कलेला कोंदण
By Admin | Published: February 16, 2016 03:09 AM2016-02-16T03:09:23+5:302016-02-16T03:09:23+5:30
केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कला अकादमी स्थापन होण्याचा मार्ग सुकर आणि प्रशस्त झाला, हे कलोपासकांच्या दृष्टीने सुचिन्ह आहे
केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कला अकादमी स्थापन होण्याचा मार्ग सुकर आणि प्रशस्त झाला, हे कलोपासकांच्या दृष्टीने सुचिन्ह आहे. लोकशाही व्यवस्थेत राजाश्रय हा शब्द वाच्यार्थाने हद्दपार झाला, पण लक्ष्यार्थाने त्याची गरज शिल्लक आहेच. त्याच कारणास्तव तब्बल ६२ वर्षांपूर्वी दिल्लीत राष्ट्रीय पातळीवरील ललित कला अकादमीची स्थापना झाली. काळाच्या ओघात अनेक राज्यांमध्ये तिची केंद्रे उभी राहिली. कोलकाता, लखनौ, भुवनेश्वर अशा काही ठिकाणी तिची विभागीय केंद्रेही कार्यरत झाली. आश्चर्य म्हणजे ललित कला अकादमीचे केंद्र, एकूणच सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ आणि कलेच्या प्रांतात अग्रेसर राहिलेल्या महाराष्ट्राच्या वाट्याला आले नाही. चित्रकार, शिल्पकार आणि तत्सम दृश्य कलांना नव्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम महाराष्ट्रातील अनेक कलाकारांनी अशी व्यापक संस्थात्मक रचना पाठीशी नसतानाही केले. पण म्हणून अकादमीसारख्या संस्थेची या राज्याला गरजच नाही, असे मानण्याचे कारण नाही. पूर्वसूरींकडून मिळालेल्या भव्य-दिव्य वारशात समकालीन कलाविष्कारांची अभिजात स्वरूपाची भर पडावयाची असेल, तर असे संस्थात्मक बळ गरजेचे आहे. बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष आणि ख्यातकीर्त चित्रकार वासुदेव कामत यांनी राज्यभरातील असंख्य कलाकारांच्या मनातील याबद्दलच्या सुप्त इच्छेला मोठ्या खुबीने मूर्त स्वरूप दिले. १२७ वर्षांची परंपरा असलेल्या मुंबईतील बॉम्बे आर्ट सोसायटीच्या नव्या वास्तूच्या उद््घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत वासुदेव कामत यांनी राज्यात ललित कला अकादमी नसल्याचा मुद्दा जाहीरपणे मांडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अकादमी स्थापन करण्याची व तिला जागा देण्याची घोषणा केल्याने आता हा विषय लालफितीत अडकू नये. उपद्रवमूल्य कमी असलेल्या कलावंतांसाठी अकादमी देऊ करतेवेळी मुख्यमंत्र्यांनी दाखविलेली तत्परता अभिनंदनीय आहे. तिला पंतप्रधान मोदींची कलेप्रती असलेली भूमिकाही कारणीभूत आहे. कलांच्या जोपासनेसाठी भक्कम संस्थात्मक पाठबळ स्वातंत्र्योत्तर भारताच्या जडणघडणीत मौलिक राहिले. पं. जवाहरलाल नेहरूंनी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बरोबरीने कलांच्या जोपसनेसाठीही संस्थात्मक रचनेचा जो पाया घातला, त्यावर राज्यातील अकादमीच्या निमित्ताने आणखी एक वीट रचली गेली आहे. त्यातून साकारणारे कलोपासनेचे नवे चित्र महाराष्ट्राच्या वैभवात भरच टाकेल.