‘हायर ॲण्ड फायर’ ही या देशाची संस्कृती नव्हे; मी देशाला काय देऊ शकतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 06:14 AM2021-03-28T06:14:17+5:302021-03-28T06:14:35+5:30

पारंपरिक उद्योगांचे प्रतिनिधित्व करणारे जिंदल स्टील वर्क्सचे अध्यक्ष - व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदल आणि नवतरुण तंत्रज्ञानाच्या लाटेवर स्वार होऊन नवनिर्मिती करणारे ‘पेटीएम’चे संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी विजयशेखर शर्मा- भारतीय उद्योजकांच्या दोन पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या दोन उद्योजकांशी लोकमत वृत्तसमूहाचे अध्यक्ष, माजी खासदार विजय दर्डा यांनी संवाद साधला. 

‘Hire and Fire’ is not the culture of this country; What can I give to the country? | ‘हायर ॲण्ड फायर’ ही या देशाची संस्कृती नव्हे; मी देशाला काय देऊ शकतो?

‘हायर ॲण्ड फायर’ ही या देशाची संस्कृती नव्हे; मी देशाला काय देऊ शकतो?

Next

 ‘स्मॉल टाऊन इंडिया’मध्ये रुजलेल्या जिद्दीच्या दोन समांतर कहाण्या

निमित्त होते नुकत्याच पार पडलेल्या ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’या सोहळ्याचे ! या वार्तालापाचे हे संपादित शब्दांकन.

पला देश ‘तरक्कीवान’ देश आहे, इथं तुम्ही कुठलाही उद्योग उभारा, मेहनत करा तो उद्योग फार झपाट्यानं मोठा होतो.  मी इंजिनिअरिंग केलं.  महत्त्वाकांक्षी होतो. वडिलांच्या हाताखाली प्रशिक्षण घेतलं. स्वप्न होतं की, आपला स्वत:चा प्लान्ट उभारु. त्यासाठी वडिलांनी, भावांनी पाठिंबा दिला. विजयनगरचा स्टील प्लान्ट मी उभा केला.  मी मूळचा हिस्सारचा !  छोट्या शहरातली माणसं फार महत्त्वाकांक्षी असतात.. स्मॉल टाऊन बॉइज ! . आमच्यात मुळात महत्त्वाकांक्षा फार जास्त असते. छोट्या शहरातले तरुण कामाच्या शोधात मोठ्या शहरांत जातात, तेव्हा डोक्यात एकच असतं की, ‘बहौत तरक्की करनी है!’ लाखाे तरुण मुलं आपली गावं सोडून दिल्ली-मुंबई-कोलकाता-बंगळुरू-हैदराबादची वाट चालतात. तेव्हा ठरवतात, वाट्टेल तेवढं काम करू, १८ काय २४ तास काम करू पण प्रगती करू. ती मेहनत त्यांच्या महत्त्वाकांक्षांना बळ देते. स्मॉल टाऊनवाल्या अनेकांची ही गोष्ट आहे. मी स्टिल प्लान्ट उभारला तेव्हा पहिल्यापासून मनात हेच होतं की हा एकविसाव्या शतकातला सुंदर प्लान्ट असावा.  आवारात जाताना असं वाटलं? पाहिजे की आपण एखाद्या सुंदरशा बागेत जातोय. मी भारतातले अनेक स्टिल प्लान्ट तोवर पाहिले होते. भयानक चित्र होतं. सगळीकडे काळी कापडं, काळे कपडे घालूनच कामगार काम करणार. मी म्हटलं, हे चित्र बदललं पाहिजे. त्यातून हा शानदार प्लान्ट उभा राहिला !

नकळत्या वयात माझ्या वडिलांच्या शिस्तीने आणि स्वभावाने बरंच काही शिकवलं. त्यांचं त्यांच्या कामगारांशी असलेलं नातं, परस्पर स्नेह जबरदस्त होता. त्याकाळी राखी पौर्णिमेला वडील आम्हाला कामगारांच्या कॉलनीत पाठवत. कामगारांच्या लेकी आम्हाला राखी बांधत. घरोघर जाऊन आम्ही राखी बांधून घ्यायचो. वडील म्हणत, त्या तुमच्या बहिणी आहेत. तसा सन्मान द्या. त्यांनी कामगारांसाठी कॉलनी बांधली. मुंबईत त्याकाळी असं होत नसे, उद्योग उभे राहत, पण कामगारांनी कुठं रहायचं याचा विचार कुणी केला नाही. मग रस्त्याकडेला झोपड्या बांधून कामगार राहत.  कामगार ही आपली जबाबदारी आहे असं समजून उद्योगमालकांनी त्यांच्यासाठी घरं नाही बांधली. आपले कामगार कसे जगतात, कसे राहतात याकडे पाहिलं नाही.

आमच्या उद्योगात असं नव्हतं. माझे वडील म्हणत, उद्योगात केंद्रस्थानी कामगार! तो खुश, संतुष्ट असला पाहिजे. आज ओ. पी. जिंदाल समूहात पाच लाख कामगार काम करतात. आमच्याकडे आजवर ना कधी संप झाला, ना आमच्याकडे इंडस्ट्रिअल रिलेशन्स नावाचा विभाग आहे. आमच्याकडचं व्यवस्थापन वेगळं आहे. त्याचा पाया वडिलांनी घातला आहे. ते म्हणत, आधी कामगारांचा सन्मान करा. त्यांना तुम्ही १०० रुपये देणं लागत असाल तर २०० द्या, ३०० द्या. तेही त्यांनी मागण्यापूर्वी सन्मानाने द्या. हे सारं आम्ही आजही मानतो, त्यामुळे नवीन कामगार सुधारणा कायदे आल्यावर काय होणार असा मला प्रश्न विचारला तर मी सांगतो, त्या सुधारणांना माझा पाठिंबा आहे. फार काही मोठे बदल करावे लागतील असं आम्हाला तरी वाटत नाही. कारण कामगारांचे प्रश्न प्रेमानं सोडवणं सहज शक्य आहे. ‘हायर ॲण्ड फायर’ हे धोरण या देशात चालूच शकत नाही. ती आपली संस्कृती नव्हे.

मी देशाला काय देऊ शकतो?
मी देशाला, समाजाला काय देऊ शकतो असं माझ्या मनात सतत  असतं. त्यातूनच मी धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या विकासकामात सहभागी झालो. माझी पत्नी, संगीताला काश्मीरमध्ये काही काम उभं करायचं होतं.  कलम ३७० काढल्यानंतर तिथं बदलांची प्रक्रिया सुरू झाली आहे. गुलमर्गला विण्टर ऑलिम्पिक्स आयोजित करण्याची कल्पना आहे. त्यासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाशी चर्चा करून आराखडा तयार करण्याचे  काम सध्या चालू आहे. 

Web Title: ‘Hire and Fire’ is not the culture of this country; What can I give to the country?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Lokmatलोकमत