक्षपदाची सूत्रे हाती येताना, काही राज्यांतील ताकद वाढल्याचे त्यांना दाखवायचे आहे. हिमाचलमध्ये विजयाची खात्री नाही. त्यामुळे भिस्त आहे गुजरातवर. नोटाबंदीमुळे अस्वस्थता, व्यापाºयांचा जीएसटीला विरोध, अर्थव्यवस्थेतील मंदी, पटेल समाजाची नाराजी या साºयांचा फायदा उचलण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. पण शंकरसिंह वाघेला आणि काही आमदारांना फोडून भाजपाने काँग्रेसला धक्का दिला आहे. ती मंडळी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची मतेही फोडतील, अशीही व्यूहरचना भाजपाने केली आहे. भाजपाविषयी नाराजी असली तरी काँग्रेसबद्दल सहानुभूती आहे, असे मात्र नाही. म्हणूनच हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर, जिग्नेश मेवाणी या विविध जातींच्या, ओबीसींच्या नेत्यांना काँग्रेसने हाताशी धरले आहे. मात्र त्यांचा जनाधार मर्यादित आहे. शिवाय प्रतिस्पर्धी भाजपा सर्वार्थाने खूपच प्रबळ आहे. त्यामुळे दीड महिना दोन्ही बाजूंनी तोफा धडाडत राहणार आहेत.