पुन्हा हिंदुत्व!
By admin | Published: February 1, 2017 05:38 AM2017-02-01T05:38:39+5:302017-02-01T05:38:39+5:30
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली, २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तारूढ झाले, ते प्रामुख्याने विकासाच्या स्वप्नांच्या बळावर ! त्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आणि त्यानंतरही
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली, २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तारूढ झाले, ते प्रामुख्याने विकासाच्या स्वप्नांच्या बळावर ! त्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आणि त्यानंतरही मोदींचा भर राहिला तो विकासावरच! स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या सरकारांनी विकासासाठी काहीही केले नाही आणि आता मी विकास करून दाखवतो, ही मोदींनी केलेली मांडणी मतदारांना भावली. त्यामुळेच परंपरागतरीत्या भाजपाचे समर्थक नसलेल्या मतदारांनीही भाजपाच्या पारड्यात भरभरून दान टाकले आणि त्याचीच परिणती २०१४मधील लोकसभा निवडणूक आणि त्यानंतरच्या काही विधानसभा निवडणुकींमध्ये भाजपाला भरघोस यश लाभण्यात झाली. आता लवकरच पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे आणि २०१९ मधील लोकसभा निवडणुकीचे चित्र कसे असेल याची चुणूक या विधानसभा निवडणुकींच्या निकालांमधून दिसेल, असा राजकीय पंडितांचा कयास आहे. त्यामुळे या निवडणुकींना, विशेषत: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीला, प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. पंतप्रधान मोदींनी लखनौमधील पहिल्या प्रचारसभेत विकासावरच भर दिला होता; मात्र गेल्या शनिवारी भाजपाने जारी केलेला जाहीरनामा आणि रविवारी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान व्यक्त केलेले विचार लक्षात घेतले, तर भाजपा पुन्हा एकदा विकासाचा मुद्दा सोडून हिंदुत्वाच्या विचारधारेकडे वळत आहे की काय, अशी शंका येते. राममंदिर, कत्तलखान्यांवर बंदी, तलाक, पश्चिम उत्तर प्रदेशमधून झालेले हिंदूंचे कथित स्थलांतर, हे मुद्दे दुसरे काय दर्शवतात? हे मुद्दे उपस्थित करण्यामागे धार्मिक आधारावर ध्रुवीकरण करण्याशिवाय दुसरा कोणता उद्देश असू शकतो? अर्थात हे मुद्दे हिंदुत्ववाचक म्हणून नव्हेत, तर सामाजिक मुद्दे म्हणून सादर करण्याची मखलाशी शाह यांनी केली आहे. हिंदुत्ववादी भावनांना साद घालण्यासाठी गोवंश कत्तल हा संघ परिवाराचा पूर्वापार चालत आलेला आवडता मुद्दा आहे; पण यांत्रिक कत्तलखान्यांमुळे शेतकऱ्यांचे जगण्याचे साधन हिरावल्या जाते, अशी मांडणी करून अमित शाह यांनी यावेळी त्याला सामाजिक मुलामा देण्याचा प्रयत्न केला आहे. गत काही काळापासून भाजपाच्या कार्यक्रम पत्रिकेतून राममंदिराचा मुद्दा बाहेर पडला होता. यावेळी त्याला पुन्हा जाहीरनाम्यात स्थान मिळाले आहे. एकीकडे निवडणुकीतील पक्षाचा चेहरा असलेले नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणात राममंदिराचा उच्चारही करीत नाहीत आणि दुसरीकडे पक्षाच्या जाहीरनाम्यातून राममंदिर पुन्हा डोकावते, ही वस्तुस्थिती केवळ विकासाच्या मुद्द्याच्या आधारे निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास भाजपात उरला नसल्याचे द्योतक मानायचे का? विकासाच्या मुद्द्यावर मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयश आल्यामुळे विकासाला हिंदुत्वाची जोड देण्याची गरज भाजपाला भासली, असा निष्कर्ष जर कुणी काढत असेल, तर तो चुकीचा म्हणता येणार नाही.